सोशल मीडियाचं यशस्वी मॉडेल

युवा विवेक    04-Mar-2022   
Total Views |

सोशल मीडियाचं यशस्वी मॉडेल


social media 

मेरे पास बंगला है, गाडी है, पैसा है. क्या है तुम्हारे पास?

ये सब खरिदने के लिये मेरे पास सोशल मीडिया है...

चक्रावलात का वरचा संवाद वाचून? दचकू नका... हे कोणतंही 'टेक्स्ट मीम' नाही; पण हो याचा मथितार्थ मात्र लक्षात घ्या. आज आपल्यापैकी जवळपास प्रत्येक जण सोशल मीडिया वापरतो. कोणी त्याचा उपयोग मित्र जमवण्यासाठी करतात, कोणी जुन्या मित्र-मैत्रिणींना शोधण्यासाठी, कोणी आपलं लेखन प्रकाशित करण्यासाठी, कोणी वेळोवेळी अपडेट राहण्यासाठी, तर कोणी पोस्ट-रिल्स शेअर करण्यासाठी करतात. माझ्यासारखे काही जण याचा उपयोग वाचनासाठीही करतात; पण या सगळ्यापलिकडे सोशल मीडिया हा अर्थार्जनाचा एक चांगला स्रोतही ठरू शकतो. सोशल मीडिया मार्केटिंग हा एक नवा पैलू गेल्या काही काळापासून उदयाला आला आहे.

 

साधारण गेल्या चार ते पाच वर्षांपासून पारंपरिक मार्केटिंगसह सोशल मीडिया मार्केटिंगलाही महत्त्व प्राप्त झालं आहे. आपलं उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल, तर जिथे लोक सर्वाधिक वावरत असतात अशा सोशल मीडियापासून दूर राहणं उत्पादकांना परवडणारं नव्हतं. पारंपरिक मार्केटिंगमध्ये बाजारपेठेपर्यंत जाणं, किरकोळ विक्रेत्यांना गाठणं, ग्राहकांपर्यंत जाहिरातीच्या माध्यमातून पोहोचणं, त्यांची तोंडी प्रसिद्धी व्हावी यासाठी प्रयत्नशील राहाणं आवश्यर होतं. सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये मात्र तुम्ही मधल्या कोणत्या मार्गाचा अडसर न राहाता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता. त्यासाठी आवश्यक आहे उत्तम कंटेंट असणं, व्यवस्थित प्लॅन्ड मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि तुमचे फॉलोअर्स.

 

गेल्या काही दिवसांत, विशेषतः कोव्हिडमुळे अनेक जणांनी ऑनलाईन माध्यमांचा आधार घेऊन आपला बिझनेस सुरू ठेवला. काहींनी नुकतेच आपले व्यवसाय सुरू केले होते. त्यांच्यापुढे, तर सोशल मीडिया मार्केटिंगला पर्यायही नव्हता. त्यात ज्यांचा स्वतःचा लिहिता हात चांगला होता ते स्वतःच स्वतःच्या उत्पादनांची जाहिरात करून अधिकाधिक नफा कमावू शकले; पण अनेकांना ते जमत नाही. काहींना तांत्रिक बाबींची फारशी माहिती नसते, तर काहींना तेवढा वेळ देणं शक्य नसतं. अशा वेळी हे लोक सोशल मिडिया मॅनेजर्स आणि कंटेंट रायटर्सचा आधार घेतात. सोशल मीडिया हा केवळ वेळखाऊ नाही, तर अर्थार्जनाचं उत्तम साधन होऊ शकतो हे अनेकांनी दाखवून दिलं आहे. तुम्हाला चांगलं लिहिता येतं का? तुमचे फेसबुक, इन्स्टावर अधिकाधिक फॉलोअर्स आहेत का? तर, मग तुम्ही याचा नक्कीच फायदा घेऊ शकता. महाविद्यालयीन मुलं, गृहिणी, निवृत्त कर्मचारी अशा कोणत्याही वयोगटातील व प्रकारातील लोक कंटेंट रायटर, सोशल मीडिया मॅनेजर म्हणून काम करू शकतात.

 

फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर अशा माध्यमातून तुम्ही एखाद्याला त्याचा बिजनेस वाढवायला मदत करू शकता. यात वेगवेगळ्या भाषांमधील छोटे-मोठे लेख, फोटो कॅप्शन, उत्पादनांची माहितीसह जाहिरात, ग्राहकांचे फिडबॅक, छोटे व्हिडिओज, त्या व्हिडिओसाठी आयडिया तयार करणं, स्क्रीप्ट लिहिणं, यूट्यूब तसंच इनस्टाग्रामवर व्हिडिओ तसंच मुलाखती प्रकाशित करणं, व्हिडिओ टेस्टिमोनियल्स यांचा वापर करून उत्पादनांचं मार्केटिंग करणं सोपं जातं. त्यांच्या व्यवसायाला वेगवेगळ्या बिझनेस ग्रूपमध्ये इन्ट्रोड्यूस करणं हेही तितकंच आवश्यक असतं.

 

कंटेंट रायटर आणि सोशल मीडिया मॅनेजर म्हणून पूर्वतयारीही तितकीच आवश्यक असते. आपलं लेखनाचं वैशिष्ट्य किंवा बलस्थान काय आहे? आवडते विषय कोणते आहेत? दुसऱ्याला उत्पादनाकडे आकर्षित करण्यासाठी कशा प्रकारे लिहिलं पाहिजे? या सगळ्याचा आधीच विचार करणं, त्याची पूर्वतयारी करणं, पूर्व तयारी म्हणून तशा स्वरुपाचा कंटेंट आपल्या वॉलवर प्रकाशित करणं, त्याला कसा प्रतिसाद मिळतो आहे हे पाहणं, त्यानुसार त्यात बदल करणं हे सारं करणं आवश्यक असतं. सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजचा वापर करणं आवश्यक असतं. कारण जोपर्यंत तुमच्या फॉलोअर्सची संख्या त्या उत्पादकाच्या-व्यावसायिकाच्या नजरेत भरत नाही, तोपर्यंत त्याने तुम्हाला का नेमावं असाही प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी सोशल मीडियावर नियमितपणे ॲक्टिव्ह राहाणं, तेथील लेखनाच्या-मार्केटिंग स्ट्रॅटेजीजचा-ट्रेंड्सचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे. हे ट्रेंड्स वरचेवर बदलत असतात. उदाहरणार्थ पूर्वी दीड ते साडेतीन मिनिटांचे मार्केटिंग व्हिडिओज करण्याचा, पाचशे-साडेपाचशे शब्दांचे लेख लिहिण्याचा ट्रेंड होता; पण गेल्या काही दिवसांत हा ट्रेंड पूर्ण बदलला असून जास्तीज जास्त शंभर-दीडशे नेमक्या शब्दातले लेख, उत्पादनाची टेस्टिमोनियल्स, उत्पादनांच्या फोटोंसाठी आकर्षक फोटो कॅप्शन, तुमच्या उत्पादनाचे हायलाईट्स, यूट्यूबवरील काही सेकंदांच्या जाहिराती याला विशेष महत्त्व आलं आहे. तुमचे फॉलोअर्स किती हजारात आहेत यांवरही तुमच्या कामात वाढ होणं अवलंबून असतं. त्यामुळे फॉलोअर्स वाढवण्यासाठीही प्रयत्न करणंही गरजेचं असतं. त्यानुसार सुरुवातीच्या टप्प्यात आपण वापरत असलेल्या काही उत्पादनांवर लिहिणं, एखाद्या दिनविशेषावर आपलं मत लिहिणं, शुभेच्छा देणं, स्वतःची एखादी पोस्ट किंवा एखादा मार्केटिंग कंटेंट पैसे भरून बूस्ट करणं अशा अनेक प्रकारांचा वापर करून आपले फॉलोअर्स वाढवणं शक्य आहे.

 

याच सगळ्याबरोबर आवश्यक आहे ते स्वतःच्या बिजनेसची जाहिरात करणं. तुमच्या बलस्थानांचा वापर करून स्वतःची सेवा (कंटेंट रायर/सोशल मीडिया मॅनेजर) लोकांपर्यंत पोहोचवणं तितकंच आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी बिझनेसचे ग्राफिक्स तयार करण्यासाठी आपल्याला आर्टिस्टवर अवलंबून राहावे लागे. आता मात्र काही वेबसाईट सेवांचा वापर करून आपले ग्राफिक्स, व्हिडिओज तयार करणं, त्याचं संकलन करणं सहज शक्य होतं. त्यांचा आधार घेऊन आपल्या सेवेची माहिती सोशल मीडियावर शेअर करणं, ग्राहकांना पाठवणं, व्हॉट्सअपद्वारे शेअर करणं याचा फायदा सुरुवातीच्या टप्प्यात नक्कीच होतो. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून आपल्या दिलेल्या सेवेवरील प्रतिक्रियात्मक टेस्टिमोनिअल्सदेखील उपयोगी पडू शकतात.

 

आज सोशल मीडियाचा वापर करून पैसे मिळवणं शक्य झालंय. अनेक फ्रीलान्स पत्रकारही उत्तमोत्तम कंटेंट तयार करून अर्थार्जन करताना दिसून येतात. फरक आहे तो दृष्टिकोनाचा. तुम्ही सोशल मीडियाकडे कसं पाहता? लाईक्स मिळवण्याचं, लोकांमध्ये वावरण्याचं साधन म्हणून, फोटो शेअर करण्याचं माध्यम म्हणून? की भविष्यात अर्थार्जनाचं साधन म्हणून. अनेकजण लाईक्सच्या मागे धावण्याऐवजी आज कंटेंट रायटर म्हणून उत्तम करिअर करत आहेत. एकमेकां साहाय्य करू म्हणून दुसऱ्यांना व्यवसाय वाढविण्यासाठी मदतही करत आहेत. बघा विचार करून.

- मृदुला राजवाडे