काजव्याचं तेज पाहून सूर्याने स्थिरावं, त्याला आश्वस्त वाटावं, असाच हा तेजोमय काजवा. दृष्टीत मावणार नाही अशा अनंत भास्कर तेजाला सावलीनी माया द्यावी, अशी ही मुक्ताई. सूर्याला सावली देण्याचं हिचं विलक्षण सामर्थ्य. एखादी स्वयंतेजस्वी शाश्वत वीज कन्यकारुपात प्रकटावी अशी ही मुक्ताई!
निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव तिघा भावंडांची बहिण. नव्हे नव्हे, खरं तर आईच! साऱ्या घराचा खंबीर आधार, प्रत्येकाला सावरणारी ही निर्मळ कोवळी कलिका वाटावी; पण तिच्यामधे आत्मज्ञानाचं कमळ केव्हाच फुललं होतं. ही श्रेष्ठ भगिनी तर होतीच; पण त्याहीपेक्षा होती ती अलौकिक योगिनी. बालवयातील आपल्या परखड शब्दांमुळे अनेकानेक अवमान तिने खंबीरपणे सोसले; पण कधीही तिने कुणाला अनुचित शब्दांने दुखावलं नाही. ना तिने आईवडिलांना दोष दिला, ना परिस्थितीला. कारण ती सारं जाणून होती. आपल्या भावंडांचे अश्रू पुसताना न जाणो किती वेळा तिने तिच्या धारांना बांध घातला असेल. खंबीरपणे उभा असणारा हा साऱ्या कुटुंबाचा भक्कम खांब, तप्त परिस्थितीच्या लौकिक उन्हातही शीतल चांदणी होऊन अलौकिक शीतलता देणारी ही मुक्ताई म्हणजे उभ्या अलंकापुरीचं भाग्यच! अर्थात तिच्या त्या जाणिवेची जाणीव तेथील सामान्यांना तेव्हा नव्हतीच; पण नंतर साऱ्यांनाच पश्चाताप झाल्यावाचून राहिला नाही.
विशाल अशा सूर्याला एखाद्या काजव्याने शिकवावं, आपल्या चैतन्य सामर्थ्याने, त्याचा अहंकार दूर करावा असेच काहीसे झाले. नामदेवांसारख्या भक्तश्रेष्ठाला अजून मडकं कोरय, हे म्हणण्याचं किती तुझं धैर्य! तो अधिकारच तुझा! ज्या वयात बाहुल्यांशी खेळण्यात रमावं, त्यांच्याशी खेळण्यात, बोलण्यात वेळ घालवावा, मनमुराद हसावं, अल्लडपणे खेळावं, मनमुक्त रडावं अशा वयात तूही बोलत होतीसच की, पण, विठाईशी! तूही खेळत होतीस, भक्तीच्या अलौकिक सोपानावर! तसं बघायला गेलं तर, हसायला तुझ्याकडे कारणही नव्हतं. पदोपदी अवमान सहन करत, तू जगत होतीस, जगवत होतीस, काळजी करत होतीस, तीनही भावंडांची आई होऊन. रडण्यासाठी तर तुझ्यासमोर चहूबाजुंनी अनेकानेक गोष्टी होत्या, अगदी मनातही! परिस्थितीला दोष देत, माणसांना दोष देत, रडत खडत तू सहज दयापात्र होऊ शकली असतीस. मुलगी असल्याने, त्यातही वयाने लहान असल्यामुळे साऱ्यांनी तुझ्याचकडे बघावं, तुझे हट्ट पुरवावेत, असंही तू सहज म्हणू शकत होतीस; पण, तू तसं केलं नाहीस. अमानवी निष्ठुरता सोसलेल्या त्या कोवळ्या आसवांमागे उभी राहिलीस, तूच. नखशिखांत अंधार भरलेल्या परिस्थितीत तूच भारावून टाकलंस संपूर्ण जगताला, तुझ्या सूर्यसमर्थ अशा ज्योतीने. ज्ञानाने ताटी उघडली ती केवळ तुझ्या शब्दांनेच. ते सामर्थ्य होतं शब्दांचं, नव्हे, तर 'तुझ्या' शब्दांचं! तुझ्या अमृतवाणीने ज्ञानाने ताटी तर उघडलीच; पण तिच्या सहाय्येच, आज अनेकानेक लोक अज्ञाताच्या अज्ञानाची ताटी उघडताहेत. तुझ्या जिव्हेवरील शारदा, हस्तातील शब्दब्रम्ह, केवळ थक्क करणारं आहे. तुझ्या स्मरणातून, ओव्यांतून, अभंगातून तू आजही स्पर्श करतेस भक्तांना. साऱ्या जगताची माऊली म्हणून ज्ञानाईकडे सारे बघतात; पण, ह्या ज्ञानाईचा आश्रय, त्याच्या डोक्यावरुन फिरणारा स्नेहहस्त म्हणजे फक्त तूच! या ज्ञानाच्या अनंत ज्ञानसागराचा किनारा म्हणजे तू. ज्ञानाची, तत्वज्ञानाची तप्तता सहन न होणाऱ्या सांसारिक प्रापंचिकांना भक्तीची आश्वासक, सहज आपलीशी करता येणारी, उबदार शाल दिली ज्ञानाने; पण त्याची झालर? त्याची झालर मात्र तूच! समाधी घेतली जेव्हा ज्ञानाने तेव्हा ढाळत होतीस तू अश्रू आणि आठवत होतीस मनोमन, त्या एकएक न संपणाऱ्या रात्री. काही काळापासून, सारी आळंदी तुझ्या पाया पडत होती; पण आत्तापर्यंत तू सोसलेले चटके, कुणालाच दिसले नव्हते, दिसतही नव्हते! पण तरीही, तुझं मन आभाळाएवढं, त्याहूनही थोडं जास्तच. तू देत आलीस आशिर्वाद सगळ्यांनाच, पूर्वीचं सारं सारं विसरुन. ज्ञानदादाच्या समाधीदिनी मात्र लपवू शकली नाहीस तू अश्रू. सारं काही जाणून होतीस तू; पण तरीही, या रुपात अशक्य असणाऱ्या काळाला थांबवू न शकल्यानं, तू ढाळत होतीस अश्रू आणि गाळत होतीस नव्यानं, त्या, इथल्या आठवणी आणि मग, मग एकरुप होऊन गेलीस तू लखलखत्या विजेशी! किती ती तुझी शुद्धता, निर्मळता, शब्दातीतच! तुझ्या साऱ्या कार्याची इतिश्री तू केलीस त्या मूळच्या शुद्ध स्वरुपात एकरुप होऊन! ज्ञानासवे तू इथे आलीस तीही विजेसारखी. तुझ्या वाणीतून, शब्दांतून, कार्यातून तू सतत लखलखत होतीस, चैतन्य चपलेसम! आणि शेवटी, शेवटीही तू एकरुप झालीस, तुझ्याचसोबत, त्याच, चैत्यचपलेसोबत!
- पार्थ जोशी