लडाखबद्दल लिहितेय आणि मोमोचा उल्लेख नाही असं कसं होऊ शकतं? मोमोबद्दल सर्वांत शेवटी लिहायचे असे ठरवलेच होते म्हणून आज या गोडुल्या पदार्थाबद्दल लिहून लडाखी सिरीज संपवणार आहे. मोमो हा शब्द मी खूप १२-१३ वर्षांची असतांना एका लेखात वाचला होता. त्यावेळी इंटरनेट फार बोकाळले नव्हते म्हणून खूप माहिती मिळाली नाही. मोमो खाण्याचा योग त्यानंतर खूप वर्षांनी कॉलेजमध्ये गेल्यावर आला. मी पहिल्यांदा जे मोमो खाल्ले ते अतिशय बेचव होते. शाकाहारी असल्यामुळे असेल पण मैद्याच्या पारीत कच्चे कोबी आणि गाजराचे सारण मला अजिबात आवडले नाही. सोबत चटणी नसून सॉस होता. मग अजून २-३ वर्षे मोमोचे नाव काढले नाही. एकदा आपल्या उकडीच्या मोदकांना माझी आसामी मैत्रीण गोड मोमो म्हणाली आणि मी पण मोमोला तिखट मोदक म्हणाले. आम्हा दोघींच्या भावना क्षणापुरत्या दुखावल्या आणि लगेच भावना पोहोचल्या. मी तिला उकडीचे मोदक खाऊ घातले आणि मग एकदा ती मला जबरदस्ती मोमो खायला घेऊन गेली. त्यावेळी मात्र सोबतची तिखट चटणी आवडली, व्हेज मोमोजही छान होते. काट्याने काटा काढतात ते असं! हळूहळू मोमोचे बरेच प्रकार खाल्ले आणि या पदार्थाशी मैत्री झाली. व्हेज मोमोच्या प्रेमात पडण्याइतके काही नाहीये यात पण चटणी, पॅन फ्राईड, शेजवान असा तामझाम असेल तर सुसह्य होतो हा प्रकार. आता तर गल्लोगल्ली मोमो मिळतात पण या पदार्थाचा भारतात येण्याचा प्रवास रंजक आहे.
चौदाव्या शतकात नेपाळमध्ये काठमांडूत मोमोचा जन्म झाला. नेपाळच्या नेवारी भाषेत मोमे म्हणजे वाफवणे. पंधराव्या शतकात नेपाळी राजकन्येचे लग्न तिबेटी राजाशी झाले आणि आंदणात हा पदार्थ तिबेट आणि तिथून पुढे चीन, म्यानमार आणि अगदी कोरियापर्यंत जाऊन पोहोचला. या कथेच्या अगदी रिव्हर्स रिअक्शन शोभेल अशीही एक कथा आहे. तिबेटमधील लोकांनी मोमोज नेपाळमध्ये नेले. खरंखोटं इतिहासकार सांगू शकतील पण ज्या पदार्थाला १०-१२ वर्षांपूर्वी भारतात ओळखतही नव्हते पण आता त्याला पिझ्झाइतकी प्रसिद्धी मिळाली आहे, हे मात्र खरं! मोमोला डम्पलिंग्स, डिमसम्स अशी बरीच नावे आहेत. सोपी पाककृती म्हणजे मैदा/गहू किंवा तांदळाच्या पारीत मांस/भाज्याचे सारण भरून वाफवतात. भारतात हा पदार्थ यायला १९६० साल उजाडले.
मोमोचे आता असंख्य प्रकार मिळतात. मुख्य प्रकार म्हणजे मांस, भाज्या, चीझ आणि खवा यापैकी एक सारण. वाफवलेले मोमो जसे प्रसिद्ध आहेत तसेच तळलेलेसुद्धा. मांस असो किंवा भाज्या, सारण दातांना मेहनत करावी लागणार नाही इतके बारीक असते. चिकन, मटण यासोबत पोर्क किंवा याकचे मोमोज असतात. भाज्यांमध्ये पत्ताकोबी, गाजर पासून मक्याच्या दाण्यापर्यंत भाज्या असतात. चीझ म्हणजे मुख्यतः चुरपी पण पनीर आणि प्रोसेसज्ड चीझचेही मोमो बनवले जातात. खव्याचे गोड मोमो नेपाळमध्ये प्रसिद्ध आहेत. सारण बनवतांना मसाल्यांचे प्रमाण आणि भाज्या/मांस किती बारीक चिरले/कापले आहे यावर लक्ष हवे. कांदा, लसूण आणि आवडीनुसार मसाले टाकून सारण चविष्ट बनवतात. हे सारण पारीत भरून त्याला डिझाइनर उकडीचे मोदक किंवा करंजीला जसे आकार दिले जातील तसे आकार देतात. एका विशिष्ट भांड्यात वाफवले जातात त्याला मोटको म्हणतात. इडलीपात्रासारखे एकावर एक छिद्र असलेली भांडी असतात ज्यात मोमो वाफवतात आणि सर्वांत खालच्या भांड्यात पाणी असते. गरमागरम मोमो तिखटजाळ चटणीसोबत खायला देतात. पहाडी भागात एक खूप तिखट मिरची मिळते त्यापासूनही ही चटणी बनवतात. या चटणीशिवाय मोमो अपूर्ण आहेत. पॅन फ्राईड मोमो पण लोकांचे आवडते आहेत त्यांना कोथेय म्हणतात.
लडाखमध्ये गेल्यावर मॅगी खातात तसच मोमोसुद्धा! त्यांच्या नववर्षाच्या दिवशी म्हणजे लोसार सणाला लोकांचे स्वागत मोमो देऊन करतात. असा हा सर्वांचा आवडता पदार्थ. पराठ्यांचे जसे असंख्य प्रकार आहेत तसे या पदार्थाचेही (तितके नाहीत पण बरेच आहेत.) भारतात आता स्पेशल चेन्स आहेत मोमोच्या. फ्रोझन मोमो मिळतात आणि ते चांगलेही लागतात. आकार देणे कौशल्याचे काम असते पण बाकी तसे सोपेच! चांगल्या प्रतीचे फ्रोझन मोमो रास्त दरात मिळत असतील तर अगदी दोन माणसेसुद्धा चांगला स्टॉल सुरु करू शकतात. यासाठी जो मैदा वापरतात तो तब्येतीला चांगला नाही पण आता गव्हाचे मोमो मिळतात. अर्थात मैद्याच्या तळलेल्या सामोसा-कचोरीपेक्षा वाफवलेला हा पदार्थ कधीही चांगला.
मला नेहमी वाटते, सप्तरंगी मोमो मिळावे. अर्थात चांगले खाण्याचे रंग वापरलेले. एका प्लेटमध्ये सात रंगाचे मोमो किती छान दिसतील. फ्रोझन मोमो बनवणाऱ्यानी हिरवे म्हणजे व्हेज, लाल म्हणजे चिकन, पनीर नारंगी अशी रंगांची मार्किंग सिस्टीम बनवली तर किती छान! दहा पंधरा रुपयांपासून ते ५०० मध्ये चार मोमो अशी कोणतीही रेंज या पदार्थाची असू शकते. या पदार्थाचे मार्केटिंग दिल्ली-मुंबईत राहणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सनी केले. मग बाकी शहरातही याचे लोण पसरले. कोरियन लोक डम्पलिंग्स खातात आणि के-पॉप कल्चर जेनझी ला आवडत असल्याने ते आनंदाने डम्पलिंग्स/डिंसम्स खातात. अगदी खेडेगावात तुम्हाला मोमोचा स्टॉल दिसणार नाही पण काही वर्षांत ती पण प्रगती होईल. मी नेहमी आपले स्थानिक पदार्थ भारतभर पोहोचावे अशी प्रार्थना करत असते पण हा पदार्थाचा लोकांपर्यत पोहोचण्याचा प्रवास मी डोळ्यांनी पाहिला आहे आणि पाहते आहे. विशेष चुका काढण्यासारखे यात काहीही नाही (मैदा सोडल्यास) त्यामुळे याच्या ग्राफवर मी खुश आहे. या छान आनंदाच्या क्षणी आपण लडाखची खाद्ययात्रा संपवू या!
- सावनी