प्रश्न पडतो! दरवर्षी, वर्षान्ती, शुभेच्छा व्यक्त करायला नवा शब्द कुठला लिहावा? कुठली कविता, कुठला लेख आणि कुठलं साहित्य निर्माण व्हावं ? 'त्याच' शुभेच्छा नव्यानं द्यायला ? हवं असतं 'असं' काही, ज्यात असेल आनंद, अपूर्वाईने ओथंबलेला! ज्यात असेल सामर्थ्य, आतल्या उन्हामधेही नवी कोवळी पालवी फुलवण्याचं! असे असता, कुठून लिहावा असा शुभेच्छांचा नवा शब्द? दरवर्षी, त्याच त्याच प्रसंगाला...?
पण प्रसंग असतो का, 'तोच' ?
वाटतं, संपत जातो एकएक दिवस कधी काही देऊ करुन, तर कधी काही घेऊनही. कधी आनंद असतो काही मिळाल्याचा, तर कधी काही कमी झाल्याचाही! 'बदलच जिथे शाश्वत असतो' अशा जीवनात, जिथे सतत सुरू असते रेलचेल, जाणवणाऱ्या, न जाणावणाऱ्या, समूर्त आणि अमूर्त गोष्टींची, अशात कुठून द्याव्यात वेगळ्या शुभेच्छा ? आणि कोणत्या ? हा प्रश्न खचितच अंतर्मुख करणारा ठरतो.
द्याव्यात शुभेच्छा, इतरांसोबत, आपणच आपल्याला! आपल्या शुभेच्छांच्या, त्यांतील भावनांच्या अंतरात डोकावून. कारण जो पाहातो, त्याला दिसतं! आत काही असेल, तरी स्पष्ट दिसतंं आणि नसेल, तरी अचेतन जाणीव स्पष्ट होते! कारण बघायला गेलं, तर बदलतो तो वर्षाचा एक आकडा. कदाचित शुभेच्छा शब्द आणि ज्यांना शुभेच्छा द्यायच्या त्या माणसांच्या संख्याही. पण फक्त इतकंच नाही. बदलत जातात त्या शुभेच्छांमधील अव्यक्ताच्या संज्ञा. कळत जातं न कळलेलं, अनुभवालाही स्पर्शून जातं क्षणभर. आणि वर्ष संपताना का होईना पण जाणवली जाते विस्तारलेली आपली भूमिका, आपल्यालाच! तेव्हाचे शब्द तेच असले, तरी तेव्हाचे आपण, हे आताचे आपण निश्चितच नसतो. कारण, क्षणाक्षणांतून विस्तारत जात असतात आपल्या जाणिवा. कळत नकळत, जीवनरसाचं सौंदर्य वास्तवासह आणत असतात आपल्या दृष्टीक्षेपात. किंबहुना, आपली दृष्टी तिथपोत नेऊन ठेवत असतात.
शुभेच्छा शब्दांची विहिर वरुन तिच दिसत असली, तरी वाढत असते तिची खोली, आणि हाती लागत असतं 'नवं पाणी', मुरत असतो आपण त्या ओलाव्यात, जीवनात!
त्या पाण्यासाठी कुणाची असते ती विहिर, वैराग्याच्या प्रखरतेने खणलेली, तर कुणाची प्रेमाच्या आतुरतेने. पण लागत जातं 'नवं' पाणी, कारण आपले ते हातही बदलत असतात. बदलत असते त्याची उत्कटता, जीवनाच्या आकाशी विस्तारताना परिपक्व होत असते दृष्टी, अस्तित्वाच्या मुळाशी!
त्यामुळे शब्द तेच असले, तरी ते तेच नसतात! आणि तसेच, आपणही!
असे जाणता, जाणवता, येतो नवा हुरुप, शुभेच्छा संदेशाचा अव्यक्त अक्षर-भाव शब्दबद्ध करण्याचा. कारण, हाच तो क्षण! स्मृतिगंधाच्या विस्तारलेल्या संचिताची जाणीव करुन देणारा. परिपक्व झालेल्या दृष्टीच्या जाणिवेतून, नव्या ध्येयांची निश्चिती करण्याचा! निसटलेल्या अनेक गोष्टींची खंत आणि अनेक पांतस्थांच्या दूर जाण्याचं दुःख क्षणभर अनुभवून, जगून, त्यातून बाहेर पडणाचा! जीवनरंग साजरा करण्यासाठी दोन्ही बाहू विस्तारुन आपल्यासाठी आतुर असलेल्या नव्या, सोनेरी क्षणमालिकेचं, स्वागत करण्याचा! उंबरठ्यावर, नव्या स्वप्नांची चाहूल लागण्याचा! आणि अशा स्वप्नसुंदर क्षणात, नवा प्रवेश सानंद करण्याचा! क्षण, आनंदाचा!
क्षण, आनंदाचा!
मग अशा नव्या उत्कटतेत द्याव्याशा वाटतात शुभेच्छा, मुक्तपणे! तेव्हा पर्याय नसतो मुक्तछंदाला!
जीवनाच्या कवितेला, नव्याने समृद्ध करण्यासाठी..
कारक होऊन आनंदाचं,
येत आहे एक यमक, काहिच क्षणांत!
ज्यात असतील नानाविध रस
आनंदाचे उत्कट शिंपण,
आणि हलक्या उन्हात डोलत असतील, सावलीच्या आनंदखुणा...
आल्हादाच्या अनुभवात, असतील शांतवलेल्या तुष्टभावना
ज्यात असतील नवे शब्द, असतील नवे अर्थ
आणि असेल ते उलगडायचं नवं सामर्थ्यही!
असतील नाना रसांत सुगंधी झालेले क्षण
आणि झालाही असेल रसिकत्वाला, परतत्वाचा स्पर्श!
येत आहे असं यमक,
जीवनाच्या समृद्धीचं, स्वप्नपूर्तीच्या सोहळ्याचं, द्योतक होऊन!
कृतार्थतेच्या अनादी श्वासाची, एक नवी जाणीव घेऊन!
अनाहताच्या झंकाराचा, एक निःशब्द अनुभव घेऊन!
येत आहे नवं वर्ष, सोबत माझ्या शुभेच्छा घेऊन!
या सुंदर उंबरठ्यावर, उत्कटतेच्या ओलाव्यातून,
आपल्याला व आपल्या परिवाराला नूतन वर्षाच्या मनःपूर्वक अनेकोत्तम शुभेच्छा!!
~ पार्थ जोशी