गाव रहाटीचे जगणे..!

युवा विवेक    11-May-2022   
Total Views |


villageनभ डोंगरांगाच्या कुशीत उतरू लागले होतं. सायंकाळच्या वेळी अस्ताला जाणारा सूर्य ढगाआड लपून प्रकाशाला भुलवित मावळतीला आला होता. लाल
, तांबूस रंगाच्या प्रकाशझोतात वाळलेले गवत सोनेरी सोनेरी रंगाची शाल लेवून माळरानात चहूकडे आपल्या अस्तित्त्वाच्या पुसटशा खुणा सोडून पावसाची वाट बघत विसावले होते. त्याची काही दिवसांची सोबत आता मग पुन्हा माळरान जावळं काढलेल्या लहानग्या पोऱ्याप्रमाणे भासू लागणार..

 

दूरवर रामू गुराख्याच्या राखणीला म्हणून ठेवलेल्या बकऱ्या चरू लागल्या होत्या. गुराखी त्यांना नजरेसमोर ठेवून बाभळीच्या पडसावलीत विसावला होता. दूरवरून शिवा मोहरच्या गावातून येणारी वराटे-पाटे विकणारी सुली नजरेला दिसू लागली. उन्हाच्या काहिलीत कधी तरी ती स्पष्ट, अस्पष्ट दिसत होती.

 

दूरवर असलेल्या धरणात पाणी नसल्याने धोंडू धनगर आपल्या मेंढ्यांच्या कळपाला घेऊन रहात होता. शंभर एक मेंढरं अन् पाच सहा कंबराएवढे कुत्रे त्यानं पाळले होते. पावसाचा अंदाज बघून त्यानं मेंढर राखणीला केलेल्या जागेत कळपात बांधली. राणाई चुल्हीवर भाकरी बडवित होती भाकरी बडविण्याचा आवाज माझ्या पहतुर धरणाच्या पाळी पहूर येत होता.

 

शांत असलेला वारा एकाकी सुरू झाला वावठळ उठली, तसा रामू गुराखी टोपी सावरत उठला अन् दूरवर गेलेल्या बकऱ्यांना शिळ घालून बोलवू लागला.

 

भर वाऱ्यात सूली गावचा रस्ता जवळ करत होती. बहुतेक ती शिवा महुर असलेल्या पारावर काही वेळ विसावा घेईल, वावधन जाऊ देईल असं मनचे मनाला वाटत होते. धोंडू धनगरानी मेंढ्यामध्ये घेतल्या अन् वाऱ्याचा वेग पाहून कुत्रे पिसाळल्यागत कुणाची मौत पडल्यागत उंच आवाजात भू..... असं इवळत होती.

 

- भारत लक्ष्मण सोनवणे