जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळूनी किंवा पुरूनी टाका
सडत न एका ठायी ठाका
सावध ऐका पुढल्या हाका
मराठी साहित्यात कविवर्य केशवसुतांची 'तुतारी' ही गाजलेली कविता आहे. त्यातल्या ह्या ओळी हिंदी सिनेसृष्टीची सध्याची दयनीय परिस्थिती पाहता तंतोतंत लागू होतात.
गेले काही महिने हिंदी सिनेसृष्टी खडतर अवस्थेतून जात आहे. कोरोनामुळे विस्कटलेली आर्थिक घडी, मल्टीप्लेक्स संस्कृतीची नव्याने उभारणी, ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे समोर उभे ठाकलेले नवीन आव्हान, सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉयकॉट बॉलिवूडचा सुरू झालेला ट्रेण्ड, त्यात भरीस भर म्हणजे दाक्षिणात्य सिनेमांनी उत्तर भारतातसुद्धा वर्चस्व गाजवायला सुरू केल्याने हातातून निसटून चाललेला पारंपरिक प्रेक्षकवर्ग…… !! गेल्या वर्षभरात बॉलिवूडने ह्या साऱ्या अडचणींना तोंड देत आपली वाटचाल चालू ठेवली आहे.
वर्ष २०२२ हे अनेक कडू - गोड आठवणींच्या अर्थांने संस्मरणीय राहील.
गेली कित्येक दशके आपल्या अवीट गाण्यांनी केवळ हिंदी आणि मराठीच नव्हे तर जवळपास सर्व भारतीय भाषांमध्ये स्वत:चा ठसा निर्माण करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर ह्यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. एखादा जुना वटवृक्ष कोसळून पडावा आणि अंगणात रितेपण दिसावे तशी संगीतक्षेत्राची अवस्था झाली आहे.
केवळ गायनच नव्हे तर भारतीय नृत्य परंपरेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे आणि शास्त्रीय नृत्यकलेप्रमाणेच हिंदी सिनेमात सुद्धा नृत्य दिग्दर्शन केलेल्या पंडित बिरजू महाराज ह्यांच्या निधनाने सुद्धा एक पोकळी निर्माण झाली आहे.
पंडित शिवकुमार शर्मा ह्यांच्या रूपाने शास्त्रीय आणि फिल्मी संगीतवादन क्षेत्रातील एक दिग्गज नाव देखील अनंतात विलीन झाले. शिव - हरी ह्या संगीत दिग्दर्शक जोडगोळीतील एक मोहरा त्यांच्या रूपाने कायमचा हरपला.
प्रख्यात पार्श्वगायक के.के., दिग्गज अभिनेते विक्रम गोखले, स्टॅण्डअप कॉमेडीला वेगळे आयाम देणारा राजू श्रीवास्तव, आणि भारतात डिस्कोयुगाची नांदी करणारे संगीतकार बप्पी लाहिरी अशा अनेक उमद्या कलावंतांनी सन २०२२ मध्ये जगाचा निरोप घेतला.
खरं तर ह्या मानवी हाताबाहेरच्या गोष्टी आहेत, पण गेल्या वर्षात आर्थिक आघाडीवर सिनेसृष्टीचे जे नुकसान झाले आहे ते मात्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही.
लालसिंग चढ्ढा, शमशेरा, धाकड, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन, भेडिया, राधे श्याम, जयेशभाई जोरदार….असे अनेक सिनेमे तिकीट खिडकीवर जोरात आपटले आहेत.
ह्याउलट आर.आर.आर, कांतारा, केजिएफ २, द काश्मीर फाईल्स, दृश्यम २ …. ह्या चित्रपटांनी चांगली कामगिरी केल्याचे दिसून येईल.
एखादा सिनेमा हिट व्हावा ह्यासाठी 'तगडी स्टारकास्ट, बिग बजेट, जोरदार प्रमोशन, नामांकित दिग्दर्शक हवे' वैगेरे वर्षानुवर्षे रूढ असलेली पारंपरिक समीकरणे आणि गृहितके मोडीत निघाल्याचे या वर्षी दिसून आले. ज्या अभिनेत्यांची - दिग्दर्शकांची नावेदेखील प्रेक्षकांना माहीत नव्हती त्यांनी सन २०२२ मध्ये शब्दशः हंगामा केला.
आधीच अडचणीत असलेल्या बॉलिवूडला आणखी अडचणीत आणणाऱ्या घटना ह्या वर्षी घडल्याचे दिसून येत आहे. आणीबाणीच्या काळात किंवा ८० च्या दशकात हिंदी सिनेमाची अशीच दारुण अवस्था झाली होती..
व्हिडिओ पायरसी किंवा सिनेसृष्टीवर बंधने आणण्यात आल्याने त्याचा संपूर्ण मनोरंजन क्षेत्रावर परिणाम झाल्याचे त्या वेळी दिसून आले होते मात्र या वर्षी सरकारी हस्तक्षेप न राहता प्रेक्षकांनीच आम्हाला गृहीत धरू नका असा इशारावजा संदेश दिल्याचे जाणवत आहे.
सातत्याने त्याच त्या चेहऱ्यांभोवती फिरणारे इंडस्ट्रीचे अर्थकारण, कथालेखन क्षेत्रात आलेलं विषयाचं द्रारिद्र्य, गीत - संगीत क्षेत्रात नवीन प्रयोग करण्यात आणि नवी फळी उभी करण्यात येत असलेले अपयश …! अशा अनेक कारणांमुळे हिंदी सिनेसृष्टीत मरगळ आली आहे. हिंदीतल्या आघाडीच्या नायकांचं वय कधीच उतरणीला लागलं असून त्यांच्या समवयीन नायिका चरित्र भूमिकेत दिसू लागल्या तरी कृत्रिम साधनांचा वापर करून मुख्य भूमिका करण्याचा केविलवाणा प्रयत्न सगळे जण करीत असले तरी प्रेक्षक त्या प्रयत्नांना आता कंटाळले आहेत. आपल्या वयाला साजेशा भूमिका करत ह्या अभिनेत्यांनी एक पाऊल मागे घ्यावे हीच सार्वत्रिक भावना दिसून येत आहे.
शाहरुख - दीपिकाच्या आगामी पठाणच्या नुसत्या गाण्यांच्या व्हिडिओवरून देखील प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकांना काय हवे आहे ह्याचा विचार न करता आपलाच घोषा लावण्याचा सिनेसृष्टीतल्या मातब्बरांच्या प्रयत्नांना त्यामुळे बऱ्यापैकी खीळ बसली आहे.
ओटीटीमुळे नवोदित कलावंत आणि प्रयोगांना देखील स्वत:चं हक्काचं स्थान मिळाल्याने अनेकांचा एकछत्री अंमल संपला आहे.
मनोरंजन उद्योग क्षेत्र हा फार मोठा व्यवसाय आहे. ही इंडस्ट्री प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या हजारो लोकांच्या उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे तिची अशी दुरावस्था होणे योग्य नाही. प्रत्येक व्यावसायिक क्षेत्रात चढउतार चालूच असतात, त्यामुळे आपल्याकडून गतवर्षी झालेल्या चुका विसरून आणि त्यातून बोध घेऊन भारतीय सिनेसृष्टीत पुढच्या वर्षी सकारात्मक बदल होतील ही अपेक्षा बाळगायला हरकत नाही. केशवसुतांच्या कवितेतील "सावध ऐका पुढल्या हाका .." हे सुरुवातीला म्हणालो ते ह्याच कारणामुळे !!!!!
- सौरभ रत्नपारखी