पैल तो गे काऊ कोकताहे..
माउलींची विरहिणी इतक्या उत्कट सुकुमारपणे साकार होते, की ती वाचूनही एखाद्या रसिक मानत ब्रह्म रसाचे कल्लोळ उठावे! माऊलींची शब्दकळेतआपण हरखून आणि हरवून जातोच, पण निसर्गाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी आणि ते समर्थपणे पेलण्याचं सामर्थ्य आपल्या जागोजागी अचंबित करून जातं. त्यांच्या विरहीणीला निसर्गातील घटक अन् घटक सांगतो ती विठ्ठलाचीच खुण! आकाशातले मेघ, भूमीचे मार्दव इतकंच काय, पक्षी सुद्धा विठ्ठलाचेच गुंजारव करतात! विरहिणी म्हणजे आपल्या प्रियाच्या तहानेने व्याकुळ झालेल्या कुणा गोपिकेचा अनुभव. त्याच्या हवेपाणाचा मोह आणि त्यातून निर्माण झालेली विरहाची काहीली! प्रश्न पडतो क्षणभर.. माऊलींनी विरहिणीच का लिहावी? प्रियाचंच रुपक का बरं करावं? पण उत्तरही हाती लगेचच येतं. माऊलींची रचना ही सामान्य सकळांसाठी आहे. म्हणूनच तर ती लोकभाषेत आहे. त्यांना पांडित्य प्रदर्शनाचा सोस नाही. पण आत्मीय कळवळा मात्र आहे. म्हणा, सूर्याला कुठे प्रकाशाचा दिखावा करायची हौस असते? पण जन'सामान्यांमध्ये जी प्रेमाची तरल आणि हवीशी भावना आहे, विरह आणि सोबतीची आस आहे, प्रिय आणि प्रियेचे अनुभव आहेत, त्याचंच उपयोजन भक्ती साठी केलं, तर हा विठ्ठलाचा अनुभव अगदी सहजी आतपर्यंत पोहोचेल ही जाणंच यामागे असावी. हेच विरहिणी लिहिण्यामागील प्रयोजन मानण्यामागे हरकत नसावी. पण याचसोबत एक गोष्टी महत्त्वाची, ती अशी की विरहिणक लिहूनही भक्ती परंपरा विकाराकडे वळलेली दिसत नाही. तिच्यातील भक्ती आणि भक्तभाव तितकाच शालीन जागा आहे.
'पैल तो गा काऊ' ही अशीच त्यांची प्रसिद्ध आणि रसोत्कट विरहिणी. खरंतर, कावळा हा तसा शुभ पक्षी मानला जात नाही. मोरासारखा मान तर त्याला मुळीच नाही! त्याचा रंग, रुप, आवाज, तसं काही आकर्षक किंवा ज्यातून दृष्टी सौख्य लाभावं असं काही नाही. काकदृष्टी इत्यादी कावळ्याशी निगडित शब्द तर चक्क अशुभ अथवा नकारात्मक मानतो आपण. पण तो देखील निसर्गातील एक घटकच तर आहे की! कसा का असेना. त्याच्या असण्यातील सौंदर्य तर या रूपातून दिसू लागतं! माऊलींनी ते म्हणतात त्याप्रमाणे 'राजहंसाचे चालणे, जगी जालिया मानणे' यानुसार भेद न करता कावळ्याकडे पाहिलेलं आहे. तो कावळा काव काव करतो.. ती का बरं? नुसती करीत नाही. सखा विठ्ठलाच्या आगमनाची वार्ता सांगण्यासाठी तो नाद निर्माण करतो आहे! कावळा दरी केकावत असला की कुणीतरी पाहुणा येणार हा लोकसंकेत आजही मोठ्या कुतूहलाने किंवा गंमतीने देखील जपला स्मरला जातो. इथे माऊलींने तेच म्हटलं आहे. तो कावळा आलाय म्हणजे पंढरीच्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. हा शकुन तो सांगतो आहे.
पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकूनगे माये सांगताहे ॥१॥
इथे खरं, पैल म्हणजे पलिकडे. तो कावळा पलीकडून ओरडत आहे. पण पैल म्हणजे वैकुंठाहून तो येतो आहे. नव्हे नव्हे, दूर असलेल्या पंढरीहून तो येतो आहे. तो येतो आहे, हा शकुनच कावळा सांगत आहे. अर्थात हे पहायला मनात विठूभाव तर हवाच. पण दृष्टी सुद्धा भक्तीभारली असावी लागते. ज्याप्रमाणे अद्वैतींना सर्वत्र परब्रह्माचाच अनुभव येतो, त्याप्रमाणे या श्रेष्ठ भक्ताला किंवा या विरहिणीला जळी स्थळी तोच दिसतो. त्याचे संकेत मिळतात.
उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानें मढीन पाऊ ।
पाहुणे पंढरीराऊ घरा कैं येती ॥२॥
इथे तर वाचकाला विस्मय वाटल्यावाचून राहात नाही. सोन्याचे अलंकार घालून कावळ्याचे पाय मढवण्याची गोष्ट माउली करतात. किती हे कौतुक कावळ्याचं! कौतुकाचं कारण म्हणजे तो विठ्ठलाची वार्ता सांगतो आहे. हा सोन्याच्या अलंकाराचा लोभ दाखवून पंढरीचे पाहुणे कधी बरं येतील हे सांगण्याची विनंती केली आहे. केवळ इथेच हा संवाद थांबत नाही. पुढे माउली म्हणते
दहिंभाताचीं उंडी लाविन तुझ्या तोंडी ॥
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगीं ॥३॥
तुझ्या तोंडी मी काय लावीन, तर दहीभाताची उंडी! पण त्याची आणि त्याच्या येण्याची गोडी मात्र मला कथन कर. त्याची गोडी मला सांग या बदल्यात किती सुंदर पदार्थ योजला आहे! मिठाई नाही तर दहीभात. दहीभाताची तुलना अमृताशी करण्याची रीत अगदी आताआताच्या गीतांपर्यंत आहे. तेव्हा त्याकाळात ती सांगणं सहज आहे. किंबहुना तिथूनच हा प्रघात सुरू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुधें भरुनी वाटी लावीन तुझे वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥
तुझ्या ओठी मी दुधाची वाटी लावीन बरं! पण मला सत्य सांग.. विठोबा येईल ना? कधी येईल? कधी?? कावळ्याचे किती हे कोड कौतुक म्हणावे! त्याला दुध देण्याचं कबूल केलं आहे. कारण विठोबा येतोय, लवकर येतोय, ही वार्ता त्या दुधासारखीच आहे. स्निग्ध, तरल, सात्विक, तोषक आणि त्याहूनही अधिक पोषक!
आंबयां डाहाळीं फ़ळें चुंबी रसाळीं ।
आजिचेरे काळीं शकून सांगे ॥५॥
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराणे शकून सांगे ॥६॥
माऊलींचं निसर्ग निरीक्षण, नव्हे निसर्गाचा रसास्वाद किती तरल आहे याचे दाखले त्यांच्या रचनांमध्ये ठायी ठायी दिसतात. त्यांचंच हे सुंदर उदाहरण - माऊली त्या कावळ्याला म्हणतात की अरे आंब्याची डहाळी, रसाळ फळं यांचं चुंबन करणारा असा तू, आता मला शकुन सांग. पांडुरंग येण्याचा शकुन हा देखील आंब्याच्या डहाळीसारखा हिरवागार, मंगल सांगणारा आणि शांत करणारा आहे. तो रसाळ आहे. मूळचा रसाळ तर आहेच, पण सोबतच माऊलींचा शब्दांतून ते परब्रह्म अधिकच रसोत्कट होऊन आपल्याला भेटतं हे आपलं भाग्य. शेवटी माऊली म्हणतात, की कावळ्याच्या या खुणेने पंढरीराय भेटण्याचा शकुन कळतो.
इथे आठवण होते, ती कालिदासाच्या मेघदूताची! इथे तर दूत हा कुणी दूरचा मेघही नाही. तो चक्क पक्षी आहे. कावळा आहे. पण आतुरता मात्र तीच (मेघदूतात आहे तीच) नसली, तरी तितकीच आहे. या इथल्या ओढीला भक्तीचा गंध आहे आणि पैलाची तहान आहे हे मात्र वेगळेपण. आज या संकेताचा विचार केला तर वाटतं, की आजही दाराशी कावळा ओरडत असेल, तर कुणीतरी पाहुणे घरी येणार असं अगदी सहज म्हटलं जातं. (पंढरीराव येणार असं म्हटलं जात नाही) पण तरीही, माउलीच्या अभंगातील धारणा आणि आताची ही धारणा बदलली असं म्हणता येत नाही. का? कारण 'अतिथी देवो भव' हा भारतीय संस्कृतीचा मंत्र याच्या मुळाशी वाटतो. पाहुण्यात विठ्ठल पाहण्याची वारकरी परंपरेची श्रद्धा इथे अधोरेखित होते.
आता जेव्हा दाराशी, खिडकीशी कावळा दिसेल, त्याचा आवाज ऐकू येईल, तेव्हा माउलींचा हा अभंग नक्की लक्षात येईल. कुणीतरी पाहुणा येण्याचा शकुन आणि त्यात दडलेला ईश्वरभाव, म्हणजे त्या पाहुण्यात, म्हणजे खरंतर प्रत्येकात असलेल्या विठू-तत्त्वाची या निमित्ताने आठवण होईल हा दुग्ध शर्करा योग. माउलीच्या शब्दासारखाच!
~ पार्थ जोशी