नवरात्र, म्हणजे उत्सव शक्तीचा. शक्तीने भरलेला आणि भारलेलाही! ती असतेच. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे वावरणारी, जागणारी आणि मुख्यतः जगवणारी ती शक्ती अनेकानेक अभिधानांतून प्रवाही असते, प्रवाह अखंड ठेवण्यासाठी. ती स्वसिद्धा मूळ जागृतीस्वरुपा शक्ती! जागे होऊ बघतो आपण, तिच्या रुपाप्रति, स्वरुपाप्रति आणि कार्याप्रति. म्हणूनच हे शक्तीने भारलेले, जाणीव करुन देणारे, किंबहुना जागृत असलेल्या जाणिवेप्रतिची आपली मिथ्यनिद्रा भंगून टाकणारे हे नऊ दिवस, नऊ रात्री. जाणिवा जाग्या होतात, आपण त्यांप्रती जागे होतो आणि मग मानवी स्वभावानुसार, स्वाभाविकपणे त्यांना हळूहळू ग्लानी येइसतोवर येते पुढील अश्विन पौर्णिमा. पुनःश्च भान देणारे तेच नऊ दिन.
मुळात, भारतीय संस्कृतीनी, आपल्या अभिजात व लोक परंपरांनी शक्तीस वंदनीय मानले आहे. वैदिक काळापासून तिची मनोभावे अर्चना केली आहे, मग ती मातृरुपात असो, प्राणरुपात असो, की आणि काही. त्यातही स्नेहाळू, कनवाळू, भक्तवत्सल या रुपात अर्थात मातृरुपात देवीची आराधना करणे मानवी मनाला सुरुवातीपासूनच अधिक भावत आले आहे. म्हणूनच, ती 'अंबा', अर्थात आई. अवघ्या जगताची आई, म्हणून जगदंबा!
अथर्ववेदातील भुमीसुक्तात भूमीला, धरित्रीला मनःपूर्वक दिलेले मातृस्थान असो, की संपूर्ण निसर्गाचे, त्यातील प्रत्येक घटकांचे आणि त्यांतील शक्तींचे केलेले निस्सीम वंदन असो, शक्तीरुपाचं अधिष्ठान आर्यांनी अगदी उदयापासून जाणलं होतं. तिचे अनुसंधान साधण्यासाठी, तिची कृपा लाभण्यासाठी यज्ञादी कर्मांचा अवलंबही मोठ्या प्रमाणात दिसून येतो. वैदिक वाड़मयात याच शक्तिरुपाला विविध प्रतीकांतून पाहून त्यांवरील कृतज्ञतेच्या भावानी रसरसलेली अनेक स्तोत्र सहज दिसून येतात. लोकभाषांमधेही अशीच स्तुतिपर गीते, श्लोकादी साहित्य तेव्हाच्या मानवाच्या जाग्या असलेल्या जाणिवांचे दर्शन क्षणार्धात देऊन जातात. अथर्ववेद प्रतिपादन करतो, की धरित्री आपली माता आहे व तिचे दूध, जीवनकारी स्तन्य म्हणजे पाणी! किती सौंदर्यभरले रसाळ वर्णन केले आहे, त्या शक्तीचे, तिच्या जीवनदायी दुधाचे!
मग ती प्राणशक्ती असो, निसर्गातील विविध शक्ती असोत, कुंडलिनी असो की आणि कोणती, या विविध शक्तींच्या खरेतर, अनेकविध रुपांच्या माधमातून 'ती' एकच शक्ती कार्यरत आहे हे बहुधा मानवाने तेव्हाच जाणलं असावं. भारतीय संस्कृती तर इतक्या उदात्ततेने या शक्तीकडे बघते, या जगत्कारणास वर्णीते, की आपण सहजच तिजपुढे नतमस्तक होतो. ब्रम्हावतरणासाठी शक्ती अत्यावश्यक असते. तिच्याविण ब्रम्हही अवतार धरु शकत नाही. कारण शक्तिविण ब्रम्हही निष्क्रीय असते. हेच ते उदात्त प्रतिपादन.
अगदी विश्वनिर्मितीच्या एका आख्यायिकेनुसार, शिव आपल्या निद्रेतून जागा होतो. मग, 'एकोस्मि बहुस्याम प्रजाय’ या आपल्या संकल्पानुसार शिव अनेक होतो. अर्थात शिवा तयार होते. हेच ते शक्तीरुप. पुढे, ती सारा संसार निर्माण करते, मातृममत्वाने त्याचे प्रतिपालन करण्यात नित्यरत होते; पण एव्हाना, शिव मात्र निद्रिस्तही झाला असतो! इथे सहज आठवतात वैभव जोशींचे, कदाचित हेच सांगू पाहणारे शब्द,
तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठूरायाला हा संसार पेलना!
वरील आख्यायिका, शिव व शक्ती यांचे अद्वैत तर सांगतेच; पण तरीही शक्तीचे असे वेगळे न वगळता येणारे महात्म्यही अधोरेखित करते.
मग ते शक्तीस्वरुपाचे कोणतीही रुप असो, अगदी आत्ता हे शब्द वाचताना त्याचे आकलन होण्याची शक्ती असो, की ते धारण करण्याची क्षमता, शक्ती असो, आपल्या साऱ्या कर्म-अकर्म-विकर्मांतून तिच शक्ती विलसत आहे.
आज नवरात्रीनिमित्त, आपल्या सर्वांठायी असलेल्या, आपल्या अस्तित्वाच्या सर्वस्वाला स्पर्शून असलेल्या त्याच शक्ती स्वरुपाला मनःपूर्वक वंदन करतो!
तुजविण नाही गति या जीवाला
तुजविण प्रार्थु कुणा चेतनाला।
अशी धाव तू गे सत्वर चंडीके
नमस्कार माझे स्विकार अंबिके॥
- पार्थ जोशी