आपण अपुले दीप होऊ.....

युवा विवेक    13-Jan-2023
Total Views |
 
आपण अपुले दीप होऊ.....
बघता बघता वर्षं सरलं आणि आता आपण २०२२ पार करून २०२३ मध्ये प्रवेश करायला सिद्ध झालो. दरवर्षी हे असंच होतं. वर्षं सुरू झालं म्हणता म्हणता संपूनही जातं. गेल्या वर्षाअखेरीस आपण कोविड नामक महाशत्रूच्या कचाट्यातून हळू हळू बाहेर पडत होतो. मानवी शक्तीची पराकाष्ठा पाहणाऱ्या संकटाला दोन वर्षं तोंड दिल्यानंतरची ही वर्षाची सुरूवात आशादायकच होती. सोबत असते ती प्रबळ जीवनेच्छा आणि परिस्थितीशी झगडण्याचा चिवटपणा. मला वाटतं माणूस म्हणून हेच आपलं वेगळेपण ठरलं. अंतर्मनात तेवणारा आशेचा दीप सोबत घेऊनच आपण आपल्या मार्गावर चालत राहिलो आणि पाहता पाहता २०२३च्या या नव्या वळणावर येऊन उभे राहिलो.
हे वर्ष अनेक सकारात्मक आणि नकारात्मक घटनांनी भरलेलं होतं. एकिकडे रशिया आणि युक्रेनने गेले तब्बल दहा महिने युद्धात एकमेकांवर कुरघोड्या करत संपूर्ण जगावर काळी छाया पसरवून ठेवली. अमेरिका, युरोपातील अनेक देश या संकटामुळे होरपळून निघत असताना भारत मात्र शांततेच्या मार्गाने आणि मित्रत्वाच्या नात्याने या देशांना मदत करत होता. कोविड काळात आरोग्यक्षेत्रात आपण केलेल्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. संपूर्ण जगासाठी विश्वगुरूच्या भूमिकेतून कार्यरत असणाऱ्या भारताकडे जी २०चं नेतृत्व आलं. संरक्षण क्षेत्रात अनेक उपलब्धी भारताने या काळात प्राप्त केल्या. अनेक देशांशी वेगवेगळ्या स्वरुपाचे करार झाले. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा झाला. अग्नीवीरसारखी योजना आणली गेली. वनवासी क्षेत्रातील दलित महिलेला पहिल्यांदाच भारताच्या राष्ट्रपतीपदी आसनस्थ होण्याचा मान मिळाला. भारतासाठी २०२२ हे वर्षं अत्यंत आशादायक ठरलं.
या काळात अनेक रत्नही आपण गमावली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ६ फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं निधन ही भारताच्या कलाक्षेत्राची शतकातली सर्वात मोठी हानी मानली जाते. पंडीत बिरजू महाराज यांचं त्याचप्रमाणे मनोरंजन क्षेत्रातील अनेक व्यक्तींचंही या काळात निधन झालं. देशात राजकीय, सामाजिक अशा अनेक घटनांना पेव फुटलं होतं. विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या, भारत जोडो यात्रा, महाराष्ट्रात नाट्यमय रीतीने सत्तांतर झालं. अनेक प्रकरणांना वाचा फुटली. या वर्षात सर्वाधिक गाजल्या महाराष्ट्रातील सत्तातराच्या आणि लव्ह जिहाद प्रकरणांच्या बातम्या. श्रद्धा वालकर प्रकरणामुळे वर्षाच्या अखेरीस अनेक घटना अचानक उघड होऊ लागल्या आणि किशोरवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
या सगळ्या सुंदोपसुंदीत सामान्य माणसाच्या हाती काय राहिलं? त्याच्या नशिबी आले दैनंदिन प्रश्न, सामाजिक जबाबदाऱ्या, मानसिक आंदोलनं, सामाजिक असुरक्षिततेचा मोठ्ठा प्रश्न, आरोग्यविषयक अडचणींचा मोठ्ठा डोंगर, आर्थिक नियोजनाची संकटं, कोणाचा कॉलेज प्रवेशाचा प्रश्न, कोणाचा नोकरी मिळवण्याचा तर कोणाचा लग्नाचा प्रश्न, कोणाचा मानसिक आजारांचा प्रश्न ही यादी फार मोठी आहे. पण तरीही अत्यंत चिवटपणे आपण जगत राहिलो. कारण आशेवरच हे जग चालत असतं. आपल्यापैकी अनेकांनी गेल्या वर्षी अनेक संकल्प केले. कोणाचे पूर्ण झाले. कोणाचे हवेत विरून गेले. कोणाला त्याच्या आयुष्याची लय सापडली तर कोणाची वीण उसवत गेली. कोणी वजन कमी करण्याचे संकल्प केले, कोणी नवीन पुस्तकं वाचण्याचे संकल्प केले, कोणी भावनिक गुंतागुंतीत न अडकण्याचे संकल्प केले, तर कोणी सिरीयसली करिअरवर फोकस करण्याचा निश्चय केला. कोणी गॉसिप टाळण्याचा संकल्प केला तर कोणी आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा. नव्या वर्षाच्या निमित्ताने केले जाणारे हे संकल्प खरं म्हणजे नवी सुरुवात करण्याची प्रेरणा ठरतात. नवीन वर्षाची सुरुवात ही संकल्पाच्या रुपात सकारात्मक उद्देशाने होते. म्हणूनच पुन्हा एकदा आपण नवे संकल्प, नवी सुरुवात करायला सिद्ध झालो आहोत.
आपण व्यक्तिगत स्वरुपात अनेक संकल्प करत असतो. वरती उल्लेखलेले संकल्प, अन्यही अनेक संकल्प आपण करतोच. पण व्यक्तिगत पातळीपलिकडे जाऊन नातेवाईक, परिवार, समाज, राज्य, देश अशा वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून संकल्पांचा विचार करणंही आवश्यक आहे. माझ्या घराच्या गरजा मी ओळखतो. पण समाजाच्या गरजाही ओळखल्या पाहिजेत. सामाजिक कार्यासांठी समयदान करणं, वंचितांना मदत करणं, आपण शिकताना आपल्यापेक्षा लहानग्यांना शिकवणं, गरजूंसाठी मदत मिळवून देणं, देशाच्या गौरवशाली अशा परंपरांचा पाईक होणं, आपली संस्कृती जपणं, आजवर संस्कृतीचा विचार केला नसेल तर तो सकारात्मकतेने करणं, वैयक्तिक आणि सामाजिक स्वरुपात आर्थिक नियोजन शिकणं व ते करणं, सामाजिक असुरक्षिततांचा प्रश्न निकाली लावण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणं, देशासाठी गौरवास्पद असणारा इतिहास विविध मार्गाने मांडणं, त्याचा पुनःपुन्हा उल्लेख करणं, आरोग्यविषयक समस्यांबाबत अपडेटेड असणं, त्यासंबंधी समाजाच्या गरजा समजून घेणं, वैज्ञानिक दृष्टी विकसित व्हावी म्हणून किशोरवयीनांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करणं, अभिरूप स्वरुपात बँकांचं कामकाज, कोर्टाचं कामकाज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, मनातील संवेदनशीलता जपणं अशा कितीतरी गोष्टी आपण येत्या वर्षात करू शकतो. तसे संकल्प करू शकतो आणि ते पूर्णही करू शकतो. स्वतःपुरती काही पथ्य पाळू शकतो. सोशल मीडियाच्या वापरावर बंधनं घालू शकतो, जीवनाला शिस्त लावू शकतो. संकल्पाच्या निमित्ताने अंतरीचे दिवे जागते ठेवणं महत्त्वाचं. बाहेरचे दिवे विझतील, आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करतील. पण कितीही मोठं संकट आलं तरी हे अंतरीचे दीप दिशा दाखवतील, मार्ग सुनिश्चित करतील आणि मग आपणच आपले दीप होऊन जाऊ....
 
- मृदुल राजवाडे