सरसो का साग और मक्के दि रोटी
सरसो म्हणजे मोहरी हे माहित नव्हते त्या वयातही पंजाबी लोक सरसो का साग और मक्के दि रोटी खातात हे मला माहित होते. आलू का पराठा, गाजर का हलवा हे असेच बॉलीवूडच्या कृपेने घरोघरी पोहोचलेले पदार्थ! पंजाबी ग्रेव्ह्या रेस्टॉरंटवाल्यांनी फेमस केल्या. राज आणि सिमरन 'दिल वाले दुल्हनिया जायेंगे' मध्ये सरसोच्या शेतात भेटतात. हे पण ज्ञान तसे उशिरा मिळाले. पण तोपर्यंत मक्के की भाकरी खाल्ली होती. एकदा एका पंजाबी मैत्रिणीने हे दोन्ही पदार्थ खाऊ घातले, पण त्यापेक्षा मला त्यांचे पराठे जास्त आवडले. हे पदार्थ जरा ओव्हररेटेड आहेत असे माझे मत आहे. पंजाबबद्दल लिहितांना काहीतरी वेगळे पदार्थ शोधायचे ठरवले पण सुरुवात इथूनच होते आहे. असो.
साध्या भाषेत सांगायचे तर मोहरीच्या पानांची पातळभाजी आणि मक्याची भाकरी. मोहरीची पाने, पालक, बथुआ (चाकवत) कुकरमध्ये मऊसर शिजवून घ्यायचे. बेसनाऐवजी मक्याचे पीठ थोडे पाण्यात मिसळून घट्टपणा यावा यासाठी वापरावे. मग फोडणी द्यावी. फोडणीत आवडीनुसार कांदा, लसूण आणि बाकी मसाले असतात. झाले सरसो साग तयार! मक्याची रोटी आपल्या ज्वारीच्या भाकरीसारखी करतात आणि कधीकधी त्यात तिखट, हळदही असते. इतकी सोपी कृती आहे. मोहरीची पाने मिळाली तर कोणीही घरी बनवू शकेल. सागची चव मला विशेष वेगळी वाटली नसली तरी पंजाब्यांनी पालेभाजीला ग्लॅमर दिले याचे मला खूप कौतुक आहे. खरंतर हा गरीब लोकांचा नाश्ता आहे. पंजाबतही शेतकरी खूप आहेत. तिथल्या थंडीत काम करायचे तर नाश्ताही भक्कम हवा. मोहरी गरम असते त्यामुळे तिथल्या हवेला मानवते. कॉम्बिनेशनला तोड नाही असे बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे आणि मी त्यांना सपोर्ट करेन ते एका गुणामुळे, कमी कॅलरीज! आता काही लोक म्हणतील सरसो का सागला तूप किंवा लोण्याची फोडणी असते, पण त्याचे प्रमाण कमी असते. शिवाय हे हेल्दी फॅट्स आहेत. म्हणजे पहा या कॉम्बिनेशनमध्ये फॅट्स, व्हिटॅमिन आणि फायबर (पालेभाज्या), कार्ब्स (मका) असे सगळे मिळते. उरते ते प्रोटीन, त्यासाठी पनीर आणि लस्सी असतेच. नॉन-व्हेज खाणाऱ्या लोकांसाठी अजून पर्याय आहेतच. मक्याच्या रोटीबद्दल काय वेगळे लिहिणार? गरमगरम रोटी आणि त्यावर लोण्याचा गोळा असेल तर एक क्षण आपल्या थालीपीठाला विसरू शकता. (एकच क्षण हं)
या कॉम्बिनेशनला जितके ग्लॅमर मिळाले तितके आपल्या डाळभाजी (विदर्भ), पातळभाजी आणि अळूच्या फदफद्याला कधी मिळेल ते देवालाच माहित! या पदार्थासाठीचे वेड अजून एका कारणामुळे असावे, सरसो वर्षभर मिळत नाही. त्यामुळे हिवाळ्यातली डेलिकसी आहे मराठवाड्यात हुरडा पार्टी तशीच. पंजाबात बनलेल्या या पदार्थाने आता जगभर लोकांच्या मनात जागा मिळवली आहे. पंजाबी पदार्थ भारत आणि पाकिस्तानमध्ये समान दुवा आहे. पाकिस्तानी लोकांचे या पदार्थांवर तितकेच प्रेम आहे. भारतभर हिवाळ्याच्या दरम्यान नवे पीक येते तेव्हा त्या कच्च्या पदार्थांचे महत्त्व आहे आणि त्यांच्यासाठी सणही आहे. सरसो का साग और मक्के दि रोटी हे काही पक्वान्न नाही पण त्यापेक्षा महत्त्व कमी नाही. इतका सोपा पदार्थ लोकांनी का डोक्यावर चढवून ठेवला आहे असं वाटत असेल, तर एकदा आपल्या झुणका-भाकरीला आठवावे. खरं पाहता जितका पदार्थ सोपा तितका लोकांच्या जास्त जवळ पोहचू शकतो आणि केवळ सिझनल असला की, मनात घर बांधून राहूही शकतो. हे पदार्थ आईच्या, आजीच्या हातचेच खायचे असतात, कितीही फेमिनिस्ट असलात तरी यावर माझा विश्वास आहे. बाबा-काका लोकांनी बनवायचे पदार्थ वेगळे, त्यावर नंतर लिहीन. नॉस्टेल्जियाला कशातही तोलू शकत नाही आणि तो कशानेही रिप्लेस होत नाही, याच कारणामुळे सरसो का साग और मक्के दि रोटी आपले स्थान टिकवून आहे!
सावनी