लाल कुरडई..!

युवा विवेक    25-May-2022   
Total Views |



kurdai 

उन्हाळ्याचे दिवस सुरू होवून महिना-पंधरादी सरले होते अन् आता भर दुपारच्याला उन्हं चांगलीच काहीलीची पडायला लागली होती. भर दुपारच्या वख्ताला सारा गाव वाऱ्याच्या अंगाला होवून निपचित पडलेला असायचा.


गावातल्या बायका, म्हाताऱ्या आज्या, नव्यानं लग्न होवून आलेल्या सूना वारा खायला म्हणून गावात फार पूर्वीचा अन् गावच्या मधोमध असलेला ज्याला साऱ्या गावची लोकं "सावली बाईचा पिंपळ" म्हणून हाकारत त्या पिंपळाच्या पारावर गप्पा झोडीत बसलेल्या असायच्या..!

 

त्यांच्या बोलण्यात अनेक विषय असायचे. कुणाची लेक माहेरपणाला आलेली असायची, कुणाच्या लेकीला सासुरवास होतोय, कुणाचा ले शहराला नोकरीला लागलेला असायचा, कुणाच्या वावरात काय काम चालू आहे, बरसदीच्या दिवसासाठी वावर गरम व्हायला म्हणून कोणी उन्हं खायला खाली ठेवली, कुणी ओलिता खाली ठेवली, हल्लीच गावचे एकुलते एक लष्करात असलेले दामू आण्णा सरदार नुकतेच रिटायर झाले. त्यांच्या स्वागतासाठी गावात झालेला उत्साह, गावच्या वाचनालयाला दिलेलं त्यांचं नाव असे अनेक विषय अन् अश्या अनेक गप्पा पिंपळाच्या पारावर रंगलेल्या असायच्या..!

 

या विषयांना लागून एक महत्त्वाचा विषय सध्या गावातल्या बायकांच्या गप्पामध्ये असायचा, तो म्हणजे कुरडई, पापड यांचा चालू झालेला हंगाम. सध्या गावात कुरडई, खारुडी, नागलीचे, उडदाचे पापड, चिप्स, काटेशेव करण्याची धूम चालू होती. या कामातून शेतातल्या कामासाठी लवकर मोकळती मिळावी म्हणून गावातल्या आयाबाया एकमेकींना या चिगट, वेळखावू कामात मदत करू लागायच्या..!

 

त्यामुळ गावात मक्का सोंगायचं, कांदे काढायचं, कपाशी वेचयाचं, उकत्यात जास्तीचा रोज पडतो म्हणून बायकांची टोळी करून कामाला जावं तसा हा हंगाम चालू असल्यागत होता. जसा कुरडई, पापडं करायचं हंगाम चालू झाला तश्या गावात ईळभर बायकांच्या बोलण्यात त्याच गप्पा असायच्या..!

कोणाची कुरडई पांढरीफट्ट झाली, कुणाची खारूडी काळी झाली. कुणाची कुरडई भुगा झाली, कुणाचं काय तर कुणाचं काय. सांजेच्यावेळीसुद्धा सावता माळ्याच्या देळात या गावच्या माझ्या माऊल्या हरिपाठ म्हणायला आल्या की याच चर्चा त्यांच्या बोलण्यात असायच्या.

 

सांजेचा हरिपाठ झाला अन् मायनं सांगल्या परमाणं उद्याला आमची कुरडई करायची म्हणून चिकाला गहू दळायला म्हणून शांता आक्का, सुमन नानी माय संगतीला आमच्या घरला आल्या..!

चार दिस सरले तसं मह्या मायना कुरडईसाठी दोन हंड्यात चिकासाठीचा पाच कीलू गहू भीजू घालुन ठेवला होता. चार दिस सरल्यानं उन्हात पोत्याखाली झाकून हंड्यात भिजू घातलेल्या गव्हाचा आंबट वास साऱ्या घरात येत अन् पार गल्लीत सरला होता. मला तो आंबसर वास पटायचा नाय म्हणून म्या त्या हंड्यापासून गेलो की तोंडाला रुमाल लावल्यागत करत नाकाला हात लावून तिथून मोहरं निघून जायचो..!

 

मायनं मला असं तोंडाला हात लावून जाताना बघितलं की माय मला दटवायची, कावल्यागत करायची. माझ्या अडून बारा साल ऊपर म्हसणात गेलेल्या माझ्या बापाच्या नावाचा उद्दार करायची. अखेरीस माय अन् तिच्या जोडीदारनी आज एकदाचा गहू दळणार अन् एकदाचा हा आंबट वास ही एकदाची ब्याद घरातून जाणार म्हणून मी खुश हुतो!

आक्का, नानी आल्या तसं मायना मला पोटमाळवर एका कंबळात बांधून ठेवलेला गहू दळायचा सोऱ्या काढायला लावला. मी तो काढून मायला संगतीला घेऊन आमच्या एक पाय तुटलेल्या "तीन तिघडा, काम बिघडा" असं म्हणणाऱ्या आमच्या लोखंडी पलांगला तो सोऱ्या बसून दिला. मला तो वास अजिबात आवडत नाय म्हणून म्या मायला खोटी चाट मारून ब्याट कुटायला म्हणून नदडीच्या अंगाला खेळत असलेल्या पोरांच्यात खेळायला निघून गेलो!

 

घटकाभरच्या वख्तानं ब्याट कुटून म्या घरला आलो. गहू दळून पांढराफट्टक चिक पडला होता, मायनं तो एका हंड्यात झाकून ठेवला, अन् माय अन् मायच्या जोडीदारनी परासदारच्या अंगणात मायना त्यांच्यासाठी केलेल्या काळ्या चहाला पित बसल्या होत्या.

मायच्या अन् आक्काच्या कुरडई ढवळी झाली, कुरडईचा चिक पांढराफट्टक आला, कुरडई छान येईल अश्या गप्पा चालू होत्या, माझी माय सुद्धीक त्यांच्या बोलण्याला हसून दाद देत होती.

सांज सरली तसं मायच्या जोडीदारणी त्यांच्या घरला गेल्या अन् मपली माय, मी जेवून खावून, मायना भांडी घासून घेतली अन् मायला पहाटच्याला कुरडई करायची म्हणून चिमणी मालवून आम्ही बिगीनच झोपी गेलो..!

 

रात सरली तसं कोंबड्याच्या बांगेलाच माय उठली, मला तो वास सईन होत नाय म्हणून मी हटकूनच अंगावर घेऊन अंगाचे मुटकुळे करून झोपून राहिलो. मायनं न्हाऊन घेतलं अन् तिनं मोहरच्या अंगणात तीन मोठ्या दगडाची चुल्हंगण केली. पितळीच्या कुरडई करायच्या पातील्याला सोमु नानाच्या वावरात माय रोजंदारीवर गेली तेव्हा लाल मातीचा ढेपूड घेऊन आली होती. त्या लाल मातीचा पातील्याला बुड देऊन,त्यात पाणी इसनाला टाकून माय हंड्यात असलेला कुरडईचा चिक घेऊन अंगणात आली!

तितक्यात मायला जोडीला म्हणून मायच्या जोडीदारानी शांता आक्का आणि सुमन नानी अंग न्हावूनधुवून कुरडया करायच्या म्हणून आमच्या अंगणात आल्या. मायना त्यांना पुन्हा दोन-दोन कप उकळत्या कोऱ्या चहाचा दिला!

 

चहा पिऊन झाला, चुल्हीत जळतंन जळत होतं, पातील्यातलं पाणी ईसनाला आलं, उकळीला आलं अन् शांता आक्कानं हंड्यातला चिक पातील्यात टाकला. मिठाच्या कण्या मायनं मायच्या हातानं अंदाज घेत टाकल्या, माय चाटुनं चिक हटायला लागली होती, चिक हटायचा आवाज मी पडल्या जागेपर्यंत येत होता. सुमन नानी पातील्याला माझ्या फाटलेल्या सुती बन्यालीच्या धुडक्यात घट्ट पकडून होती, आता तिघी आळीपाळीने चिक हाटू लागल्या होत्या. पिठलं शिजल्यागत रट रट आवाज कुरडईचा चिक होतांनाचा येत होता, अधूनमधून तिघी चाटूनं चिक हाटीत होत्या तिघींच्या अंगाची लाहीलाही झाली होती!

चिक तयार झाला तसं हातसोऱ्याने माय अन् शांता आक्का गव्हाचा काड अंथरेल्या खाटेवर कुरडई टाकू लागल्या होत्या. सुमन आक्का सोऱ्याला चिकाने भरवून देत होती. आळीपाळीने तासाभरात दोन खाटेवर कुरडई टाकून झाली होती!

 

जसाजसा कुरडईला वाऱ्याचा झोकाने गारवा मिळू लागला, कुरडई वाळू लागली. तसतशी कुरडईवर लाली येऊ लागली अन् मायच्या चेहऱ्यावर निराशा दिसू लागली. कुरडई करून झाली अन् शांता आक्का, सुमन नानी मायना वाटीत दिलेला चिक, वाटीभर साखर अन् एका तांब्यात दूध घेऊन त्यांच्या घराला गेली!

दुपार ढळायला झाली होती अन् साऱ्या गावात, सावली बाईच्या पिंपळ पारावर बायकांच्यात मायच्या लाल कुरडईचा दांगुडा झाला होता. जो नाय त्यो मायला ईचारित होता लाल कुरडई कशी काय झाली? मायला सांगू की नको सांगू असं झालं होतं, सांजेचा हरिपाठ करून माय घरला आली!

 

चेहऱ्यावर तेच भाव, दिवसभर बायकांच्या प्रश्नांना खोटे उत्तर देऊन माय थकली होती. मी काडावरली एक एक कुरडई काढत मायला विचारलं मायव मला तरी सांग कशी काय झाली आपली कुरडई लाल?

माय बोलती झाली लेका यंदाच्या सालाला गहू नाय बा आपल्याकडं अन् इकतचा गहू आणून कुरडई करायला पुरी खातिया का आपल्याला. मग कुपिनाच्या गव्हाची कुरडई करून पाहू म्हणून केली लका कुरडई!

पण तू बघून राहिलासा ती सारी लाल झाली हायसा, सारं गाव तुझ्या मायला नाव ठीवून राहायला. आता तूच सांग म्या काय करू लेका!

मी मायकडे बघत काडाला लागलेली एक एक कुरडई हळुवार काढीत होतो, कुरडईची तार तुटावी तसं आयुष्याची तार तुटल्यासारखं मला अन् मायला झालं होतं!

 

भारत लक्ष्मण सोनवणे