दिल्लीका दिल - कॅनॉट प्लेस

CP नावाने प्रसिद्ध आहे कॅनॉट प्लेस. इथे दुसरी खाऊगल्ली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

युवा विवेक    29-Dec-2023   
Total Views |
 
दिल्लीका दिल - कॅनॉट प्लेस
दिल्लीका दिल - कॅनॉट प्लेस

   CP नावाने प्रसिद्ध आहे कॅनॉट प्लेस. इथे दुसरी खाऊगल्ली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जनपथ लेनच्या मागे भोगल छोले भटुरे मिळतात. हे दुकान १९५७ पासून सुरु आहे. पानाच्या द्रोणात मटर कुलचे, छोले भटुरे, छोले चावल मिळतात. इथे छोल्यांमध्ये कोफ्ते टाकून सर्व्ह करतात. इथेच पान लस्सीही फेमस आहे. विड्याच्या पानात असतो तो पान मसाला लस्सीत मिसळला जातो. पान आईस्क्रीम असते तशीच ही लस्सी. छोले भटुरे खाल्यावर लस्सी आणि त्यानंतर पान असा क्रम असतो. त्यातल्या शेवटच्या दोन स्टेप्स एकच करून ही लस्सी बनवली आहे. अजूनही अनेक लस्सीचे प्रकार आणि छोले खाण्यासाठी लोक बाहेर उभे असतात.

   गणेश मच्छीवाला यांचे दुकान जवळपास १९४७ पासून सुरु आहे. श्री हरीचंद फाळणीनंतर दिल्लीत आले. दिवसभर हमाली करून संध्याकाळी हरिचंद खाण्याचा स्टॉल लावायचे. १९६० मध्ये प्रेमचंद यांनी हे दुकान सुरु केले. आज त्यांची तिसरी पिढी म्हणजे दीपक हे दुकान चालवतात. आजही दिपकजी स्वतः तुम्हाला पकोडे तळताना दिसतील. दुकानात २० कामगार असतांनाही फिश फ्राय तळतात. हे तळताना ते उकळत्या तेलात हात फिरवतात. तिसऱ्या पिढीपासून चालत आलेली ही शक्ती पाहण्यासाठी लोक आजही जमा होतात. इथे तंदुरी चिकन, अंडा पकोडा, चिकन शीख कबाब असे अनेक पदार्थ मिळतात. अंडे उकडून, सोलून, अख्या अंड्यांची भजी इथे मिळतात.

   पालिकाबाजारच्या जवळ आहे निझाम! इथे कबाब, फिरनी, रोल्स मिळतात. इथले काठी रोल्स खाण्यासाठी लोक दुरून येतात. अनेक स्टालवर आलू चाट मिळते. बटाट्याचे तुकडे तेलात तळून त्यावर चटणी, चाट मसाला भुरभुरून द्रोणात चाट दिले जाते. ज्या लोकांना आलू चाट खायचे नसेल त्यांच्यासाठी फ्रुटचाटही मिळते. हवे तसे आणि तितके फळ तुम्ही या चाटमध्ये टाकू शकतात. सीपीच्या आतल्या वर्तुळात १९२६ पासून एक दुकान आहे, वेनगर्स. इथे बेकरीचे पदार्थ मिळतात. साधे पदार्थ मिळण्याचीही २०-२५ मिनिटे उभे राहावे लागेल इतकी गर्दी इथे जवळपास रोज असते. १९४७ पासून शेक्स स्क्वेयर सुरु आहे आणि इथे नावाप्रमाणेच वेगवेगळे मिल्कशेक्स, स्नॅक्स मिळतात. शेक्ससोबतच, फ्लेवर्ड मिल्कही मिळते.

   गुरुद्वाराच्या पुढे गेल्यावर काकू कचोडीवाले यांचे दुकान आहे. आपण कचोरी किंवा पुरी म्हणतो पण दिल्लीत री च्या ऐवजी डी म्हणतात. कोणत्या काकूंनी हे कचोडीचे दुकान सुरु केले असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो पण त्याकडे दुर्लक्ष करून कचोरीवर लक्ष केंद्रित करावे. हनुमान मंदिराच्या बाहेरच बरीच खाण्याची दुकाने आहेत त्यापैकीच एक हे दुकान! गुरुद्वाराच्या जवळ अजून एक दुकान आहे. कुलचा जंक्शन. इथे अम्रितसरी कुलचे मिळतात. कुलच्यासोबत छोले, चिंचेची चटणी मिळते. साध्या स्टीलच्या कप्प्यांच्या प्लेटमध्ये मिळणारा हा पदार्थ दिसतो साधा पण एकदा खाल्लं की तुम्ही त्याचे पंखे नक्की व्हाल. हे सगळे खाण्याआधी गुरुद्वारात जाऊन दर्शन घेणे अपरिहार्य!

   डीपॉल नावाचे एक दुकान आहे. जनपथवर शॉपिंग करून झाल्यावर इथली थंडगार कॉफी न पिता पुढे जाऊच शकत नाही. रेग्युलर, हेझलनट, कॉफीटॉफी अशा अनेक फ्लेवरमध्ये इथे कॉफी मिळते. प्लॅस्टिकच्या बॉटल्समध्ये कॉफी बनवून फ्रिजमध्ये ठेवली असते. गेल्यावर लगेच मिळते. गरम कॉफी प्यायची असेल तर इंडियन कॉफी हाऊस आहे. इथे गेल्यावर तुम्हाला अचानक ब्रिटिशांच्या काळात गेल्यासारखे वाटू शकते. जवळच जैन चावलवाले आहे. इथे प्रचंड गर्दी असते. कढीचावल, पापडवाले चावल, राजमा चावल आणि शिकंजी लोकांच्या आवडीची आहे.

   १९४३ पासून सुरु असलेल्या पांडे यांच्या पानाच्या दुकानात मिशेल ओबामा, डोनाल्ड ट्रम्प यांनीही पान खाल्ले आहे. एखाद्या आईस्क्रीम पार्लर किंवा मिठाईच्या दुकानात जसे मिठाई ठेवली असते तसे काचेच्या आड पान ठेवलेले असते. इथे आईस्क्रीमच्या कोनमध्ये कॉर्नेटो सारखे दिसणारे वॉफल स्वीट पान मिळते. यात चॉकलेट, ब्लूबेरी असे वेगवेगळे फ्लेवर मिळतात. इथले कोन मक्याच्या पिठापासून बनवले जातात आणि फ्रिजबाहेरही एक महिना राहू शकते. गेल्यागेल्या पान निवडायचे आणि पोटभर खाऊन झाल्यावर पोटभर पानही खायचे. पानाला इंटरनॅशनल बनवण्यासाठी पांडे कुटुंबाचे प्रयत्न सुरु आहेत. परदेशात डेझर्ट म्हणून या पानाला जागा मिळावी याकडे त्यांचे लक्ष आहे. मक्याच्या पिठाचा कोन, आत चॉकलेटचे कोटिंग आणि त्याच्या आत पान! या पानात आंब्यापासून ते ब्लूबेरी जॅम पर्यंत सगळे फ्लेवर मिळतात.

   सीपीपासून थोडेसे दूर मार्केटजवळ १९५८ मध्ये सुरु झालेले गुलाटी नावाचे रेस्टारंट डिनर किंवा फाईन डायनिंगसाठी छान आहे. एकेकाळी ढाबा होता पण आता या रेस्टारंटने कित्येक अवॉर्ड्स जिंकले आहेत. इथले बटर चिकनलाही अवॉर्ड्स मिळाले आहेत. स्ट्रीटफूडच्या हिशोबात इथे सगळे काहीसे महाग वाटू शकते पण अर्धी प्लेटसुद्धा ३-४ लोकांना पुरु शकते इतकी असते.

   एक निरीक्षण केले तर लक्षात येईल कि बटाटे, छोले, तूप/बटर/तेल आणि मैदा यांचे ट्रक भरून सामान इथे रोज येत असणार. सगळ्या पदार्थात आलटून पालटून हेच मुख्य साहित्य आहे पण चव मात्र कमाल! तब्येत, डायट वगैरे घराच्या फ्रिजमध्ये ठेऊन आलात तर इथे सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेणे सोपे होईल.