शिवना मायच्या कथा! भाग ९

भाग नऊ part 9

युवा विवेक    22-Mar-2023   
Total Views |


शिवना मायच्या कथा! भाग नऊ

रात्र हिवानं सरली तसं मी पहाटेच परसदारी असलेल्या लाकडी खाटेवर जाऊन गोधडी घेऊन पुन्हा झोपून राहिलो,एरवी माय उठली अन् अंगण झाडून सडा रांगोळी करत बसली. माय तिचं आवरून भाकरी करायला बसली सूर्योदय होऊन सुरू पिंपळाच्या पानांच्या आडून घराच्या चौकटीच्या आता शिरला तसं मायना मला आवाज दिला!

छोटे सरकार होतयाका उठतोयो का..!

मी अंगाला आळोखे देत उठलो खाटेवर असलेली गोधडी घडी घालून तिला घडोंचीवर फेकले अन् दातून घेऊन दात घासत बसलो होतो, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना न्याहाळत होतो.

तितक्यात मायना पुन्हा आवाज दिला,

छोटे सरकारबाळंतपण आजच्या दीस!

मी हसतच हातातली लिंभाऱ्याची काडकी फेकली अन् मायला बोलता झालो,

आजच्या दीस काय करायचं माय झालीया झालीया बाळंतीण तुझी लेक!

अन् हसतच मी कुंडीतून पाणी घेतलं मावा खालल्यावर जश्या गुळण्या कराव्यात तश्या गुळण्या करून माय जवळ चुल्हंगनापाशी येऊन बसून राहिलो.

चहा उकळी आलाच होता मायनं मला एका कान तुटक्या कपाला जलमरच्या थाटलीत पार उतू जास्तोवर चहा वतला. मी पिठाच्या डब्यावर उभं राहून बाजाराच्या पिशवीत असलेले बटर काढून चहा संगतीने गिळत बसलो.

पहाटेचा पार कलून गेला अन् माझं हळूवार आवरासावर चालू होती मायना वावरात सरकी निंदायला जायचं म्हणून बिगीबीगी आवरून घेत वावरात दुपारच्या न्याहारीला भाकरी अन् बोंबलाच्या खुडीचं कालवण एका पेंडक्यात बांधलं अन् माय मला आवाज देत मोठ्यानं कल्ला करू लागली.

उठ की छोटे सरकार न्हाऊन घ्यावं, तुझ्यासारखी पोरं बघ न्हाऊन धुवून निघालीसा कामाधंद्याला तू शहराकडेच बरा राहतो म्हणजे कसं वेळीत उठणं,अंघोळ पाणी करून कंपनीत जाणं होतं तुझं. गावाला आलं की तू त्या गावातल्या येड्या आश्यागत कामाला येडे घालत राहतो. असं बरच काही दटावून माय वावरात कामाला जायचं म्हणून आवरू लागली.

मी अंगाला आळोखेपिळोखे देत उठलो, माठाच्या खाली असलेल्या धाऱ्यात टपकत्या पाण्यात कप अन् थाटली टाकून बाहेर चुल्हीजवळ आलो.

गावाकडे येऊन आठ दिवस कसे सरून गेले मला कळले नाही. गावातले मित्र-मंडळी, जवळचे लोकं अन् आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजणाऱ्या माझ्या माय-माउलींना भेटून छान वाटू लागले होते. काल दुपारच्याला झोल्याआईच्या संगतीनं तिनं तोडलेले यळूचे बांबू झोल्याआईला तोलाना झाल्यानं, मी ते तिच्या झोपडीपर्यंत ओढीत-ओढीत पहोच केले. अन् कोरा चहा घेऊन घरला निघून गेलो होतो.

गावच्या बकऱ्या राखुळीला घेऊन जाणारा राखुळ्या जेव्हा दारात मायला ओरडला,

जनी नानीये शेरडं कुठशीक हायसा?

त्यानं दोन-तीन वेळा आरोळी दिली, माय परसदारच्या विहिरीतून पाणी शेंदत असल्यानं तिला त्याचा आवाज काही गेला नसावा.

दम की लगा,वजीस जरा..!

लपाय आपटत मी आमच्या शेरड ठेवायच्या सप्परातून आमची चारी-पाची खांडकं दाव्यातून सोडवून राखुळ्याच्या हाती दिले अन् तो निघून गेला. मी त्याला अन् वावरात जाणाऱ्या लोकांना खाटेवर बसून बघत राहिलो, गावातली समदी लोकं कामाधंद्याला निघाली होती. आजबा पण केव्हाच वावरात दूध काढायला म्हणून गेला होता.

चुल्हंगनावर मायना माझं पाणी ठीवले होते. पाणी इसनाला आल्यासारखं आवाज करत गरम तापलं काय अन् उकळल काय एकच होतं. मी खाटेवरची गोधडी अन् पांघरून घडी घालून तिथूनच घडोंचीवर फेकली.

पाणी काढून न्हाणीघरात जाऊन घंटाभर अंघोळ करत वजरीने आंग घासत बसलो. थंडीच्या दिवसांमुळे अन् रातच्या वावरातल्या पाणी भरण्याच्या पाळीमुळे सगळं अंग ऊलून गेलं होतं.

घंटाभरच्या अंघोळीनंतर गाडीच्या फुटक्या आरश्यात बघून, बोकड्यासारखे वाढलेले केस फनीने मागे सारून, गंद-पावडर करून मी पुन्हा गिल्लासभर चहा अन् एक गरमागरम पोळी गिल्लासात कोंबून खाऊन घेतली.

देऊळात देवाला अगरबत्ती लावायला म्हणून साऱ्या गावच्यामागून देवळाकडे निघालो.

आठ दिवसांची सुट्टी कशी सरली कळलं नाही. उद्या पुन्हा शहराच्या वाटा जवळ करायच्या या विचारानं मला भरून आलं अन् मी देवळातून पाय पडून गावातल्या शेवटच्या घटका मोजणाऱ्या माझ्या माय माऊलीशी गप्पा करत बसलो.त्यांनाही आपुलकीनं असं विचारपूस करणारं कुणी भेटलं की, बरं वाटत असावं म्हणून मी ही घटकाभर पिंपळाच्या पारावर बसून गप्पा करत राहिलो.

येणारे-जाणारे क्षण दोन क्षण उभे राहून विचारपूस करायचे अन् पुन्हा त्यांच्या वाटेल निघून जायचे. आपल्या माणसांची विचारपूस करावी तशी ते विचारपूस करत त्यामुळं माझ्याही जीवाला बरं वाटायचं. गप्पात दुपार कशी कलुन गेली कळलं नाही, तसं मी घरी येऊन उद्याच्या पहाटेच्या लाल परीने शहराला जायचं म्हणून बॅग भरायला घेतली..!

क्रमशः

भारत सोनवणे.

भारत सोनावणे

माझे नाव भारत लक्ष्मण सोनवणे, मी औरंगाबाद येथील रहिवासी आहे.माझं पदव्युत्तर MBA हे शिक्षण डॉ.भिमराव आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून झालेलं आहे..!
साहित्य क्षेत्रातील माझा परिचय,माझे ललित लेख,कथा या दै.सकाळ,दै.लोकमत,दै.नवाकाळ,इत्यादी दैनिकातून प्रसिद्ध.तसेच अनेक साप्ताहिक,मासिक,दिवाळी अंक यात लेखन प्रकाशित.
अनेक कवी संमेलनात सक्रिय सहभाग,नवोदित युवा कवी म्हणून अनेक ठिकाणी माझ्या लेखनीचा सन्मान.ऑनलाईन माध्यमातून अनेक वेब पोर्टलसाठी फ्रीलांसर म्हणून सध्या मी लेखन करतो."Writing From a Blank Mind" या ललित लेखन,कथा,कविता,पर्यटन,इतिहास अश्या अनेक विषयांवर माझ्या ब्लॉग माध्यमातून जवळ जवळ १४ देशात माझं लेखन वाचले जात आहे..!