बदलांचा सहज स्वीकार

युवा विवेक    24-Feb-2023
Total Views |

बदलांचा सहज स्वीकार

 

 
आपल्या जगण्यात जरासा बदल झाला तरी आपली घडी विस्कटते. अगदी नवी चप्पल घेतली तरी तिची सवय व्हायला चार पाच दिवस जातातच. आपल्या जीवनात थोडासा बदलही आपल्या रूटिनवर परिणाम करतो. पण पुरातन काळापासून हे बदल आपल्याला चुकलेले नाहीत. त्यांना आपण वेळोवेळी सामोरे गेलो. चेंज इज कॉन्स्टंटअसं पूर्वीपासून म्हटलं जातं. जगात एकमेव गोष्ट स्थिर आहे ती म्हणजे परिवर्तन. मुळात बदलांकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलणं आज अत्यावश्यक झालं आहे. प्रगतीच्या दृष्टीने ते गरजेचं आहे. कारण बदल हा अपरिहार्य आहे, त्यामुळे त्याला घाबरण्यापेक्षा धाडसाने सामोरं गेलं पाहिजे.

बदल हा आपल्याभोवतीच्या प्रत्येक परिघात होत असतो. स्व, परिवार, शाळा-महाविद्यालये, कार्यालये, समाज, शहर-गाव, राज्य, देश, विश्व या प्रत्येक घटकाला बदलांना सामोरे जावे लागते. पण अनेकदा या बदलांना स्वीकारण्याऐवजी या बदलांची अनामिक भीती मनात दाटून राहाते. शाळेतून महाविद्यालयात जाताना त्या बदलामुळे वाटणारी भीती, कॉलेजातून नोकरीच्या ठिकाणी जाण्यातली भीती, नोकरीच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांची भीती, नोकरीत टिकून राहण्याच्या आव्हानाची भीती, जीवनात नव्याने सुरू होणाऱ्या सहचरासोबतच्या सहजीवनाची भीती, आर्थिक जबाबदाऱ्यांची भीती, व्यावसायिक बदलांची भीती, सार्वजनिक जीवनातील बदलांची भीती अशा अनेक बदलांना आणि त्यामुळे मनात दाटून येणाऱ्या अनामिक भीतीला आपण तोंड देत असतो.

मुळात स्थैर्यात सुखी असण्याची, कम्फर्ट झोनमध्ये समाधानी असण्याची माणसाची मानसिकता असते. अस्थिर वातावरणात त्याला असुरक्षित वाटतं. त्याउलट स्थिर आणि शाश्वत वातावरणात आपल्याला भविष्याचं प्लानिंग करता येतं, असं सामान्यांना वाटतं. पण खरं तर परिवर्तनाच्या प्रक्रियेदरम्यान भीतीच्या, असुरक्षिततेच्या पलिकडे जाऊन सकारात्मकतेने बदलांचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जोपर्यंत माणूस हे बदल सहजपण स्वीकारत नाही तोपर्यंत त्या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणं शक्य होणार नाही. बदलांचा स्वीकार हा आपल्याला गतीशील करू शकतो. जगाच्या वेगाशी एकरूप होणं यामुळे शक्य होणार आहे.

काही वर्षांपूर्वींपर्यंत वीस-पंचवीस वर्षांच्या काळात बदलांची प्रक्रिया व्हायची. गेल्या काही वर्षांत मात्र दशक नव्हे तर दर तीन चार वर्षांगणिक आपण बदलांना सामोरे जात आहोत. या बदलांमध्ये जीवनशैलीचा बदल आहे, रूटिनचा बदल आहे. स्वयंपाकघरातील वावरापासून ते कार्यालयीन कार्यशैलीचा बदल आहे. व्यावसायिक व्यवहारांमधला बदल आहे. बघा ना, अनेक वर्षांपर्यंत आपण कागदोपत्री व्यवहारांद्वारे कार्यालयात कामं केली. मग हळू संगणकीय व्यवहार होऊ लागले, तरी डॉक्युमेंटेशन किंवा दस्तावेजीकरण हे कागदोपत्रीच होत होतं. कोविडपर्यंत आपण बऱ्याच अंशी संगणकीय डॉक्युमेंटेशनवर शिफ्ट झालो. कोविडमुळे मात्र आपण अपरिहार्यपणे मोठ्या बदलांना सामोरे गेलो. पूर्णपणे ऑनलाईन कार्यप्रणालीवर शिफ्ट झालो. शिक्षणापासून सर्व काही ऑनलाईन पद्धतीने व्हायला लागलं. या बाबतीत जसे विद्यार्थी अननुभवी होते, त्याचप्रमाणे शिक्षक, शिक्षणसंस्थादेखील अननुभवी होत्या. पण आपण या सगळ्या बदलांना सामोरे गेलो आणि दोन वर्षं त्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांनाही.

बदलांना सामोरे जाताना येणारा ताण सांभाळण्यासाठी कोपिंग मेकॅनिझम्स म्हणजे सामना करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कल्पक यंत्रणांचा उपयोग होतो. जीवनातल्या अनेक बदलांमध्ये मानवी मनावर सकारात्मक व नकारात्मक असा दोन्ही प्रकारचा परिणाम होतो. कोपिंग मेकॅनिझममध्ये अनेक मुद्द्यांचा अंतर्भाव होतो. स्वतःकडून अतिरिक्त अपेक्षा न ठेवणं, आपल्या प्रश्नांबाबत इतरांशी चर्चा करणं-त्यांची मदत घेणं, सुपरवुमन किंवा सुपरमॅन होण्याचा अट्टाहास न बाळगणं, शाळा-महाविद्यालयात, कार्यालयात वा अन्यत्र सार्वजनिक ठिकाणी संबंध चांगले ठेवणं, ताणाच्या क्षणी आपल्या भावना वहीत नोंदवणं, वाईटात वाईट काय होईल ते स्वीकारण्याची तयारी ठेवणं, चांगलं झाल्यावर त्यांचा सहज स्वीकार करणं, कार्यशैलीचा बदल स्वीकारताना चिडचिड करण्याऐवजी ते तंत्र आपल्या फायद्यासाठीच आहे याचा विचार करून शिकण्याची तयारी ठेवणं, त्यानुसार आपलं रुटिन सेट करणं, सातत्यपूर्वक शारिरीक कसरत व्यायाम करणं, घरच्यांसोबत/सहकाऱ्यांसोबत गेम्स खेळणं, सहवासाचा आनंद घेणं, शरिराबरोबरच मनाचाही व्यायाम करणं, छंदामध्ये स्वतःला गुंतवणं या सगळ्यांच्या साथीने आपण बदलांचा सहज स्वीकार करू शकतो. कारण जोवर आपल्या चित्तवृत्ती सकारात्मक असणार नाहीत तोपर्यंत बदलांचा स्वीकार होणं शक्य नाही. यामुळेच आज अनेक कार्यालयांमध्ये टीम बिल्डींगवर, मोटिव्हेशनल विचारांवर विविध लेक्चर्सचं आयोजन करण्यात येतं. या सर्वांसोबत बदलांना सामोरं जाताना योग्य आहाराचाही विचार करणं आवश्यक आहे.

बदलांना सामोरं जाताना थोडे दिवस लोकमाध्यमांपासून म्हणजेच सोशल मीडियापासून थोडे दिवस दूर गेलेलं बरं. आपली जशी मानसिकता असते तशाच पोस्ट आपल्याला दिसत राहतात. फेसबुक अल्गोरिदमचा तो परिणाम असते. त्यावर आपण वेगळा लेख पाहूच. पण तूर्तास, आपण काही वेगळे सुरू करणार असू वा बदलांना तोंड देणार असू तर मन आणि मेंदू शांत असणं अत्यंत आवश्यक. त्यामुळे अशा वेळी, मनाला भरकटवणारे किंवा मनात विविध विचार पेरणारे कंटेंट्स न पाहणं श्रेयस्कर. त्यामुळे कामात, शिक्षणात, दिनचर्येत बदल होत असताना सोशल मीडियावरून छोटा ब्रेक घेतलेला चांगला.

आपण अनेकदा नोकरी बदलतो, काहीवेळा चक्क आपलं प्रोफाईल बदलतो, कधी शाळा-कॉलेजच्या सुरक्षित वातावरणातून वेगळ्या वातावरणात प्रवेश करणार असतो. अशा वेळेस स्वतःला थोडासा वेळ देणं गरजेचं असतं. तुम्ही एक नोकरी सोडून दुसरी स्वीकारणार असाल तर त्यामध्ये छोटासा ब्रेक घ्या. त्याचप्रमाणे शिक्षण संपून नवी नोकरी जॉईन करणार असाल तर थोडे दिवस बाहेर जाऊन या, पुस्तकं वाचा, सिनेमे बघा, गाणी ऐका किंवा काहीही करू नका. पण चार दिवस तरी जुनं रूटिन विसरा आणि बदल स्वीकारा. ज्यांना आवड असेल त्यांनी नवे कपडे खरेदी करा, पार्लरमध्ये जाऊन थोडंसं ग्रूमिंग करा.

बदल हा आपलं आयुष्य ढवळून काढण्यासाठी नाही तर नवं काहीतरी सुरू करण्यासाठी होत असतो. एखादी गोष्ट संपते तेव्हाच नवी गोष्ट सुरू होते. वळण येतं तेव्हाच नवी वाट दिसून येतो. विविध गोष्टींचा अवलंब करून बदलांचा सकारात्मक स्वीकार करण्याने जीवनाचा नवा अंक सुरू होतो. बदल स्वीकारूया आणि जीवनाला चीअर्स म्हणूया.

- मृदुला राजवाडे