आपलं इष्ट दैवत, आपला सखा सोयरा... साक्षात पांडुरंग आपल्याला दिसतो! भेटतो! यापरता दुसरा आनंद कोणता? याचि देही याचि डोळा, ते सावळे संजीवक आकार आपल्या समोर साक्षात होतात... जन्माची तहान तृप्तीच्या उंबरठ्यावर सानंद थरथरते, रोमांचित होते... त्याला किती पाहावं? कसं पाहावं? कितीवेळ आणि स्वतःतून किती हरवून जाऊन बघत राहावं... डोळ्यांचं पारणं फाटून जावं, मनाचा संतोष तृप्ती अतृप्तीच्या पल्याड जाऊन अमृतपान करू लावावा असा हा अनुभव... अनुभूतीच!
ही केवळ कल्पनेतली ललितरम्यता नव्हे, तर हा माऊलींच साक्षात अनुभव! दिठी दिठी तृप्त होताना, त्यांच्या सात्त्विक तेजस्वी डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले नसतील तरच नवल! कशी ही अवस्था? डोळ्यांनी पाहत राहावं, डोळ्यांतून झरत राहावं, ओठांनी सानंद थरथरत खुलावं, मानाने स्वतःलाही विसरून विठूसौंदर्यात सबाह्य भिजत राहावं... आतल्या आनंदाचा मोगरा उत्फुल्ल फुलावा!
या अनुभुतीच्या कल्पनेनेही किती भारावून जातो आपण. तो आत फुललेला मोगरा आपल्याला ठाऊक नसला, तरी काय झालं? त्याचा सुगंध शब्दांच्या पात्रांमध्ये माऊलींनी माऊलीपणाने भरून ठेवला आहेच की आपल्यासाठी! अर्थात शब्दांचं अपुरेपण आणि त्यांच्या खोलात जायची आपली व्यक्तिसापेक्ष असमर्थता हीदेखील लक्षात घ्यायला हवी.
या अनुभूतीचा उल्हास उद्गार म्हणजेच रूप पाहता लोचनी!
रूप पाहता लोचनी
सुख जाले वो साजणी
माऊली सांगताहेत... साजणी, काय बोलू? काय सांगू? या विठ्ठलाचं रूप पाहता सुख झाले! यातला 'सुख' शब्दाचा प्रत्यय हा आज आपण जितक्या सहजतेने आणि कदाचित उधळपणे 'सुख' हा शब्द वापरतो तितका वरवरचा नाहीच. ते आत्मसुख आहे. साजणी कोण असेल इथे? त्यांच्या विरहिणींमधील एखाद्या गोपिकेशी साधलेला संवाद असेल, किंवा कदाचित मनरुपी साजणीच असावी! इथे 'रूप पाहता' म्हणून माऊली का बरं थांबतात? आपली दर्शनानुभूती शब्दबद्ध करताना विठ्ठलाचं रूपवर्णन का करत नाहीत? वाटलं, की त्या सावळ्या दृष्टीसुखाचं वर्णन माऊलींनी आणि सर्वच संतांनी अनेक वेळा अनेक प्रकारे कौतुकाने केलेलं आहे. वेदही ज्याचं वर्णन करता करता शिणून गेले असा संतांचा निर्वाळा आहे त्याचं वर्णन माऊलींनी इतर अनेक अभंगांतून केलेलं आहेच; पण इथे भावनावेगात ते पुढे गेले असतील का? की त्या आवेगात शब्दांची असमर्थता पाहून ते पुढे गेले असतील? बहुधा, यातील सांकेतिकता हीच सर्वात विलक्षण आहे. सांकेतिकता हा (आज लोप पावत असलेला) महत्त्वाचा काव्यगुण आहे. याही अर्थाने ही रचना महत्त्वपूर्ण आहे. विठ्ठलाचं रूप, अलंकार, आकार, गुणवैशिष्ट्य याबद्दल स्पष्ट उच्चार नसला, तरी माऊली हे सांगायला विसरत नाहीत,
तो हा विठ्ठल बरवा।
तो हा माधव बरवा॥
यामधील 'हा' हा एकाक्षरी शब्द किती किती महत्त्वाचा आहे! आपल्या समोर, अगदी समोर असलेल्या व्यक्तीबद्दल बोलताना आपण 'हा' म्हणतो. तिच सहजता इथे आहे. तो विठ्ठल प्रकट रुपात त्यांच्या सामोरीच तर आहे! इथे, विठ्ठल आणि माधव असे दोन्ही शब्द वापरून श्रीविष्णु आणि पांडुरंग यांचं अद्वैत दाखवण्याची माऊलींची हातोटी किती सहजसुंदर आहे याचा अंदाज येतो.
सहज विचार करून बघा, आपल्याला अचानक छान वाटू लागतं... त्या क्षणी काही वेगळं घडलं नसलं आणि तरीही प्रसन्न किंवा सकारात्मक वाटू लागलं तर त्याचा आनंद वाटतोच; पण लगेच मनात कुठेतरी आपण त्याचं कारण शोधू लागतो. मग लक्षात येतं, मगाशी ऐकलेलं एखादं गाणं, घडलेला छान प्रसंग याचा आनंद असावा; पण त्याचं कारण शोधतो आपण हे महत्त्वाचं. विठ्ठलाचं दर्शन याचि देही मिळणं हे अलभ्य भाग्य भोगल्यावर, इतका मोठा सुखानुभव घेतल्यावर या सुखाच्या कारणापाशी माऊलीही इतक्या सहजतेने गेले असणार असं वाटतं. म्हणूनच, पुढे म्हणतात -
बहुता सुकृतांची जोडी।
णुनि विठ्ठलीं आवडी॥
नक्कीच खूप खूप सुकृतांची जोडी असणार! त्याशिवाय का असा लाभ होतो? 'बहु जन्म आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली' असं माऊलींनी एका ठिकाणी म्हटलेलं आहेच. कारण या विठ्ठलाची गोडी निर्माण व्हायला देखील पुण्य पदरी पाहिजेच की!
'अनंता जन्मांचे सुकृत पदरीं।
तोचि उच्चारी होठी हरिनाम'
असं संत निर्मळाबाईंनी देखील लिहिलेलं आहे.
वाटतं, की माऊलींच्या अभंगांचा आस्वाद, चिंतन ही देखील आज आपल्यासाठी सुकृतांची जोडीच आहे!!
सर्व सुखाचें आगरु।
बापरखुमादेविवरु॥
ही अनुभूती घेऊन कमीच पण नेमक्या शब्दांत मांडून माऊली निष्कर्ष सांगतात, की सगळ्या सुखांचे आगर, सर्व सुखाचे घर, सगळ्या सुखांचं मूळसार म्हणजे हा विठ्ठलच आहे!
आपल्याला चिरंतनाची चव देणारे माऊलींच्या अमृतानुभावाचे हे अभंग शब्दाकार..
- पार्थ जोशी