परांठेंवाली गली
एखाद्या शहरात गल्लीचे नाव "पराठेवाली गली" ठेवले जाते यावरूनच शहरातील लोक किती खवय्ये आहेत पुरावा मिळतो. दिल्लीत चांदणीचौकमध्ये शीशगंज गुरुद्वारासमोर एका गल्लीसमोर लहानशी पाटी दिसते. त्यावर परांठेंवाली गली वाचून आपली पाऊले आपसूक तिकडे वळतात. गल्लीत साड्यांच्या दुकानांची रांग दिसते त्याकडे दुर्लक्ष करून आपण पराठ्यांची दुकाने शोधावी. या गल्लीत सर्वांत जुने रेस्टारंट शोधून तिथे पराठ्यांचा आस्वाद घ्यावा असा तुम्ही एक पर्यटक म्हणून विचार करत असाल तर अजून गोंधळात पडाल. कारण बरीच दुकाने चक्क १२० वर्षांपेक्षा जुनी आहेत.
१६५० मध्ये लाल किल्ला बांधला त्याचवेळी चांदणीचौक बांधला गेला. या चांदणीचौकात पूर्वी भांडी मिळायची आणि हळूहळू खाण्याची दुकाने सुरु झाली. आता कनैय्यालाल दीक्षित यांचे पराठेवाला नावाचे दुकान १८७५ पासून सुरु आहे. हे इथले पहिले दुकान होते असे म्हणतात. आता सहावी पिढी लोकांना पराठे खाऊ घालते आहे. अशीच किमान पाच-सहा दुकाने तुम्हाला दिसतील.
पराठे म्हणजे तव्यावर थोडे जास्त तेल किंवा तूप टाकून भाजतात असा तुमचा समज असेल तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. इथे शुद्ध तुपात पराठे तळले जातात. काही दुकानात अर्थात वनस्पती तूप किंवा तेल वापरतात पण जुन्या दुकानात अजूनही तुपात खरपूस तळलेले पराठे मिळतात. यांना पराठे नव्हे तर परोठे म्हणतात. कितीही किटो डायट करत असाल तरीही हे परोठे खाणे तुम्हाला जड जाणार आणि अशा वेळी तवा पराठाही मिळतो. दिल्लीच्या थंडीत लोक दुरून चालत येऊन हे पराठे खायचे म्हणून त्यांना पचणे जड जात नव्हते पण आपल्यासाठी त्यांनी या परोठ्यांचे मिनी व्हर्जन काढावे अशी माझी तरी इच्छा आहे.
व्हेज, आलू आणि पनीर पराठे तर सर्वांनाच आवडतात पण इथे पापड, डाळ, खुर्चन पासून भेंडी, रबडी यांचेही पराठे मिळतात. एरवी आपण सॉस, केचप किंवा फारतर चटणी यासोबत पराठे खातो पण इथे तुम्हाला २-३ भाज्या आणि स्पेशल केळीची चटणीवजा कोशिंबीर मिळते. गोड चिंच खजुराच्या चटणीत केळीचे काप असतात. यासोबत पराठे खायची कल्पना कोणाला आणि का सुचली असेल याचे उत्तर मला अजूनही मिळाले नाहीये. लाल भोपळ्याची भाजी, आलू-मटार भाजी, हिरवी चटणी आणि केळीची कोशिंबीर हे सगळे एका ताटात मिळते आणि दुसऱ्या ताटात तुमच्या आवडीचे परोठे. गरमागरम पराठ्यांचा आस्वाद घेतल्यावर शेवटी गोड खायचे असेल तर रबडी पराठा असतोच! हे सगळे पारंपरिक प्रकार आणि या व्यतिरिक्त मग नवीन दुकानात फ्युजन परोठे मिळतात.
याहून वेगळे काही गोड खायची इच्छा झाली तर १८८५ पासून एक जिलेबीवाला आहे तिथे इंदोरची प्रसिद्ध रबडी जिलेबी खाता येते. इतके सगळे खायचे तेही दिल्लीच्या ताज्या हवेत म्हणजे खूप हिम्मत हवी आणि ती हिम्मत दिल्लीकरांमध्ये आहे. आपण कधीतरी तिकडे गेलो तर, आहेच काय इतकं या गल्लीत? असं म्हणून या सगळ्या पदार्थांचा आस्वाद नक्की घ्या.