नमस्कार!
मागच्या भागात आपण स्टार्टर्सविषयी जाणून घेतले. स्टार्टर्स झाल्यावर येतो मेन कोर्स. त्यात असतो रोगन जोश, रीस्ता, गुस्ताबा असे पदार्थ. मुख्य जेवण हे अर्थातच हेवी असते. यापैकी रोगन जोशबद्दल वेगळा लेख लिहिला होता, त्याव्यतिरिक्त पदार्थ कोणते ते जाणून घेऊ.
रिस्ता - हे नाव वाचल्याबरोबर "ये रिस्ता क्या कहेलाता है?" "रिस्ता वही सोच नयी" हे डोक्यात फिरायला लागले. फोटोवरून कोफ्ता करी किंवा पाश्चात्य मिटबॉल्ससारखा दिसणारा हा पदार्थ आहे. मटनापासून तयार होणारा हा पदार्थ. मटण तूप किंवा तेलासोबत एका लाकडी मुसळात बारीक केले जाते. त्यानंतर त्याचे मसाल्यासोबत गोळे करून ग्रेव्हीमध्ये शिजवले जातात. वाझा पालक/पाइकि रिस्ते म्हणजे रिस्ते करून त्याला पालक ग्रेव्हीत शिजवतात. रीस्त्याचा वेगळा प्रकार आहे.
गुस्ताबा - रिस्ताचा भाऊ गुस्ताबा इतके साम्य फोटोमध्ये दिसेल. रिस्ताचा रस्सा लाल तर गुस्ताबा पांढरा! आपल्या कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्स्यासारखाच काहीतरी असावं. गुस्ताबा पण मटण पासून बनवतात. मिटबॉल्स करण्याची कृतीही जवळपाससारखी, पण याची ग्रेव्ही असते दह्याची. त्यामुळे छान पांढरा, क्रिमी रंग येतो. कमी तिखट खाणाऱ्या लोकांसाठी हा पदार्थ केला असावा. अर्थात हिमाचल आणि बाकी पहाडी प्रदेशात भाज्या, मांस दह्यात शिजवण्याची परंपरा आहेच. दह्यात शिजवलेले मटणाचे कोफ्ते असं सोप्या भाषेत म्हणू शकतो आपण.
तासीर -इ- गुस्ताब - गुस्ताबाचा वेगळा प्रकार आहे. हे पण मिटबॉल्स असतात, पण यात ऍप्रिकॉटचे सारण असते. मटणात ड्रायफ्रूट भरून त्याला दह्याच्या ग्रेव्हीत शिजवायचे ही कल्पना खरंच कोणाच्याही डोक्यात आली तरी पटकन उडवून लावली गेली असती, पण या लोकांनी ती प्रत्यक्षात उतरवली. कमाल आहे.
आब गोश्त – ही पण एक मटणाची डिश. मटण दुधात शिजवले जाते. त्याला तूप आणि लवंगाची फोडणी असते. बाकी थोडे मसाले असले तरी याची चव काहीशी गोडसरच ठेवतात. दौधा रसमध्येही मटणाला गोडसर दुधाच्या ग्रेव्हीत शिजवतात. हा पण आब गोश्तचा प्रकार.
हे आणि असे खूप प्रकार असतात. सलग इतकं मांसाहाराबद्दल मी लिहिले याचं मलाच आश्चर्य वाटते आहे. इतके सगळे पदार्थ करायची चिकाटी आणि कौशल्य याबद्दल मी मागेच लिहिले पण हे खाणाऱ्या लोकांचे जास्त कौतुक. या लोकांच्या मेटॅबॉलिझमचा एक भव्य सत्कार आयोजित करायला हवा. इतके सगळे अगदी एक एक चमचा जरी खाल्ले तरी १५ दिवस जिम करावी लागेल सामान्य लोकांना. खवैयांच्या बाबतीत असा प्रश्न विचारू नये असा अलिखित नियम आहे. असो, पुढच्या लेखात जर वाझवानमध्ये काही शाकाहारी आणि गोड पदार्थ असतील तर त्याबद्दल जाणून घेऊ.
- सावनी