एक सच्चा हिंदी सिनेप्रेमी साठ - सत्तर किंवा नव्वदच्या दशकातील सिनेमांवर जेवढं भरभरून लिहितो - बोलतो तेवढा ऐंशीच्या दशकातील सिनेमांवर बोलत नाही हे माझं वैयक्तिक मत आहे. असं घडण्यामागे अनेक राजकीय - सामाजिक कारणेदेखील आहेत. बॉलिवूडमधील अंडरवर्ल्डचा वाढता हस्तक्षेप, आधीच्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्यांचा पडता काळ किंवा सुमार दर्जाच्या अभिनेत्यांचा उदय अशी अनेक कारणे सांगता येतील.
ऐंशीचे दशक ओळखले जाते, ते अनेक स्टारसनचे लॉन्चिंग डिकेड म्हणून..! सुनिल दत्त, धर्मेंद्र, राज कपूर, मनोजकुमार, राजेंद्रकुमार, शशी कपूर…. अशा अनेक मातब्बरांच्या मुलांनी या दशकात कारकिर्दीला प्रारंभ केला, पण अपवाद वगळता फार थोडेच जण पुढे यशस्वी झाले.
या साऱ्या धामधुमीत श्याम बेनेगल, सई परांजपे, गोविंद निहलानी यांसारख्या मंडळींनी कलात्मक सिनेमांच्या माध्यमातून एक नवीन दालन हिंदी सिनेमात सुरू केलं होतं.
ओम पुरी, नसीरुद्दीन शाह, अन्नू कपूर, शबाना आझमी, दीप्ती नवल, सुप्रिया पाठक…. अशी वेगळी फळी उभी राहत होती. यांपैकी अनेकांना रंगभूमीची विशेषत: नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि फिल्म अँड टेलिव्हिजन टेक्निकल इन्स्टिट्युटसारख्या संस्थांची पार्श्वभूमी होती; त्यामुळे सकस आणि दर्जेदार अभिनय बघायला मिळत असे.
आधीच्या दशकात अमिताभ बच्चन नावाच्या वादळाने सर्वसाधारण चेहऱ्यांना सुद्धा बॉलिवूडवर राज्य करता येऊ शकतं, हा आशावाद रुजवल्याने अनेकांनी आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला; कारण रंगभूमी कितीही सशक्त असली तरी त्यामागची आर्थिक विवशता समजता येण्यासारखी होती.
सतिश कौशिक हे त्याचं प्रवाहातील एक नाव होते.!!
या नाटकवेड्या मंडळींनी एकत्र येऊन केलेला ‘‘जाने भी दो यारो"सारखा सिनेमा आज कल्ट क्लासिकचा दर्जा मिळवून बसला आहे. ज्याचे संवाद स्वतः सतिश कौशिकनेच लिहिले होते. नंतर मंडी, मासूम, वो सात दिन, अशी एकेक पायरी चढत गेलेल्या सतिश कौशिकला खरी ओळख मिळवून दिली ती शेखर कपूर दिग्दर्शित ‘‘मिस्टर इंडिया" मधील कॅलेंडरच्या रोलमुळे! तो रोल आबालवृद्धात लोकप्रिय झाला.
सत्येन कप्पू, पिंचू कपूर, ओम शिवपुरी, ओमप्रकाश वैगेरे मंडळींनी साहाय्यक भूमिकांना एका वेगळ्या उंचीवर नेले होते, त्या रिक्त जागेवर अनुपम खेर, परेश रावल, कादर खान ही नावे दिसू लागण्याचा तो काळ होता.
नव्वदच्या दशकात विनोदी सिनेमांची जी लाट आली, त्यात सतिश कौशिकने रंगवलेले एकेक रोल धमाल उडवत असत.
‘‘दिवाना मस्ताना’’मधला पप्पू पेजर, ‘‘बडे मियां छोटे मिया’’मधला शराफत अली, ‘‘मिस्टर अँड मिसेस खिलाडी’’मधला चंदा मामा असे अनेक रोल त्याच्या निखळ विनोदी अभिनयाने त्याने लोकप्रिय केले.
‘‘राम लखन’’मधील काशिराम आणि ‘‘साजन चले ससूराल’’मधील मुत्थूस्वामीने, त्याला सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिकेतील अभिनयासाठीचा फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळवून दिला.
पण तरीही सतिश कौशिक हे नाव गोविंदा, कादर खान, शक्ती कपूर, च्या तुलनेत पिछाडीवर राहिले कारण दिग्दर्शक म्हणून त्याची त्याच काळात झालेली समांतर कारकीर्द !!
बोनी कपूर - अनिल कपूर ह्या भावंडांनी सातत्याने त्याच्यावर विश्वास टाकत त्याला दिग्दर्शनाची संधी दिली.
रुपकी राणी चोरोका राजा, प्रेम, मिस्टर बेचारा, बधाई हो बधाई असे अनेक सिनेमे त्याने दिग्दर्शित केले पण तेरे नामचा अपवाद वगळता दखल घ्यावं अस यश कशातही मिळालं नाही.
हिंदी सिनेमात वाटचाल करत असताना देखील त्याने रंगभूमीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. सेल्समन रामलाल ह्या त्याच्या नाटकाला हिंदी रंगभूमीवर चांगला प्रतिसाद मिळाला होता. बदलत्या काळाशी जुळवून घेत असताना वेबसिरिजचा काळ येताच स्कॅम १९९२ मधील त्याने साकारलेला शिवराळ भाषा बोलणारा ग्रे शेडचा बिगबियर मनू मुंद्रासुद्धा लक्ष वेधून घेईल असा होता.
सतीश कौशिकच्या वैयक्तिक आयुष्याला मात्र दुःखाची झालर होती. त्याच्या दोन वर्षाच्या मुलाचे अकाली निधन झाल्याने तो खचला होता, उतारवयात पत्नीला सरोगसीद्वारे कन्यारत्न प्राप्त झाल्याने वयाच्या त्या टप्प्यावर वडील म्हणून वावरताना होणारी दमछाक तो मुलाखतीतून बोलून दाखवत असे. आपल्या सहअभिनेती नीना गुप्ताला तिच्या अनौरस मुलीसह स्वीकारण्याची तयारी दर्शविल्यामुळे त्याची वास्तव आयुष्यातील ती भूमिकाही वादग्रस्त झाली होती.
सतिश कौशिकच्या मृत्यूबद्दलदेखील उलटसुलट बातम्या ऐकण्यात येत आहे.
पडद्यामागील बाबी सोडल्या तरी पडद्यावरील त्याच्या भूमिकांनी एक काळ अक्षरशः गाजवला आहे ह्यात कोणाचेही दुमत नसेल. त्याचे ‘‘इंटुकले पिंटूकले"सारखे डायलॉग, संवादफेकीची विशिष्ट लकब, एक मित्र म्हणून सेलिब्रिटी वर्तुळातील स्थान या साऱ्यांच्या रूपाने तो नेहमीच स्मरणात राहील.
राजेश खन्ना, विनोद खन्ना, ऋषी कपूर असे एक कालखंड गाजविणारे सुपरस्टार काळाच्या पडद्याआड होत असताना दुसरीकडे ओम पुरी, कादर खान, जावेद खान अमरोही आणि आता सतिश कौशिक सारखे साहाय्यक भूमिकांना संस्मरणीय करणारे कलावंत निरोप घेताना पाहणे निश्चितच दुःखद आहे.
- सौरभ रत्नपारखी
- ९८८१७८३४७४