धोंडाईचा गाव..!
सूर्य सांजेकडे कलायला लागला तसं रानातल्या लोकांनी घराच्या वाटा धरल्या. जसजसा सूर्यअस्ताला जातो आहे तसतसा पायांचा वेग वाढत आहे. घराची लागलेली ओढ अन् घरी गेल्यावर कधी एकदा कोरा काळा चहा पिऊन पाठ घंटाभर ओसरीला लांब करू असे धोंड्याईला वाटत होतं.
उतरत्या वयात वावरातले बैठे काम आता तिला सहन होत नव्हते. परंतु आले दिवस कसेतरी ढकलायचे अन् चालू शरीराला घास कुटका खाऊन तगते जगते ठेवायचं. इतकचं काय धोंडाईच्या रोजच्या जगण्यातील दिनक्रम होता. धोंडाईने रानाचा रस्ता मागं टाकला अन् गावच्या वाटाला धोंडाई लागली. डोक्यावर रस्त्यानं चालता-चालता जमा केलेल्या काटक्यांचं पेंडक घेऊन धोंडाई त्याला सावरत चालली होती. इतक्यात धोंडाईला समिणाबी आपा,अंजुम खाला अन् शांता आक्का भेटली. धोंडाईने सरपनाला सावरत शांत आक्काला पुसले.
"अय शांते कुठशिक गेली होती ओ माय कामाला..?"
शांता आक्का बोलायला लागली : "अगं..! व माय ते लक्ष्मी आयच्या देऊळा खाल्ल्या रांनची झुंब्रा माळीन हायना तिच्या वावराले गेली होती."
धोंडाई : "काय काम करायला गेली होती ओ माय..?"
समिणाबी आपा : "अरे ओ बुड्डी ओ कपास चुंनने को गयेल थे."
धोंडाई : "बरं बरं माय लेकी, अंजुम तू इन्के सोबत गेलती का..?"
अंजुम खाला : "हां जी बुड्डी घरपे भी क्या करे..? सलम्या का बुढ्ढा काम को नाहीं जाता, तो खानेको कोण देगा..?
तो करती हू थोडा बहुत..!" इतक्यात शांता आक्का बोलायला लागली, "मायवं चल जातू गं, मलाबी मुसनमान मोहल्यात जायचं हायसा शब्बीर मामुच्या घरला कापुस यचला त्याचं पैकं आणाया."
धोंडाई मारुतीच्या देवळापासून एकटी वाटेनं घराकडे निघाली. दिवसभर गावात शुकशुकाट असतो पण सांजेच्या वेळेला मात्र गावात जीव लागतो. रस्त्यानं कोणी गाडीवर दुधाची क्यान घेऊन घरला जात होते तर कुणी गाडीबैलात जात होते.
धोंडाई बिच्चारी चालली होती एक एक पाऊल टाकत, दिवस कलला होता अंधारून आलं होतं. पाटलाचा शिवाज्या मारुतीच्या देवळात दिवा घेऊन चालला होता. सावता माळ्याच्या मंदिरात पाच-सहा धोंडाईच्या पिढीतले म्हातारे हरिपाठ म्हणत बसले होते. त्यातल्या आसऱ्या बाबांनी धोंडाईला आवाज दिला.
"अय धोंडाई आज एकटीच का..! लेवुक कुठशिक गेला अन् पार बोडक्या बाभळीगत झाली हायसा,ते लाकडाचं पेंडक कश्याला घेऊन यु राहिली..!"
धोंडाई एक नाय का दोन नाय, मुकाट्यानं मान हालत तिच्या घराच्या गल्लीने निघुन गेली. धोंड्याई जात होती तिच्या मार्गाला मी बसलो होतो देवळा महुरच्या पारावर, गावचा येता-जाता माणूस मला ईचारत हुता.
"काय छोटे सरकार कौशिक आलासा शहरावरून..?"
मी एकच उत्तर देत होतो, "आलो काल संच्याला."
शिवणामाय भर उन्हाळ्यात ही अजून तुडंब भरुन वाहत होती. यावर्षी पावसाची कृपा म्हणून गाव खुश होता. माझ्या मनात शहरातले असंख्य प्रश्न होती, त्यांना या नदी पात्रात नजर लावून उत्तर शोधत होतो.
पूर्वी असलेले शहराचं आकर्षण आता कमी होऊ लागलं होतं. पण कुठलाही विलाज नव्हता, कारण माझा गाव मला कधीच परका झाला होता. मी बसलो होतो शिवणामायच्या पात्रात डोळे लावून बघत कधीचाच. धोंड्याई घरला पोहचली अन् डोक्यावरचं पेंडके अंगणात टाकून, कटूर्यात पाणी घेऊन अंगणातल्या दगडावर हातपाय धुवत, घासत बसली. हातपाय धुवून,देवाला दिवाबत्ती करून धोंड्याईन चूल पेटवली. धगधगता चुलीच्या निखाऱ्याने धोंड्याईला जरा बरं वाटलं असावं.
चुल्हीवर कोरा चहा उकळत होता. साऱ्या घरात त्या कोऱ्या चहाचा सुगंध दरवळत होता. धोंड्याईन सांडशित पातीले पकडून ढवळ्या कान फुट्या कपात चहा गाळून घेतला. चुल्हीच्या उजेडात एक हाताने बशी सावरत अन् एका हाताने नाकातली लांब झुबक्याची नथ सावरत धोंड्याई चहा पित होती. चहा पिऊन झाली अन् धोंड्याईने भाकरी थापायला परातीत पीठ घेतलं. भाकरी थापायचा आवाज माझ्या बसल्या पारा पहूर येत होता. मी त्यात गुंग होऊन माझ्या शिवणामायला न्याहाळत बसलो होतो.
धोंड्याई एका हातानं कोऱ्या चहाचा कप सावरत दुसऱ्या हाताने लांब झुबक्याची नथ सावरत चहा पित होती. चुलीचा धुर सर्व घरात मावत नव्हता. खिडकीच्या तावदानातून बाहेर पडणार धूर मला मी बसलेल्या पारावरून दिसू लागला होता. आतापर्यंत सांजचा देऊळातला हरिपाठ झाला. मंदिरातील माझ्या आज्याच्या वयातील म्हातारी लोकं आपापल्या घराला जाण्या वाटेला लागली होती. गावाला गावपण या शेवटच्या घटका मोजणाऱ्या वडीलबाप माणसांमुळेच होतं. घरला जाता-जाता दगडू आज्यानं मला हटकलं अन् प्रश्न केला,काय लका कधी आलासा शहरावरून..?
अन् त्याच्या सोबतच्या आज्याला माझी ओळख करून देऊ लागला. "शामराव, हा रामा आणाचा मधल्या लेकाचा धाकटा लेक हायसा, कालिजाला जिल्ह्याच्या शहराला अस्तूया."
मी त्यांच्याकडे बघतच आदराने मान झुकवत नमस्कार केला अन् तब्येतीची विचारपूस केली. हाल-हावाल विचारपू्स झाली अन् दगडू आज्याने मला येतू लका म्हणत काढता पाय घेतला.
एरवी मी नदीच्या किनाऱ्यावर बसून कधीचाच न्याहाळत असलेल्या पाण्याला अन् अलवार शांत वाहणाऱ्या पाण्याला नजरेत सामावून घेत होतो...
-भारत लक्ष्मण सोनवणे.