वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग ७

युवा विवेक    24-May-2023   
Total Views |


वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग-तीन

गावात स्वातंत्रदिन, प्रजासत्ताक दिन दिवाळीचा सण असल्यासारखे साजरे केले जात असत. या काळात गावात सुट्टी घेऊन एखादा जवान आला असेल तर त्याची मिरवणूक काढून, त्याला गावातल्या सर्व सरकारी कार्यालयांचा झेंडा फडकवण्याचा मान मिळत असायचा.

जो की त्यांना आपण देशसेवेसाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे अन् ही किती अभिमानाची गोष्ट आहे, याची जाणीव करून देत असायचा. हे सगळं ऐकत असताना संतू अण्णा तलाठी यांना गहिवरून आलं. आपल्याच वयाचे अनेक तरुण या गावातून देश सेवेसाठी सीमेवर तैनात आहे.

त्यांच्या गावाची जबाबदारी आपल्याला इतक्या लहान वयात मिळाली, नक्कीच आपण या गावच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू, असा विचार संतू अण्णा तलाठी यांच्या मनात येऊन गेला अन् त्यांनी तो कृतीतून पूर्ण करण्याचा मनातच निश्चय केला.

सूर्य अस्ताला कलला, तसं पहाटेच गावातल्या तरुणांनी संतू अण्णा तलाठी यांना सांजेला गावची तालीम बघायला म्हणून यायचा सांगावा धाडला होता. जगण्या, रामा कुंडूर यांना समवेत घेऊन संतू अण्णा तलाठी गावच्या तालमीच्या दिशेनं निघाले.

रस्त्यानं असताना त्यांना गावच्या मारुती रायाच्या देऊळाचे दर्शन झाले. दहा-पाच मिनिटं दर्शन घेउन संतू अण्णा तलाठी तिथे बसले असताच गावकऱ्यांनी त्यांना गराडा घातला. पुन्हा गावातल्या गप्पा सुरू झाल्या. अखेर काही वेळानं तालमीची काही पोरं देऊळात मारुती रायाचे पाय पडायचे म्हणून आले अन् त्यांनी गावच्या लोकांच्या गप्पा आवरत्या घेत संतू अण्णा तलाठी यांना गावातल्या तालमीत घेऊन गेले.

गावातल्या तरुण पिढीला जितका नाद आर्मी भरतीचा होता, तितकाच नाद कुस्तीचा होता. त्यामुळं तालमीत एक से बडकर एक पहिलवान वस्ताद साळवे अण्णा यांच्या शिकवणुकीतून घडत होते. पंचक्रोशीत वाभळेवाडीच्या पहिलवानांचा दबदबा होता.

गावचे माजी सरपंच कुस्ती भूषण. स्व. दांडगे अण्णा यांचे प्रतिमा तालमीत लावलेली होती. हनुमान चालीसा म्हणून झाली की हनुमानाच्या मूर्तीला वंदन केल्यानंतर हे गावचे कुस्तीगीर स्व. दांडगे अण्णा यांच्या प्रतिमेचे दर्शन करत. कारण गावाला कुस्तीचं दांडगे अण्णांनी लावलेलं होतं.

अण्णा सलग पंचवीस वर्षे सरपंच पदावर असताना गावातल्या तरुणांना अण्णांनी ही तालीम बांधून दिली होती. जीचा पुरेपूर फायदा गावातली तरणी पोरं घेत होती अन् गावाचं नाव रोशन करीत होती. हे सगळं हातवारे करत, मिश्याला पीळ देत गावचे वस्ताद साळवे हे संतू अण्णा तलाठी यांना सांगत होते.

संतू अण्णा हे सगळं ऐकत होते. कुस्तीचे शिकाऊ चालू असलेले डावपेच बघत होते. संतू अण्णा यांनी पुढे तालमीसाठी विकासनिधी उपलब्ध करून अजून कश्या सोयी, सुविधा तालमीत तरुण मुलांना उपलब्ध करून देता येईल हे वस्ताद साळवे यांना सांगितलं. हे सगळं कसरती करणारी मुलं ऐकत होती.

शहरात कसं आपण कुस्ती स्पर्धेत भाग घेऊ शकतो, पुढे याचा करिअरच्या दृष्टीने कसा फायदा होईल. हे ही संतू अण्णा तलाठी यांनी तालमीतल्या पोरांना सांगितले. शहराला होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत या मुलांना नेण्यासाठी जगण्याकडे नाव नोंदवून ठेवण्याचंसुद्धा सांगितलं.

पोरांनी जगण्याला हसतहसत तलाठी अण्णांचे पीए साहेब म्हणून त्याच्याकडे नाव नोंदवून घेतली. पुढे संतू अण्णा तलाठी यांनी तालमीतल्या तरुणांचा निरोप घेतला अन् वस्ताद साळवे यांचे पाय पडून संतू अण्णा तलाठी, रामा कुंडुर अन् जगण्या तलाठी कार्यालयाच्या दिशेनं निघाले.

सूर्य अस्ताला गेला होता. संतू अण्णा तलाठी, रामा, जगण्या गावच्या तलाठी हाफीसात येऊन बसून राहिले. उद्यापासून संतू अण्णा तलाठी शिकाऊ तलाठी म्हणून गावचा कारभार हाती घेणार होते. त्यासाठी त्यांनी उद्याची सगळी तजवीज करून तलाठी हाफीसाला कुलूप घातलं अन् त्याचं उटूळे जगण्याच्या हाती देत उद्या पहाटे नऊला ये म्हणून सांगितलं.

संतू अण्णा यांनी त्याला आईच्या भेटीसाठी अन् आईला काही खायला घेऊन जा म्हणून कोपरीतून वीस रुपये काढून दिले. तो ही डोळ्यातील पाणी सावरत त्याच्या झोपडीवजा घराच्या दिशेनं निघून गेला.

रामा कुंडूर अन् संतू अण्णा तलाठी लक्षी आईच्या पिंपळ पारावर उक्खड बसून गप्पा मारीत होते. संतू अण्णा तलाठी यांना गावात येऊन दोन दिवस कसे सरले कळलं नाही अन् आता उद्यापासून गावासाठी सरकारी नोकर म्हणून त्यांना काम करायची संधी मिळत होती म्हणून संतू अण्णा तलाठी मनातून खुश होते. सांज केव्हाच ढळून गेली होती. पारावर बसल्याजागी संथपणे वाहणारा गार वारा अनुभवत उद्याचा विचार करत संतू अण्णा तलाठी रामा कुंडूरशी गप्पा करत होते..!

क्रमशः

- भारत लक्ष्मण सोनवणे.