कारगिल विजयगाथेचे रचयिते

युवा विवेक    26-Jul-2022   
Total Views |


kargil din

शेरशहा... २०२१मधला सर्वाधिक गाजलेला सिनेमा. ये दिल मांगे मोअरम्हणत देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या कॅप्टन विक्रम बात्रांची ही वीरगाथा मनाला स्पर्शून गेली. सत्याच्या अधिक जवळ जाणारा आणि वास्तववादी वाटावा असा हा सिनेमा होता. या सिनेमाची आज आठवण होण्याचं कारणही तसंच आहे. मंगळवार, २६ जुलै २०२२ रोजी कारगिल विजयास २३ वर्षं पूर्ण होत आहेत. देव देश अन धर्मासाठी प्राण घेतलं हातीहा बाणा, देशातील प्रत्येक सैनिकाने प्रत्येक संकटाच्या वेळी सार्थ करून दाखवला. कारगिलचं ऑपरेशन विजयहे त्याच पराक्रमाचं मूर्तीमंत रूप आहे. आजही दूरदर्शनच्या माध्यमातून कारगिल युद्ध जिंकल्याचं जाहीर झालेलं आठवलं, तरी तो पराक्रम डोळ्यासमोर उभा राहातो. या युद्धात भारताने अनेक रत्न गमावली; पण पाकिस्तानला कायमचा लक्षात राहील धडा शिकवला. जगाच्या पाठीवर भारताचं नाव वीरांच्या पराक्रमानं पुन्हा एकदा उंचावलं.

 

भारताच्या स्वातंत्र्यासोबत एका विद्वेषानेही जन्म घेतला होता आणि हा विद्वेष शेजारी राष्ट्र म्हणून आपल्या वाट्याला आला होता. १९६५ आणि १९७१ असं दोन वेळा अपयश चाखूनही, पाकिस्तान नावाच्या द्वेषकारी राष्ट्राने आपल्या आगळिकी कमी केल्या नव्हत्या. परंतु, पाकिस्तानचे दुष्ट मनसुबे भारताच्या लष्कराने वेळोवेळी उधळून लावले, डोळ्यात तेल घालून देशांच्या सीमांचं रक्षण केलं, भारताची सुरक्षितता अबाधित ठेवली. पाकिस्तानला पुन्हा एकदा आपल्या जिगरबाज सैनिकांनी हरवलं ते १९९९ साली. केवळ हरवलं नाही, तर या देशाचा नाठाळपणा जगासमोर आणला. कारगिल युद्धाच्या अपयशाने या देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नामुष्की सहन करावी लागली

 

या युद्धाची पार्श्वभूमी जाणून घेऊ. अणुचाचणीवरून भारत आणि पाकिस्तानचे संबंध टोकाला गेले होते. हे वातावरण निवळावं म्हणून, दोन्ही देशांनी फेब्रुवारी १९९९मध्ये लाहोर येथे करार केला. तत्कालीन पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी हे पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या आमंत्रणावरून त्यांच्या भेटीसाठी लाहोर येथे गेले होते. दोन्ही देशांमध्ये बससेवा सुरू करण्यात आली. एकिकडे भारत तणावपूर्ण संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात असताना, पडद्यामागे पाकिस्तान मात्र पाठीत सुरा खुपसण्याची तयारी करत होता. संपूर्ण काश्मीरमध्ये लाखोंच्या संख्येने लष्कर तैनात असले तरी, कारगिलसारख्या दुर्गम भागात मात्र तीन ते चार हजार सैनिकच तैनातीला होते. त्यामुळे पहारा कमी असलेल्या सीमाभागातून पाकिस्तानी सैनिक हळूहळू भारतीय सीमेत घुसखोरी करत होते. भारतीय सैन्याला याची कुणकुण लागली होती. मे १९९९मध्ये एके दिवशी काही मेंढपाळांना भारताच्या हद्दीतील चौक्यांवर काही हत्यारबंद माणसे आढळली. मेंढपाळांनी भारतीय सैन्याला ही बातमी कळवली. पण तोपर्यंत पाकिस्तानने जवळपास २०० ते ३०० किलोमीटर क्षेत्रावर ताबा मिळवला होता. पाकिस्तानला सियाचीन सीमेवरील भारतीय लष्कराची रसद तोडण्यासाठी कारगिल श्रीनगर मार्ग कब्जात घ्यायचा होता.

 

जगभरातील सर्वात उंच भागात झालेल्या युद्धांपैकी एक म्हणजे कारगिल युद्ध. मुळातच हा भाग डोंगराळ आणि दुर्गम होता, त्यामुळे युद्धस्थिती अधिक आव्हानात्मक होती. क्षेपणास्त्रांच्या माऱ्यापेक्षा पायदळाने करण्याचं युद्ध होतं. त्यामुळे कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानी लष्करावर थेट हल्ला करून या युद्धात विजय मिळवला. पाकिस्तानचे जवळपास चार हजार सैनिक यात मारले गेले. भारतीय लष्करातील ५४६ अधिकारी आणि जवानांना कारगिल युद्धात वीरमरण आलं. विशेष म्हणजे कारगिल युद्धात वीरमरण आलेले भारतीय जवान हे १८ ते २८ वयोगटातील, म्हणजे देशातील तडफदार युवकांचं प्रतिनिधित्व करणारे होते.

 

या युद्धात चार परमवीर चक्र, चार महावीर चक्र, २९ वीरचक्र आणि ५२ सेना मेड्ल प्रदान करण्यात आले होते. कारगिलच्या युद्धात अनेक सैनिक हुतात्मा झाले. लेफ्टनंट सौरभ कालिया यांना पाकिस्तानच्या घुसखोरीची माहिती सर्वप्रथम मिळाली आणि त्यांनी ती भारतीय लष्कराला दिली. पाकिस्तानने सौरभ कालिया यांना ताब्यात घेऊन अत्यंत क्रूरपणे त्यांना मारले. ले.कालिया यांच्या निधनाने भारताच्या मनाला झालेली जखम आजही भरून निघालेली नाही. देशाचा ध्वज रोवून येईन वा त्यात लपेटून येईन, पण येईन नक्की असं म्हणणारे कॅ.विक्रम बात्रा. शेरशहा म्हणून परिचित असणारे कॅ.बात्रा यांनी कारगिल युद्धात असाधारण असा पराक्रम गाजवला. ८ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने ऐतिहासिक यश मिळवित १६ हजार फूट उंचीवर असलेले ४८७५ शिखर परत मिळविले. परंतु, या मोहिमेत कॅप्टन बत्रा यांना वीरमरण आले. राजपुताना रायफल्सचे कॅप्टन विजयंत थापर यांनी अक्षरशः पंधरा मीटर अंतरावरून पाकिस्तानी लष्कराला लढत दिली, हा पराक्रम गाजवताना त्यांना वीरमरण आलं. खालूबर रिजलाइन पाकिस्तानी जवानांच्या ताब्यातून सोडविताना, कॅप्टन मनोज पांडे हुतात्मा झाले. २३ जुलैच्या रात्री पाकिस्तानी जवानांनी कॅप्टन पांडे आणि त्यांच्या टीमवर तुफान गोळीबार केला. यात त्यांना जबर जखम झाली. मृत्यू समोर दिसत होता तरीही त्यांना सोडू नकाअशा शब्दात ते सहकाऱ्यांना प्रेरणा देत होते. ग्रेनेडिअर योगेंद्र सिंह यांच्यावर टायगर हिल्स ताब्यात घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी व त्यांच्या टीमने टायगर हिल वर मानाने तिरंगा रोवला. रायफलमॅन संजयकुमार यांनी जीवाची पर्वा न करता पाकिस्तानी लष्करावर हल्ला केला. स्वतः जबर जखमी असतानाही पाकचे पाच सैनिक त्यांनी ठार मारलं व त्यांनी ताब्यात घेतलेली चौकीही उडवली. संजयकुमार इतके जबर जखमी झाले होते, की त्यांच्या मृत्यूचे वृत्तच सर्वत्र पसरलं. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात सहभागी झालेले असताना रायफलमॅन संजयकुमार यांनी स्वतः विदीत केलेला त्यांच्या पराक्रमाचा वृत्तान्त आपल्याला यूट्यूबवर ऐकायला मिळतो. प्रेरणादायी असा हा वृत्तान्त सर्वांनी ऐकावा असाच आहे. पॉईंट ४८७५ ताब्यात घेण्याची जबाबदारी कॅप्टन अनुज नायर यांना देण्यात आली होती. शत्रूपक्षाच्या तुफान गोळीबाराची पर्वा न करता ते टीमसह पुढे सरकत राहिले. त्यांनी पाकिस्तानी लष्कराचे तीन बंकर नष्ट केले. चौथा बंकर नष्ट करण्याच्या प्रयत्नात ते स्वतः हुतात्मा झाले. मेजर पद्मपाणी आचार्य, मेजर राजेश सिंग अधिकारी, कर्नल सोनम वांगचुक, कॅ. केंगुरुसे, स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा अशा अनेक भारतमातेच्या सुपुत्रांनी कारगिलच्या युद्धात असाधारण शौर्य गाजवलं.

 

आपण भारताच्या स्वातंत्र्ययुद्धाचं रोमहर्षक पर्व पाहिलं नाही. साठसत्तरच्या दशकात झालेली भारत-पाक आणि भारत-चीन युद्ध पाहिली नाहीत. पण हो आपल्या पिढीने अनुभवला आहे तो कारगिलच्या ऑपरेशन विजयचा रोमहर्षक थरार. तरुण तडफदार, सळसळती ऊर्जा असणारे अनेक नरवीर आपण या युद्धात गमावले.

देश आमुचा शिवरायाचा,

झाशीवाल्या रणराणीचा,

शिर तळहाती धरू,

जिंकू किंवा मरू असं म्हणत अतुलनीय पराक्रम ज्यांनी गाजवला त्यांच्या हौतात्म्याचं, पराक्रमाचं, त्यांच्या योगदानाचं स्मरण करण्याचा २६ जुलै हा दिवस आहे. आणि हा दिवस आहे त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा. देशसेवेत योगदान देण्याचा.

- मृदुला राजवाडे