सिमांतनी..!

युवा विवेक    08-Jun-2022   
Total Views |


simantani

 हळदीने हात पिवळे झाले, लग्न झाले अन् नवतीचे नऊ दिवस संपले. एकोणिशीची सिमांतनी आता दिवसभर कामाच्या अन् तिच्या संसाराच्या गराड्यात गुंतून गेली होती. गावाकडल्या साल दोन साल लग्न झालेल्या टिपिकल बायकांप्रमाणे, तीही कामं करू लागली. दिवसभर रोजंदारीने लोकाच्या वावराला खुरपणी, निंदणी करू लागली...
 

ऐन तारुण्यात केलेलं पदार्पण अन् अंगावरील संसार नावाच्या एका परंपरेत स्वतःला झोकून देऊन ती दिवसभर कामं उपसायची अन् रात्री ऐन तारुण्यात आलेला तिचा दादला तिला घटकेभरचाही उसंत द्यायचा नाही... चार - सहा महिने मागे पडले. ऐन सुगीच्या दिवसात ती, तीन महिन्याची पोटुशी असताना तिला कळलं अन् घरात आनंदाला पारावर उरला नाही.

 

कुणाच्या मनात घटकाभरही हा प्रश्न आला नाही की, एकोणिशीची सिमांतनी या सर्व गोष्टींना सामोरं जाईल का? तिला इतक्या लहान वयात आलेलं बाळंतपण झेपेल का? शेवटच्या काही महिन्यातलं सावरणं तिला स्वतःला जमेल का? प्रश्न खूप होते, पण सर्व प्रश्नांना एकच उत्तर होतं!

 

ती काही जगाच्या पाठीवर न्यारी नाही, तिच्या मायला जमलं, तिच्या सासूला जमलं अन् आता तिच्या अठरा वर्षाच्या नंदेला जमलं.

मग तिला का नाही..?

दिवसा मागून दिवस जात होते. सिमांतनी आता सहा महिन्यांची पोटूशी होती. एकोणाविसाव्या वर्षी वाळक्या अंगकाठीच्या सिमांतनीच्या पोटाचा घेर, नववा महिना चालू असल्यागत दिसत होता.चालताना फारवेळ चाललं की तिला आता धापा लागू लागली. पण परसदारच्या छोट्या आडातून पाणी शेंदून आणणं तिला चुकायचं नाही. इतकाच काय तो दिलासा तिला मिळाला होता की, कंबरेवर घेऊन येणारी कळशी आता, तिला तिची सासूबाई आणून देत नव्हती. मात्र डोईवर असलेला हंडा मात्र काही केल्या तिच्या नशिबातून या अवस्थेलासुद्धा खाली पडला नव्हता.

 

सांजेच्या वेळी अंगणातील सारवासारव आवरली की, सिमांतीनी हातपाय धुवून, वेणीफणी करून, डोक्यात भांगेच्या मधोमध सिंदूर भरून, चंद्रकोर टिकली कपाळावर लावत, अंगावर घातलेल्या काठ नववार लुगड्यासारख्या साडी चोळीत ती, अक्षरशः सौंदर्यवती दिसायची अन् आता त्यास भर म्हणून पोटूशी असल्यामुळे पुढे आलेला पोटाचा घेर. या दिसण्याला अगदी कुणाची नजर लागावी इतकी ती सुंदर दिसत होती. दिवसभर इतकं सर्व काम करूनही सिमांतीनी सांजेच्या या वेळेला, अक्षरशः देवीच्या चेहऱ्यावर असलेलं तेच तिच्या चेहऱ्यावर घेऊन यायची.

 

अंगणात असलेल्या तुळशी वृंदावनात तेलाचा दिवा ठेवून, तो सदैव तेवत राहील याची खात्री करून, ती वृंदावनाभोवती तीन प्रदक्षिणा घालून, अस्ताला जाणाऱ्या सूर्याला नमस्कार घालत, आतल्या घरात यायची अन् सासू सासऱ्याच्या पाया पडायची.

 

जसं अंधारून यावं तसं अग्निदेवी तिची वाट बघत असावी, अशी चुल्हांगण पेटवायला वाळलेली लाकडे घेऊन यायची अन् संसाराच्या या रहाटगाड्यात अगदी जाणत्या संसारी स्त्रीसारखी चुल्हीला पेटवायची. दादल्याला, सासू – सासऱ्यांना कोऱ्या चहाचं आदण चुल्हीवर ठेवायची, उकळून उकळून पार काळा झालेला चहा, जवा ती कपात ओतायची तेव्हा, त्यातून निघणारी वाफ साऱ्या घरात मिरायची अन् तो सुगंध साऱ्या घरात फेर धरायचा.

मग तिचं एका हातानं नथीचा झुबका सावरत चहा पिणं व्हायचं अन् तिच्या दादल्याचं तिला प्रेमानं न्याहाळणं.

अस्ताला गेलेला सूर्य अन् पूनवेचा उगवता चंद्र, कोरा चहा घशाखाली नेऊन सोडला अन् सिमांतनीने दोन्ही हात टेकवत वाढलेला पोटाचा घेर सावरत पडवीत ठेवलेल्या चहाच्या कपांना अन् सकाळपासून सांजवेळेपर्यंत पडलेल्या भांड्याच्या गराड्यास मोकळ्या परसदारच्या अंगणात घासायला म्हणून घेऊन आली.

 

पोटूशी बाई असल्यानं चिरायची कामं सबबीने तिची सासूबाई तिला करू देत नव्हती. यामागे काळजी कितपत होती अन् विचारांची अंधश्रद्धा किती हे कळून चुकलंच होतं. त्याला पर्याय नव्हता. काही का असेना काही कामांपासून सिमांतनीची तूर्तास तरी सुटका झाली होती.

 

सिमांतनी मोकळ्या अंगणात भांडे घासत बसली होती. मनात आपल्या बाळाचा चालू असलेला विचार अन् बाळासाठी असलेला आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टच दिसत असायचा. भांडी हिसळत असतानाचा आवाज अंगणातून महुरच्या घरापर्यंत जायचा अन् भांड्याचा आवाज जसजसा वाढायचा तसतसा सिमांतनीच्या दादल्याच्या चकरा काळजीने आत बाहेर चालू असायच्या.

 

घमिल्यात असलेल्या पाण्यात, पूनवेचा उगवता चंद्र हलत्या पाण्यात हलताना तिला दिसत होता, कित्येकवेळ त्याला न्याहाळत ती भांडे घासत राहिली. दिवसभरच्या कामामुळे तिच्या कंबराला हल्ली कळ लागलेली जाणवायची. सडपातळ बांधा असलेली ती उंच असल्यानं अन् कंबर आधीच इतभर असेल, त्यात या दिवसभरात अंगावर येणारे काम, दिवसभर कसेतरी ती रेटत करायची.

 

सांजेच्या प्रहरी कंबर दम मारायची नाही अन् कधी एकदा धरतीला पडते असं सिमांतनीला व्हायचं...

क्रमशः

लेखक : भारत लक्ष्मण सोनवणे.