दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं..! भाग -१२

युवा कथा

युवा विवेक    11-Oct-2023   
Total Views |

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं..! भाग -१२

पहाट झाली अन् कोंबड्याच्या बांगेसरशी नागू उठला. अंघोळपाणी करून गावातल्या खोकल्या आईच्या देउळमध्ये अगरबत्ती लाऊन, नारळ फोडून पाय पडून आला. आज शहरआ जवळ करायचं होतं. खोकल्या आईच्या पाया पडून नागू येओस्तोवर गोंडाजी उठला होता. अंघोळ-पाणी करून त्यानं वऱ्हाटे, पाटे, अन् इतर सर्व मालाची गिनती केली, तो सगळा माल एकासरशी लाऊन तो पारावर बसून गाड्या येण्याची वाट बघत बसला होता.

तितक्यात रखमाजी अन् त्याचा धाकला लेऊक दोन्ही टेम्पो घेऊन झोपड्या महोरे येऊन उभे राहिले. टेम्पो वेळीच आले बघून गोंडाजी अन् नागूच्या जीवात जीव आला. गोंडाजी अन् रखमाजीचा धाकला लेऊक वऱ्हाटे, पाटे, अन् इतर सगळा माल टेम्पोत भरू लागले होते. नागू रखमाजीला घेऊन पारावर बसला व सुमनबाईला चहाचं फर्मान सोडून गप्पा मारत बसले.

गप्पा तरी काय या गधड्या धंद्यात लाज राहिली नाही, यंत्र आलीया आता कोणती बाई वऱ्हाटे, पाटे,करत बसेल. इतका वखत कुणाला हाय म्हणून तो त्याच्या धंद्यात होत असलेली आबळ रखमाजीला सांगत होता. रखमाजी त्याच्या गाड्याच्या धंद्यात महागाई अन् वाढलेली स्पर्धा, घरोघर झालेल्या गाड्या यामुळे त्याच्या धंद्यात पण कशी हाल होत आहे हे सांगत होता.

त्यांच्या गप्पा चालू होत्या अन् एकीकडे रानुबाई चुल्हीवर भाकरी थापित होती. सगळ्यांची मालक लोकं आता काही दिवस शहराला राहतील म्हणून आज जरा नियोजन बिघडले होते. गप्पा चालू असताना सुमनबाई डोक्यावर पदर घेऊन चहा घेऊन आली अन् तिने दोघांना चहा देऊन दोघांचे पाय पडले. डोक्यावरचा पदर सावरत ती आल्या पावलांनी मागे गेली.

एकीकडे संतूपण केव्हाच उठून आवरून सावरून बसला होता. त्याचा झोपडीच्या संगतीने सारा संसार शहराला जायचा होता म्हणून तो लवकरच उठून आवरासावरी करू लागला होता. त्याची घरदनीन पण सगळं साहित्य एका अंगाला लाऊन गीनती घेऊन फोडायचा उरलेला दगुड एका अंगाला लाऊन दोन-चार महिन्याला येऊन पुन्हा दगुड फोडायचं काम सुरू झालं की तो कामे येईल म्हणून त्याला नीट रचून ठेवत होती.

गोंडाजीचा सारा माल टाकून झाला तशी गाडी संतूच्या झोपडी मोहरे आली. त्याचा माल अन् बाडबिस्तरा गाडीमध्ये टाकला अन् रानुबाई, सुमनबाई, संतूची बाई यांना त्या गाडीमध्ये बसवून गाडी शहराच्या गावाला ढळली.

नागू अन् रखमाजी यांनी गप्पा आवरत्या घेत तिन्ही शिगरं टेम्पोत टाकली, त्यांना खायला काही अमुकधमुक गाडीमध्ये टाकून. झोपड्या असलेल्या पारावर नारळ फोडून जागेला निरोप देण्यात आला. उद्यापासून तिथं फक्त नागू अन् रानुबाईच झोपडीमध्ये राहणार होती. त्यामुळं त्यांची झोपडी तशीच बंद करून ते शहराला निघाले होते.

गावात आले तसं पारावर बसलेल्या संतूक आबाने नागूला हात दिला अन् काम धंद्याची विचारपुस केली. टेम्पो थांबून पुन्हा दहा-पाच मिनिट गप्पा झाल्या, गावकऱ्यांचा काही दिवसांसाठी रामराम घेऊन संतु, नागू अन् गोंडाजी आता निघाले होते. नागू अण्णाला गावात असलेला मान बघून संतू हळहळला अन् त्याच्या डोळ्यांना आसवांच्या धारा लागल्या. आपण उगीच देव माणसावर चुकीचे आरोप करत होतो याची त्याला जाणीव झाली होती. गेले दोन तीन दिवस त्याच्या अन् त्याच्या बायकोमध्ये भांडण झाले नव्हते, त्याने दारूला शिवले नव्हते म्हणून नागूपण त्याच्यावर खुश होता.

टेम्पो गावाची सडक सोडून येशीला लागला होता. आता दोन-चार महिने गोंडाजी अन् संतूला गावाचं तोंड दिसणार नव्हतं म्हणून ते पुढे होत असणाऱ्या प्रवासाच्या संगतीने मागे धूसर होत जाणाऱ्या गावाला बघत बसले होते. हळू हळू गाव मागे पडत होता सावता महाराज यांच्या मंदिरावर असलेल्या झेंडा दूरवरून त्यांना दिसू लागला होता.

आषाढी एकादशीला जसं विठ्ठलाच्या दर्शनाची भक्तांना आस लागते अन् पंढरपुरात जाताच जसं विठ्ठल रखुमाई मंदिरावरील कळस हलू लागतो तसा झेंडा हलत होता. संतू, गोंडाजी त्याकडे बघत होते. गावाने अन् गावातील गावकऱ्यांनी त्यांचा स्वभाव, कामातील प्रामाणिकपणा यामुळे त्यांना जवळ केलं होतं,रोजीरोटी दिली होती.

त्यामुळं गावाच्या जीवावर आठ महिने ही दोन्ही कुटुंब पोट भरत होती. बाकी इतर चार महिन्यात शहराला जाऊन आपला तयार माल शहरात विकत वणवण करत भटकत होती.

दिवस निघून जात होते, नागूसारख्या माणसांचं आयुष्य निघून जात होतं पण उभे आयुष्य पोटासाठी सुरू असणारी ही त्यांची पायपीट काही थांबत नव्हती. आज पुन्हा एकदा पोटासाठी त्यांनी शहराला जवळ केलं होतं, आता इतकं मोठं शहर त्यांना त्याच्या पोटात सामावून घेतं का..? दोन वेळची भाकर देतं का..? ही प्रश्न अनुत्तरीत राहणार होती. त्यांचं भटकत राहणं सुरू असणार होतं आयुष्याच्या शेवटापर्यंत.

समाप्त..!

- भारत लक्ष्मण सोनवणे

भारत सोनावणे

माझे नाव भारत लक्ष्मण सोनवणे, मी औरंगाबाद येथील रहिवासी आहे.माझं पदव्युत्तर MBA हे शिक्षण डॉ.भिमराव आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून झालेलं आहे..!
साहित्य क्षेत्रातील माझा परिचय,माझे ललित लेख,कथा या दै.सकाळ,दै.लोकमत,दै.नवाकाळ,इत्यादी दैनिकातून प्रसिद्ध.तसेच अनेक साप्ताहिक,मासिक,दिवाळी अंक यात लेखन प्रकाशित.
अनेक कवी संमेलनात सक्रिय सहभाग,नवोदित युवा कवी म्हणून अनेक ठिकाणी माझ्या लेखनीचा सन्मान.ऑनलाईन माध्यमातून अनेक वेब पोर्टलसाठी फ्रीलांसर म्हणून सध्या मी लेखन करतो."Writing From a Blank Mind" या ललित लेखन,कथा,कविता,पर्यटन,इतिहास अश्या अनेक विषयांवर माझ्या ब्लॉग माध्यमातून जवळ जवळ १४ देशात माझं लेखन वाचले जात आहे..!