तटस्थ म्हणून जगताना....
दररोज हजारो ज्वाळापेटत राहतात
कधी डावीकडून
कधी उजवीकडून
वरून पावसाची बरसात होईल एक दिवस
अशी आशा घेऊन मी जगत राहते माझी माझी
पण पाऊसच तो
कधी यांना नकोसा
कधी त्यांना नकोसा
फक्त आपलीच परिस्थिती लक्षात
घेऊन चालत राहणाऱ्या
स्वार्थी पुतळ्यांच्या या लढाईत
आम्हां तटस्थांचा आवाज, मान, भविष्य आणि माणूसपण
या साऱ्याचेच तुकडे तुकडे होतात अगदी
या साऱ्याचा वीट येऊन
किनाऱ्यापासून मध्यापर्यंत यावं
तर कोणताही मध्य हा
पाय सटकून आपण बुडून जावं असा
आधाराला हात काय काठीही मिळू नये असा.
त्या गर्तेत तरण्याचे, पोहण्याचे बळ मिळणेही कठीण.
या साऱ्यात राहुन जातं ते
समोर दिसणाऱ्या प्रवाहाशी एकरूप होणं
कुठेतरी उगम पावणं,
कुठेतरी विलीन होणं.
चौफेर उडणाऱ्या आगीच्या भडक्याला
नवी रूपे घेऊन शांत करणं.
या तटावर उभं राहून हाच विचार करते मी
हळू हळू हा प्रवाह वाढत जावा,
त्याची व्याप्ती वाढत जावी
मी उभी आहे ती जमीन सुद्धा त्यानेच व्यापून जावी
अन् एकदिवस
या पेटणाऱ्या ज्वाळा,
उजवीकडच्या आणि डावीकडच्या सुद्धा!
- मैत्रेयी