विश्वविनायक

युवा विवेक    31-Aug-2022
Total Views |
 
 
विश्वविनायक

विश्वविनायक

श्रावण सरला की, आतुरता असते ती त्याच्या आगमनाची. गणपती, गणेश, गजानन, विनायक, विघ्नहर्ता अशी त्याची कित्येक नावं. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तो कोणाकडे घरगुती गणपतीच्या स्वरुपात अवतरतो, तर कधी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रुपात. घरगुती गणेशोत्सवाला समाजाभिमुख सार्वजनिक रूप देण्याचं श्रेय जातं ते लोकमान्य टिळक यांना. गणेशोत्सव हा मुळातच महाराष्ट्राच्या जना मनात वसलेला उत्सव आहे. भाद्रपद शुध्द चतुर्थीला गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा घरात होते आणि संपूर्ण घर गणपतीमय होऊन जातं. सार्वजनिक गणपती ही आपापल्या स्थळी स्थानापन्न होतात. निरनिराळया प्रकारचे देखावे, सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम यांची सर्वत्र रेलचेल असते. पण केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात सर्वत्र, त्याचप्रमाणे जगभरातही गणेशोत्सव तितकाच उत्साहपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. वसुधैव कुटुंबकमचा संदेशच तर माणूस यातून देत असतो. आपल्या देशाशी, आपल्या मूळ घराशी, गावाशी असलेली नाळ या उत्सवांमुळेच तर टिकून राहाते, जपली जाते.

महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातला गणेशोत्सवही वैशिष्ट्यपूर्ण असतो. कोकणाचीच पार्श्वभूमी असल्याने बऱ्याचशा परंपरांमध्ये साधर्म्य असलं तरी नैवेद्याचे वेगवेगळे पदार्थ, पारंपरिक सजावट असणारी माटोळी, करंजीचा नैवेद्य या गोव्यातील खास परंपरा आहेत. घरात गणपतीच्या डोक्यावर, छताला लाकडी चौकट असते. या चौकटीला फळांची, रानभाज्यांची सुंदर आरास करतात. माटोळी यालाच म्हणतात. महाराष्ट्र-गोवा सीमाभाग, पणजी, म्हापसा येथे गणेशोत्सवाचा उत्साह अधिक असतो. गोव्याप्रमाणेच गुजरात, तमिळनाडू, मध्यप्रदेश, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा येथेही पाच-सात-दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. हैदराबादमध्ये गणपतीच्या नैवेद्याला भाताची खीर आणि उंद्रल्लू-कुडुमुल्लू हे पारंपरिक पदार्थ केले जातात. कर्नाटकात मोठ्या धामधुमीत गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपतीसोबतच त्याची माता गौरीचीही प्राणप्रतिष्ठा केली जाते. गोज्जू-मोदकम असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. तामिळनाडूत गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी गौरीहब्बा अर्थात गौरीची पूजा केली जाते. मला वाटतं की, महाराष्ट्रात हरितालिकेच्या पुजेशी गौरीहब्बाचं साम्य असावं. महाराष्ट्र आणि गोव्याप्रमाणेच येथेही मोठमोठे मंडप बांधून श्रीगणेशाच्या भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. महाराष्ट्राप्रमाणेच देशभरात अनेक राज्यांमध्ये गणेशोत्सव तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. विशेष म्हणजे पुढल्या वर्षापासून पुण्यातील काही सुप्रसिद्ध गणेशमंडळांनी जम्मू काश्मीरमध्येही गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं घोषित केलं आहे.

केवळ देशातच नव्हे तर जगभरातील अनेक महत्त्वपूर्ण देशांमध्ये आज गणेशोत्सव साजरा केला जातो. आज भारतीय जगभरात पसरलेले आहेत. अमेरिकेपासून जपानपर्यंत भारतीयांचा निवास आहे. खरं तर इतिहासाची पानं उलटून पाहिलं तर इसवीसनापूर्वी कित्येक शतके भारतीयांचा युरोपपासून चीनपर्यंत प्रवास राहिला आहे. तेथील विद्यार्थी विद्यासंपादनासाठी येथील विश्वविख्यात विद्यापीठात येत असत. आज भारतीयांचा या देशातील निवास आणि प्रभाव हा या वैश्विकतेचा दुसरा टप्पा मानता येईल. जिथे जिथे भारतीय गेले तिथे तिथे त्यांनी आपल्या संस्कृतीचे ठसे उमटवले. साधारण सत्तरच्या दशकात अमेरिकेत स्थायिक होण्याचं प्रमाण वाढलं. त्यामुळे साहजिकच अमेरिकेतही आपले सण तितक्याच उत्साहाने साजरे केले जाऊ लागले. १९६९ साली शिकागोत अमेरिकेतील पहिले मराठी मंडळ स्थापन झाले. त्याचप्रमाणे शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या सहभाषिक विद्यार्थ्यांचीही विद्यार्थी मंडळं स्थापन झाली. त्यामुळे अमेरिकेत कॅलिफोर्निया, कॅनडा, शिकागो, ह्युस्टन अशा ठिकाणी सुरुवातीला घरगुती स्वरुपात गणपतीची स्थापना केली जाऊ लागली. पुढे त्यास सार्वजनिक गणेशोत्सवाचं रूप येऊ लागलं. दिवाळीतील फराळाप्रमाणेच आज पेणमधील हजारो गणेशमूर्ती आज अमेरिकेत कुरिअर केल्या जातात. अमेरिकेप्रमाणेच दुबईतही गणेशोत्सवाचं प्रस्थ मोठं आहे. दुबईत वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी आहे. या भारतीयांनी एकत्र येऊन दुबईच्या राजाची स्थापना केली आहे. अल फहिदी मधील सिंधी सेरेमनी सेंटरमध्ये या गणपतीची स्थापना केली जाते. मॉरिशियसमध्ये १९८२पासून गणेशोत्सव साजरा केला जातो. विशेष म्हणजे या देशात गणेशोत्सवाचा पहिला दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते. मंदिरांतून, घरगुती पद्धतीने आणि छोट्या स्वरुपात हा उत्सव साजरा केला जात असला तरी त्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. युकेमधील लंडनमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. सुमारे पाच हजार लोक या उत्सवात सहभागी होतात. होस्लो येथील लक्ष्मीनारायण मंदिरात गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. महाआरतीने उत्सवाची सांगता होते आणि थेम्स नदीत पार्थिव मूर्तीचं विसर्जन केलं जातं. लंडन येथील डॉलीज हिल्स येथील महाराष्ट्र मंडळाच्या वतीनेही गणेशोत्सव साजरा केला जातो. मॅंचेस्टरमधील गीता भवन मंदिर, एडिनबर्गमधील स्कॉटिश गणेशोत्सव, श्री जगन्नाथ मंदिर गणेशोत्सव, श्री पद्मावती श्रीनिवास केंट हिंदू मंदिरातील गणेशोत्सव असे विविध गणेशोत्सव युनायटेड किंग्डममध्ये साजरे केले जातात. पाकिस्तानातील कराची येथे श्री महाराष्ट्र पंचायत यांच्या वतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. दक्षिण आफ्रिकेतील घाना येथील गणेशोत्सव तर लोकांचा आकर्षणाचा विषय आहे. आफ्रिकेतील हिंदू घानामध्ये दरवर्षी गणेशोत्सवात श्रीगणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात, आरती करतात आणि वाजतगाजत विसर्जन सोहळा साजरा करतात. आज आफ्रिकेत सुमारे १२ हजार हिंदू राहतात आणि सुमारे पन्नास वर्षे येथे गणेशोत्सव साजरा केला जात आहे. जपानमधील महाराष्ट्र मंडळानेही गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे जपानमध्ये या सणाची विशेष संस्कृती नसली तरी तेथे श्रीगणेशाचे भक्त पूर्वापार असल्याचं तेथील सापडलेल्या गणपतीच्या मूर्तींवरून दिसून येतं.

मराठी माणूस जिथे जिथे गेला, तिथे तिथे त्याने आपले सण उत्सव साजरे करायला सुरुवात केली. आपले सण-उत्सव, परंपरा जगण्याला उर्मी देतात, जीवनात उत्साह निर्माण करतात, आपली नाळ आपल्या संस्कृतीशी जोडलेली ठेवतात. गणेशोत्सव हा यातीलच एक महत्त्वाचा आणि मराठी माणसासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा उत्सव आहे.