लस्सी

युवा विवेक    28-Apr-2022   
Total Views |

लस्सी

 
lassi

उन्हाळ्याच्या दिवसात भारतीय थंडगार स्मूदी म्हणजे लस्सी! लस्सी म्हटलं की, बॅकग्राऊंडला उगाचच 'बल्ले बल्ले बल्ले बल्ले' असं ऐकू येतं. (बॉलीवूड मुव्हीजचा परिणाम) लस्सी पंजाबी लोकांची मक्तेदारी असली, तरी इतर भारतात आणि जगभरात प्रसिद्ध आहे. लस्सीचा उगम भारतातीलच आणि जवळपास हजार वर्षे जुना तरी असावा. वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर प्रोबायोटिकचा उत्तम सोर्स आणि म्हणूनच 'योगर्ट ड्रिंक' असंही नाव आहे. श्रीखंडाचे अतिशय डायल्यूटेड व्हर्जन 'पीयूष' हे लस्सीच्या चुलत घराण्यात आणि मीठ, मिरची, कोथिंबीर घातलेला मठ्ठा हा दूरच्या चुलत घराण्यात येतात. दही, पाणी, साखर आणि मीठ यांचे घुसळलेले एकजीव मिश्रण म्हणजे लस्सी! दह्यापासून बनवलेले हे पेय पौष्टिक तर आहेच कारण प्रोटीन आहे. साखर पटकन एनर्जी देते आणि मीठ डिहायड्रेशन होऊ देत नाही. दह्यातील बॅक्टेरिया, प्रोबायोटिक पचनासाठी चांगले असते.

 

लस्सीची पाककृती सोपी असली, तरी दही कमी-जास्त फर्मेंट झाले तर सगळी चव जाते. सर्वांत साधा प्रकार म्हणजे खारी/मिठी लस्सी आणि मग गुलाब, मँगो, पपई, चॉकलेट, पुदिना, स्ट्रॉबेरी हे त्यातल्या त्यात फेमस प्रकार. इराण आणि अफगाणिस्तानमध्ये दुघ, अर्मेनियात ताह-ताह, तर टर्कीत आर्यन या नावाने दह्याची लस्सीसारखीच पेय प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात लस्सी मुख्यतः ढाब्यावरची प्रसिद्ध आहे, तर पंजाब, गुजरातमध्ये कुठेही मिळते. तमिळनाडू, केरळमध्ये लस्सी फार नसली तरी 'दि लस्सी शॉप'सारख्या चेन्समुळे लोकांच्या पसंतीस उतरत आहे. या शॉपमध्ये अनेक प्रकार मिळतात आणि तेही चविष्ट! अमूलने आता सिम्बायोटिक लस्सी लॉन्च केली आहे. वेगवेगळ्या ब्रँडच्या लस्सी टेट्रापॅकमध्ये मिळतात; पण माझ्या मते त्यांची चव तितकीशी छान नसते. काहीशी आर्टीफिशिअल वाटतेच; पण इतके दिवस टिकवून ठेवायची म्हणजे चवीत बदल होणारच. मथुरेला मातीच्या पेल्यात तर पंजाबमध्ये भल्यामोठ्या स्टीलच्या पेल्यात लस्सी मिळते!

 

साखर घालून लस्सी करण्यापेक्षा फळांतील नैसर्गिक साखर वापरून केलेली कधीही चांगली! उन्हातान्हात फिरल्यावर, थंडगार लस्सी पटकन फ्रेश करते आणि कार्बोनेटेड ड्रिंक्ससारखं अपराधी वाटत नाही. पंजाबी लोक पोटभर जेवून लस्सी पितात म्हणे, इतके अघोरी प्रकार मराठी माणसाला शक्य नाहीत. पेलाभर लस्सी चारच्या सुमारास प्यायलो, तरी रात्री जेवणापर्यंत भूक लागत नाही; पण कसंय, स्मूदीला ग्लॅमर आहे तसं या भारतीय पेयाला नाही. ते ग्लॅमर मिळवून देण्यासाठी वेगवेगळे कॅफे उभे राहायला हवे आणि हे पेय जगभर पोहोचायला हवे. केशराने सजवलेला लस्सीचा ग्लास अगदी पारिजातकाच्या फुलांइतका सुंदर दिसतो आणि मनाला तितकेच प्रसन्न करतो!

- सावनी