सरबत
तुम्ही कितीही चहा किंवा कॉफीप्रेमी असलात, तरी उन्हाळा सुरू झाला की, सरबत प्यायल्याशिवाय पर्याय नसतो. पर्शियन लोकांनी मुख्यतः सरबत करायला सुरवात केली आणि त्यानंतर ते जगभर पोहोचले. पाश्चात्य देशांमध्ये अल्कोहोल पिण्याचे प्रमाण जास्त असले, तरी आशियात उष्णता जास्त असल्याने सरबत आपल्याकडे जास्त प्रसिद्ध आहे. भारतात 'ड्रिंक्स'ला जेवणात वेगळे असे फार महत्त्व नाही. ताक, मठ्ठा वगैरेंना जेवणात स्थान आहेल, तसं कोणत्याही सरबताला नाही; किंबहुना चहा/कॉफीलाही नाही. आपल्याकडे सार, रसम, कढी, खीर, बासुंदी असे प्रकार आहेत; पण त्यांना 'पेय' कोणी म्हणणार नाही, स्पेशल पदार्थाचे स्थान आहे. (लस्सी अपवाद असू शकते.) सरबत म्हणजे फ्लेवर्ड गोड/आंबट/तुरट किंवा मिक्स चवीचे पाणी, याला जगातील पहिले 'सॉफ्ट ड्रिंक'ही म्हणतात. मोईतो, पिना कोलाडासारखे पेय यांचे खूप मोठे स्थान आहे. आजच्या आयुष्यात; पण आज मात्र आपण भारतीय साध्या, सोप्या, घरोघरी होणाऱ्या सरबताविषयी बोलणार आहोत.
सर्वांत सोपं आणि सर्वांचं आवडतं म्हणजे लिंबू सरबत! लिंबू, साखर, मीठ, पाणी आणि अजून चविष्ट करायचं असेल, तर विलायची किंवा अद्रक यांचे मिश्रण. इतकं सोपं पेय; पण लिंबू जास्त पिळलं तर आवळ्याची आठवण येते सरबत पितांना. दुसरंअतिशय लाडकं सरबत म्हणजे कैरीचं पन्हं! कैऱ्या उकडून, साखर/गूळ घालून, हलकीशी विलायचीची चव असलेलं पन्हं. लहान-मोठ्या अशा सर्वांचं अतिशय आवडतं. जवळपास सर्वांच्या घरी उन्हाळ्यात ही सरबते केली जातात. मराठी लोकांचं अजून एक आवडतं सरबत म्हणजे कोकम सरबत. कोकमाच्या फळाची साल, साखर, मीठ घालून त्याचा गर बनवतात आणि ऐनवेळी पाण्यात मिसळून सर्व्ह करतात. लिंबू सरबत, पन्हे हे घरोघरी होते; पण कोकम सरबत मात्र बहुदा आयतं आणलं जातं. अजिबात आकर्षक नसलेल्या साधं लेबल लावलेली पांढऱ्या रंगाची पेट्रोल, डिझेलसाठी वापरतात तशी कोकम सरबताचं कॉन्सन्ट्रेट असलेली लहानशी कॅन उन्हाळा सुरू झाला की, सर्व मराठी लोकांच्या फ्रिजमध्ये ठाण मांडून बसते. लिंबू सरबत करायचा कंटाळा आला की, हाच इन्स्टंट आणि हेल्थी पर्याय! 'रुह अफजा' नावाचं अतिशय आकर्षक दिसणारं, गुलाबाच्या चवीचे अजून एक सरबत. रेड वेलवेट केकचा दूरच्या नात्यातला भाऊ! उन्हाळा सुरू झाला की, डर्मीकुल पावडरच्या जाहिरातीसोबत 'रुह अफजा'ची जाहिरात टीव्हीवर लागायची. दूध, लस्सी, पाणी, आईस्क्रीम अशा सर्वांमध्ये रुह अफजा अड्जस्ट होऊ शकतं, असा क्लेम, काही वर्षांनी रुह अफजाचं सरबत प्यायल्यावर आपण उगाच भाळलो रूपावर याची जाणीव करून गेला. अर्थात थंडगार रुह-अफजाचे फॅन्स कमी नाहीयेत हं!
आवळा, बेलफळ, चिंच, आलुबुखार, खस, सब्जा बिया यांची सरबतंही प्रसिद्ध आहेत; पण त्यासाठी तशी टेस्ट डेव्हलप व्हायला हवी. यातली बरीच सरबते शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, डिहायड्रेशन होऊ नये यासाठी पिण्याचा सल्ला दिला जातो. या सरबतांमध्ये साखर असते तरीही कार्बोनेटेड ड्रिंक्सपेक्षा कित्येक पटींनी चांगली आहेत. लिंबू सरबत सोडल्यास बहुतेक सर्व प्रकार तयार करून फ्रीजमध्ये ठेवले जातात आणि नंतर पाणी घालून सर्व्ह करता येतात. चहा करायला तरी पाच मिनिटे लागतात; पण सरबत पटकन तयार होते. सरबतात पाण्याचे तापमान अतिशय महत्त्वाचं! थंडगार पाणी आवश्यक आहेच; तसंच फ्रिजमधलं थंडगार पाणी आणि माठातलं थंडगार पाणी यांच्या चवीतही बदल होतो असं माझं निरीक्षण आहे. (माठातल्या पाण्याचं सरबत जास्त चविष्ट लागतं जर पाणी थंडगार असेल तर...) सर्वात कंटाळवाणं काम म्हणजे साखर विरघळायची वाट पाहणे, अशा वेळी चहात गरम पाण्यात साखर कशी पटकन विरघळते, याची आठवण येते. एरवी लाडूसाठी पटकन पिठीसाखर मिक्सरमध्ये केली जाते; पण सरबत करताना मात्र बायका साधी साखरच का घालतात कोणास ठाऊक?
मार्केटमध्ये एक जमाना रसनाने गाजवला आहे. आंबटगोड चवीचे, संत्र्याच्या फ्लेवरचे आणि बनवायला अतिशय सोपे रसना पटकन लोकांच्या पसंतीस उतरले; शिवाय एका पॅकेटमध्ये ३६ ग्लास होतील असं आश्वासन लेबलवर असायचे. रसनाने बाकी फ्लेवर्सही आणले; पण संत्री लोकांच्या जास्त आवडीची. 'मॅप्रो'या ब्रँडचे वेगवेगळे फळांचे गर मिळतात त्यांच्यापासूनही छान सरबत होते. पेपरबोटने तर आमरस, पन्ह्यापासून सगळी सरबते बाजारात आणली आहेत, प्रयत्न नक्कीच चांगला आहे. अनेक कंपन्यांचे सरबताचे सिरप्स, पावडर्स मिळतात, इन्स्टंट सरबत बनवण्यासाठी. स्टीव्हिया घातलेले किंवा कमी साखर असेलेले सिरप्स, पावडर्स बाजारात यायला हव्या म्हणजे लोकांना शुगर, डाएटचा फार विचार न करता सरबत पिता येईल. साध्या पाण्यात सरबत करायचे आणि पेल्यात चार बर्फाचे खडे टाकून द्यायचे, अशा आळशीपणा केला की, शेवटच्या घोटापर्यंत बर्फ विरघळून, साखर कमी झाल्यामुळे चव बेचव होते. याआधी म्हणाले तसं पाण्याचं तापमान अतिशय महत्त्वाचं! पाणी थंडगारच हवं आणि पेल्यात फारतर एक बर्फाचा खडा असावा.
उन्हाळ्यात शाळेला सुट्टी असायची आणि तेव्हा असंख्य क्लास नसायचे. त्यामुळे आम्ही पोरं दंगामस्ती करायचो. दुपारचे जेवण झालं की, घरी आलेली आत्ये-मामे भावंडं मिळून दुपारभर खेळायचो, आई-काकू मंडळी नॉनस्टॉप गप्पा मारत असायच्या. साडेचार-पाचच्या सुमारास चहाची वेळ झाली की, चहाऐवजी सरबत करायची टूम निघायची. मग आम्हा पोरांना बोलावून, काचेच्या पेल्यात सरबताचे अमिश दाखवून कामे वाटून दिली जात. बर्फाच्या ट्रेमधून बर्फ वेगळे करणे, भल्यामोठ्या भांड्यात साखर आणि पाणी ढवळणे, ट्रेमधून सर्वांना सरबताचे ग्लास नेऊन देणे अशी कामे वयानुसार आणि कुवतीनुसार मिळायची. कधी लिंबू सरबत, कधी पन्हे तर कधी कोकम सरबत (यातही वरून साखर घालावी लागायची). दहा-बारा माणसांसाठी सरबत करायला वेळ लागायचा आणि अर्ध्या मिनिटात पेला रिकामा व्हायचा. लिंबू सरबतात विलायची/अद्रक यांचं अचूक प्रमाण जमलं की, सुगरणीच्या प्रवासाला सुरवात होते असं माझं ठाम मत आहे. याच सरबताचे पायनॅपल लाईम, ऑरेंज लाईम, मिंट लाईम अशे प्रकार नंतर प्यायला मिळाले, तेही आवडले. सध्या वाढत असलेले ग्लोबल वोर्मिंग आणि इतर 'सॉफ्ट ड्रिंक्स'चे दुष्परिणाम पाहता सरबत कधी कालबाह्य होईल असं अजिबात वाटत नाही!