पिन्नी, पंजिरी आणि डोडा बर्फी

युवा विवेक    22-Sep-2022
Total Views |

pinni, panjiri and doda barfi
 
 
 
पिन्नी, पंजिरी आणि डोडा बर्फी
पंजाबी गोड पदार्थांची यादी पाहायला सुरुवात केली तेव्हा तीन वेगळी नावे दिसली. पंजाबी लोक खूप वेगळे गोड पदार्थ करून खात नाहीत. पण हे तीन पौष्टिक पदार्थ आवर्जून करतात. साखर तब्येतीला चांगली नसली तरी त्याचे प्रमाण कमी करून हे पदार्थ करता येतील.
पिन्नी - जसे आपल्याकडे हिवाळ्यात डिंकाचे, मेथीचे लाडू करतात तशी तिकडे पिन्नी करतात. यासाठी उडदाची डाळ पाण्यात भिजवून बारीक वाटतात. तुपात कणिक, बेसन, रवा थोडा भाजतात. त्यात उडदाच्या डाळीची पेस्ट टाकून शिजवतात. हे सगळे मिश्रण साखरेच्या पाकात परत आटवतात. आवडीनुसार खावा आणि सुकामेवाही असतो. हे मिश्रण कोरडे झाले की त्याचे लाडू वळतात किंवा लंबगोलाकार आकार देतात. ही पिन्नी हिवाळ्यात नाश्त्यासोबत खातात. लहान मुलांसाठी तर छान पौष्टिक खाऊ. यातील पीठे आवडीनुसार बदलतात. साखरेऐवजी गूळही वापरतात. शेल्फ लाईफ कमी असल्याने पाकातली पिन्नी बाजारात किंवा ऑनलाईन कमी मिळते. आता बहुदा केवळ गव्हाची पिन्नी ऑनलाईन उपलब्ध असते.
 
पंजिरी - डिंकाचे लाडू आणि गुळपापडीच्या वड्या यांचे फ्युजन म्हणजे पंजाबी पंजिरी! मला केवळ कृष्ण जन्माष्टमीला जी पंजिरी प्रसाद म्हणून मिळते तीच माहित होती. पंच म्हणजे पाच आणि जिरिका म्हणजे जिरे या दोन शब्दाची संधी. या मूळ रेसिपीत गव्हाचे पीठ, तूप, जिरे धने आणि सुंठ असते. गव्हाचे पीठ तुपात भाजून त्यात बाकी पदार्थ टाकतात, चवीपुरता साखरही. ही पंजिरी माझी आवडती. जन्माष्टमीला गोपाळकाल्यापेक्षा या प्रसादाचे मला कायम जास्त आकर्षण होते. पंजाबी लोकांनी या रेसिपीला जरा शाही तडका दिला. तुपात भाजलेल्या गव्हाच्या पिठात तळलेला डिंक, सुकामेवा, मखाने, बडीशेप, खरबूजाच्या बिया, ओवा आणि इतर पदार्थही टाकायला सुरवात केली. तसं तर ही नवीन पंजिरी उत्तर भारतात सगळीकडे तयार होते. पाक नसल्याने बरेच दिवस टिकते. ताकद येण्यासाठी ही पंजिरी लहान मुलांना आणि बाळंतिणींना खायला देतात. सगळे हेल्दी फॅट्स, थोडे प्रोटीन आणि कार्ब्स आहेत यात!
 
डोडा बर्फी - नाव वेगळेच वाटले ना? स्वातंत्र्यपूर्व भारतात, सरगोधा जिल्ह्यात १९१२ मध्ये हरबान विग नावाचे एक पंजाबी पहिलवान होते. अर्थातच त्यांच्या आहारात दूध, सुकामेवा आणि तुपाचा समावेश होता. पण त्यांना हे सगळे रोज खायचा कंटाळा यायचा मग त्यांनी किचनमध्ये प्रयोग करायला सुरवात केली. त्यांनी दूध, मलाई, तूप, सुकामेवा आणि साखर एका मोठ्या कढईत टाकून परतायला सुरवात केली. दूध आटल्यावर त्याचे घट्ट मिश्रण तयार झाले. याच मिश्रणाच्या त्यांनी वड्या केल्या. फज सारख्या आणि तोंडात चिकटणाऱ्या या बर्फीला त्याच्या गुणधर्मावरून त्यांनी 'डोडा' नाव दिले. सगळ्या पहिलवानांमध्ये हा पदार्थ खूप लोकप्रिय झाला आणि ते हरबान यांच्या घरी बर्फी खायला यायचे. ही लोकप्रियता पाहून विग कुटुंबीयांनी ही बर्फी त्यांच्या दुकानात विकायला सुरवात केली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सगळे कुटुंब आपल्या दुकानासह पंजाबमधील कोट्यकपुऱ्यात स्थायिक झाले. पाकिस्थानमध्ये त्याचे घर आणि दुकान ज्यांना मिळाले त्यांनी ती परंपरा सुरु ठेवली आणि त्या रस्त्याला 'दोधा' नाव दिले. इकडे भारतात दोधा चौक आहे. विग कुटुंबीयांची तिसरी पिढी, त्यांचा पणतू विपीन विग आता 'रॉयल डोडा हाऊस' चे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि १०० वर्षे जुनी परंपरा जपत आहेत.
 
डोडा बर्फी केवळ भारतातच नव्हे तर जगभर वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सतर्फे विकली जाते. जितकी गोड ही बर्फी तितकीच ही कहाणीही गोड आहे! पेढ्याशी यमक जुळणारी ही डोडा बर्फी आता वेगवेगळ्या सणांना खाल्ली जाते आणि केवळ पहिलवानांचे खाद्य नाही. साधी सोपी रेसिपी! फाळणीला पुरून उरलेली ही बर्फी आज आपल्या पंजाबची ओळख झाली आहे!
 
सावनी