सिमांतनी भाग-२

युवा विवेक    22-Jun-2022
Total Views |



simantani

भांडे घासूस्तोवर तिच्या सासूबाईनं, चुल्हंगणावर पिठलं करायला टाकलं होतं. दगडी खलबत्यात लसूण-मिरचीच्या कुटून केलेल्या ठेच्याचा, परतल्याचा वास साऱ्या घरात मावत होता. त्या ठसक्यात तिच्या सासऱ्याला खोकल्याची उबळ आली अन् म्हतारा, म्हतारीच्या आई बापांचा उद्धार करत पडवीत येऊन बसला...

 

लोखंडी डब्ब्यात असलेलं पीठ लाकडी परातीत घेऊन सिमांतनी, भाकरी बडवत बसली. एकिकडे लालबुंध झालेला चुल्हीचा अंगारा अन् त्यावर भाकरी शेकत, भाकरी करणं चालू होतं. दुसरीकडे पिठलं आळत होतं. पिठलं आळत असतानाचा आवाज सिमांतनीला खूप आवडायचा. मग ती न चुकता अशावेळी भाकरी बडवायला बसायची.

 

भाकरी झाल्यावर सिमांतनीचा दादला, सासरा, म्हतारीवर कोकलतच भाकरी खायला बसली. एकीकडे सिमांतनी भाकरी बडवत होती अन् तिची सासूबाई डोक्यावरचा पदर सावरत, बाप लेकाला वाढून देत होती. दोघेही जेवत होती. त्यांचे उरकले अन् मग दोघी सासू-सूना भाकर खायला म्हणून बसल्या...

एकीकडे दोघी भाकर खात होत्या, एकीकडे सिमांतनीचा दादला चौकटीजवळ बसून तिला न्याहाळत, आईशी रानातल्या गप्पा हानत बसला होता. म्हातारा आपला बिडी शिलगुन पडवीत असलेल्या रेडूवर, आठ वाजेच्या बातम्या ऐकत झुरके मारत बसला होता.

 

भाकर खावून झाली. उरलेली कामं आवरून सिमांतनी चुल्हीचा आहार विझवायला म्हणून माजघरात आली अन् बघती तर काय चुल्हीच्या एकांगाला ठेवलेल्या तव्यावर असलेला विस्तव चांदवं पडल्यागत हसत होता. सिमांतनी त्याच्याकडे बघून आपल्या वाढत्या पोटाकडे बघत मनातच हसू लागली अन् कितीवेळ त्या तव्याकडे बघू लागली. पल्याड असलेल्या वळकटीतून तिचा दादला तिचं हे सुंदर सौंदर्य बघत होता अन् ती तो खुलून गेलेला हसरा तवा...

रात्रीची भाकर खावून झाली अन् सिमांतनीने भांड्यांचा गराडा परसदारच्या अंगणात घेऊन ती भांडे घासायला बसली. तिच्या जोडीला आता सासूबाई, भांडे नारळाच्या काथीने रखुंड्यात घासून देत होती अन् सिमांतनी ते भांडे हिसळून भांड्याच्या घमिल्यात टाकत होती.

 

एरवी सिमांतनीचा सासरा बाहेर टाकलेल्या लाकडी बाजीवर खोकलत निपचित पडला होता. बिड्यांच व्यसन आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजण्यापर्यंत त्याला घेऊन आलं होतं. तो चेहऱ्यानं पार कृश झाला होता, काळा पडला होता, खोकून खोकून पार छातीचा भाता झाल्यागत त्याची छाती उघडी पडली होती. सिमांतनीच्या दादल्याने मधल्या घराच्या वळकटीत चटई अंथरली अन् गादी टाकून, अंगावर गोधडीचे पांघरूण घेऊन तो कधी दिव्याच्या उजेडाकडे तर कधी त्याच्या सावलीकडे बघत, सिमांतनीची वाट बघत लोळत पडला होता.

दिवसभराच्या बकऱ्या राखणीच्या कामामुळे, त्याला त्याच्या बायकोशी बोलायलासुद्धा फुरसद नसायची अन् रानात दिवसभराचा वखत कसा निघुन जातो याचीही त्याला कल्पना यायची नाही.

अलिकडे सिमांतनीच्या या अडेलतडेल दिवसांत मात्र त्याला आपली तिला वेळ न देण्याची चुकी कळू लागली होती अन् तिला कमीतकमी या दिवसांत तरी आपल्याकडून हे शब्दांचे प्रेम मिळावे म्हणून तो प्रयत्नशील असायचा. गेले काही दिवस ते दोघेही हा प्रेमाचा सहवास अनुभवत खुश होते, त्यातच येणाऱ्या बाळाची लागलेली चाहूल, बाळाचा विषय निघाला की दोघेही या आनंदाने, कल्पनेने खुश होवून जायचे.

 

सिमांतनीचे भांडी घासून झाले अन् तिने सासूबाईंना बैठकीच्या खोलीत रजई अंथरून त्यावर अंथरूण टाकून दिले. झोपेच्या वेळेला लागणारा लिंबाचा काढा देऊन सिमांतनीने सासूबाई झोपी गेल्यावर, थंडी वाजू नई म्हणून सिमांतनीच्या आईनं दिलेली रघ सासूबाईंच्या अंगावर टाकून, तिनं मोहरल्या दारचे कडी कोंडे लावून दिवा मालवला अन् ती झोपायला म्हणून तिच्या खोलीत गेली...

अजूनही तिचा दादला तिची वाट बघत लोळत पडला होता. ती आल्याचं बघून त्यांना एक मंद स्मित हास्य देत तिच्याकडे अन् एकवार तिच्या पोटाकडे बघत त्याने तिला बसायला खूनवले. हिवाळ्याचे दिवस असल्याने घरावरचे पत्रे पार गारठून गेले होते अन् कुठं कुठं ते रीसायलासुद्धा लागले होते.

 

आता दोघेही अंथरुणावर अंग टाकून गप्पा मारत बसले होते. गप्पांचा विषय काय असावा..?

आपल्या बाळाचे आयुष्य अन् त्याचे भविष्य कसे उज्वल ठरेल, त्याला शहराच्या शाळेला टाकायचं राहील म्हणून लागणारा पैका अन् त्याचं नियोजन कसं करायचं अन् होणारं बाळ कुणावर असेल यावर तर, त्यांचे प्रेमळ वाद नियमित होत असायचे. दोघेही वयाने लहान असल्यामुळे कदाचित असेल पण, आईबाप होण्याची दोघांना लागलेली चाहूल अलिकडे त्यांना शहाणं करत होती अन् यामुळे आपसात असलेलं त्यांचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच होते.

दिवभरच्या थकव्यातून रात्रीच्या झोपे अगोदरच्या त्यांच्या या रोजच्या गप्पा त्यांना त्यांचा थकवा विसरायला भाग पाडायच्या. बराच वेळ झाला होता अन् दोघांनाही आता झोप येत होती, म्हणून दोघेही अंगावर पांघरून घेऊन झोपले होते.

 

फळीवर ठेवलेली चिमणी विझू की मिनमिनू करत होती अन् याच उजेडात दोघेही झोपी गेले होते. आता दोघांची सावली एक झाली होती अन् त्यांच्या आयुष्यातील एक रात्र जसा सूर्य अस्ताला जावा तशी अंधाराकडे कलत उद्याच्या उजेडाकडे निघाली होती...

क्रमशः

लेखक:भारत लक्ष्मण सोनवणे (औरंगाबाद)