कथा तुळशीची..व्यथा स्त्रीजन्माची..!

युवा विवेक    05-Dec-2023
Total Views |
 
कथा तुळशीची..व्यथा स्त्रीजन्माची..!
 
तुळशीच्या ओल्या सावळ्या पानांवर अलगद स्पर्शून आहे कृष्णभावाची तरल मोहकता. वार्याची हलकी झुळुक आल्यावर.. कृष्णाला प्रत्यक्ष रुपात पाहून आनंदाने हलकेच थरथरावे राधेचे लालस ओठ तसं अलगद लहरत्ं तुळशीचं पानन् पान. मुलापासून ते मंजिरीच्या टोकापर्यंत गुणलालित्याच्ं वरदान घेऊन आलेली ही वृन्दा म्हणजे कृष्णभक्तीचं एक समूर्त आणि सर्वांगसंजीवक रुप वाटतं. भारतीय घराच्याच नाही, तर अगदी मनाच्याही आंगणात तिला अनंत काळापासून विशेष स्थान लाभल्ं आहे. जो मुळातच आकर्षणारा त्याला आकर्षित कराणारी ही कृष्णा
दिवाळी साजरी झाली, की वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे. तिच्या विवाहाचा काय तो थाट ! किती तो आनंद ! एखाद्या हाडामासाच्या माणसाच्या विवाहप्रसंगी करावा तसा सोहळा सजतो. माणसं सजतात, आनंद फुलून येतो, उत्साहाला उधाण येतं! भारतीय संस्कृतीत या तुळशीचे महत्व अनन्यसाधारण आहे. तिच्या अस्तित्वाचा गंध नाही, ते भारतीय घरच नाही असं म्हटलं तरी वावगं ठरायचं नाही! फक्त या वाक्यातील वर्तमानाचा भूतकाळ होईल तेव्हाच ते वास्तव..म्हणावी का ही अवनती माणसाची ? प्रश्न! असो. पण म्हणूनच तिच्या विवाहाचं महात्म्यही अद्वितीयच. तुळशी विवाहात, तिचे कन्यादान करण्याच्या पुण्याबळावर माणूस मोक्षास प्राप्त होतो, इतके हे महत्कार्य! अशी आई
पण हा विवाहप्रसंग दर वर्षी कसा काय ? त्याच दोघांचं लग्न आणि तेही दर वर्षी ? हा 'अद्वितीय' प्रसंग दर वर्षीच कसा काय द्वितीय..तृतीय..होत रहातो ? न जाणो आजवर कितीवेळा हे लग्न झालं असेल! ह्या विवाहतला आनंदसोहळा आपण नित्य नव्याने पहातोच, पण लोकसाहित्याने मात्र हा स्त्रीजन्माचा दुःखधागा ससंवेदन, हृदयापाशी जपला आहे. याचं कारण म्हणजे या विवाहामागील कथा. ती अशी की,
फार पूर्वी, जालंधर नावाचा एक उन्मत्त राक्षस होता. साक्षात देवांसमोरही तो अजिंक्य ठरत होता. कारण, त्याच्यामागे असीम सामर्थ्य होतं ते त्याच्या पत्नीच्या पातिव्रत्याचं! काय हे बल म्हणावं पतिव्रतेच्या सतित्वाचं! असे असता, त्यावर कुणालाही विजय प्राप्त करणे केवळ अशक्य होते. तेव्हा नेहमीप्रमाणे सारे देव श्रीविष्णूंकडे गेले. आपली भयचिंता व्यक्त करुन काही करण्याची याचना केली. जर जालंधराचा वध व्हायचा असेल, तर त्याचं सामर्थ्य भंगलं पाहिजे. आणि त्यासाठीच, 'कपटाने' श्रीविष्णूंनी जालंधराच्या पत्नीचे पातिव्रत्य भंगून टाकले. आणि जालंधराचा वध झला. त्याची पत्नी म्हणजे 'वृंदा'. देवांचे कपट कळल्यावर तिने पतिविरहाच्या शोकात विष्णूला शाप दिला, की तुलाही पत्नीविरहाचं दुःख सहन करावं लागेल! पुढे, रामावतारात हेच घडलं. कृष्णावतारात कृष्णानी वृंदेशी विवाह केला. ही वृंदा म्हणजे तुळस! आजवर कित्तीवेळा तिने तिचे कृष्णपत्नीत्व सिद्ध केले, सिद्ध करताहे आणि करतही राहील, दर वर्षी त्याच्यासह विवाह करुन.
ही अंतःकरणाला बिलगून असलेली सल आहे, स्त्रीमनाची, स्त्रीजातीची. जी वारंवार प्रतिबिंबित झालेली दिसून येते, स्त्रीवांग्मयात.
तुळशी गं बाई, तुला न्हाई नाक डोळे
तुझ्या सावळ्या रुपाला, कसे गोविंद भुलले ?
असा प्रश्न त्याच स्त्रिया सहज विचारुन जातात.
रुक्मिणी म्हने काय, तुळशी बाईचं ग देणं
पांडूरंगासंगे, वर्षावर्षाला लगीन !
इथे कृष्ण, गोविंद, पांडूरंग जसा एकच, तशीच ती लोकवांग्मयातली निरक्षर स्त्रीही त्या तुळशीला आपल्यातलीच एक समजते. आपल्यावरचे अन्याय, बोलताना अबोल होणार्या मनोयातना ती जोडू बघते तुळशीपाशी, आणि व्यक्त होतात अश्रू एकाएका ओवीतून.
मग सांगावसं वाटतं तुळशीला काही..स्त्रिवान्गमयाच्याच धाग्यातून, त्याच जातीवरच्या ओवीचे माध्यम वापरुन..
दर वरषी लगिन, कशी अशी तुझी रित
किती वेदना जीवाला, कुनी नाहीच बोलत !?
तुजा आनंद लगीनाचा, किती जुना शिळा झाला
माझे कृष्णच पती गे, का सांगते जगाला ?
जग बोलते बोलते, जग हसते खेळते
बोल तयांचे ऐकून, 'तुच' रडते सोसते
दरवरषी प्रमाण, का देते तू जगाला
जग तसेच राहील, आदि सांग तू मनाला
माजे तुळशी गं बाई, नगं आता तू रडूस
बघ आलेत श्रीहरी, अश्रू जन्माचे तू पुस !