मजविण मज तू दे रे राम ! (भाग : २)
गेल्या आठवड्यापासून आपण समर्थांच्या 'कोमल वाचा दे रे राम' या अत्यंत भावोत्कट रचनेचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तो आजही तसाच सुरू ठेवू या. मागच्या लेखात म्हटले तसे देवाकडे 'काय' आणि 'कसे' मागावे हे समर्थांकडून शिकावे. चला तर मग, समर्थ पुढे काय मागतात रामरायाकडे ते पाहू या.
'संगीत गायन दे रे राम | आलाप गोडी दे रे राम |'
हे मागणे वाचल्यावर मला तुकडोजी महाराजांच्या अभंगातील 'एक तरी अंगी असू दे कला | नाहीतर काय फुका जन्मला |' या ओळी आठवल्या. समर्थांनी बहुदा याच उद्देशाने हे मागणे मागितले असावे. कारण संगीत किंवा कुठलीही कला हे आनंदाचे विधान असते, स्रोत असते. ती जितका समोरच्या व्यक्तीला आनंद देते तितकाच किंबहुना त्यापेक्षा दुप्पट आनंद ती कला सादर करणाऱ्या व्यक्तीला देते. याच कारणास्तव समर्थ केवळ 'संगीताची आवड दे' असे म्हणून थांबत नाहीत, तर संगीत 'गायन' दे असं म्हणतात. पुढे ते आलाप 'गोडी' दे असं म्हणतात. मग ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत का ? निश्चितच आहेत. कारण विद्वानांच्या मते जरी सुरेल आणि बेसूर असे संगीताचे प्रकार असले, तरी आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या दृष्टीने त्याची ललित संगीत/लोकंसंगीत आणि शास्त्रीय संगीत अशी विभागणी होते. म्हणूनच संगीताची आवड असणाऱ्या व्यक्तीला, 'आलापाची' गोडी असेलच असे नाही. आलाप म्हणजे थोडक्यात शास्त्रोक्त पद्धतीने केलेले गायन. म्हणून त्याची गोडी दे, म्हणजे शास्त्राची गोडी दे असे समर्थ म्हणतात. समर्थ स्वतः संगीताचे उत्तम जाणकार होते, पण असो. त्या विषयी नंतर कधी तरी बोलू.
पुढच्या ओळीवर मी अनेक दिवस विचार करत होते. 'धात माता दे रे राम | अनेक धाटी दे रे राम |' ही ती ओळ. इथे 'धात माता' या शब्दांचा नक्की कुठला अर्थ अभिप्रेत आहे समर्थांना ? धात म्हणजे धातू या शब्दाशी संबंधित आहे का? माता म्हणजे आई हा अर्थ अपेक्षित आहे का? असे वेगवेगळे तर्क मी लावत होते; पण मनाचे समाधान काही होत नव्हते. असा ह्या शब्दांचा शोध घेत असताना माझ्या कानांवर मोहनबुवांचे एक प्रवचन आले. त्यात त्यांनी जो अर्थ सांगितला तो ऐकून मी अवाक् झाले.कारण त्यांनी जो अर्थ सांगितला तो अगदीच वेगळा होता. मोहनबुवा म्हणाले होते की, 'धात या शब्दाचा अर्थ होतो 'प्राचीन' आणि मात या शब्दाचा अर्थ होतो 'ऐतिहासिक'.' आता 'प्राचीन' या शब्दांत वेद, उपनिषदे, पौराणिक कथा अशा सगळ्या गोष्टी आल्या. खरं तर इथे शब्दशः अर्थ घेणं चुकीचं ठरेल; पण थोडक्यात सांगायचे तर समर्थ इथे रामाला आपल्याला पौराणिक/सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वाङ्मयाचे अध्ययन घडू दे आणि हे अनेक 'धाटींनी' घडू दे, म्हणजे अनेक 'पद्धतीने' होऊ दे, अनेक 'प्रकारांनी' घडू दे असे म्हणतात.
पुढची ओळ फार सुंदर आहे. 'रसाळ मुद्रा दे रे राम |' या ओळीतील 'रसाळ' या शब्दापाशी रेंगाळायला होतं. समर्थांनी इथे 'प्रसन्न मुद्रा दे रे राम' असं का नाही म्हटलं ? 'रसाळ' मुद्रेची मागणी का केली ? यावर थोडा विचार केल्यावर असे लक्षात आले की, आपण तिन्ही त्रिकाळ एकसारख्या प्रसंगांना तोंड देतो का ? तर नाही. कधी एखाद्या वाईट प्रसंगाचे आपण साक्षीदार असतो, कधी समोरची व्यक्ती आपल्यासमोर त्याच्या मनातील वेदना प्रकट करते मग अशा वेळी आपली मुद्रा प्रसन्न असून चालेल का ? नाही ना. त्या त्या प्रसंगाला आपल्या मुद्रेवर तो 'रस' प्रकट झाला पाहिजे आणि म्हणून समर्थांनी 'प्रसन्न' मुद्रे ऐवजी, 'रसाळ' मुद्रेची याचना केली असावी असे वाटते. पुढे ते 'जाड' कथेची मागणी करतात. इथे जाड कथा म्हणजे ज्ञानाने परिपूर्ण अशी कथा दे असा याचा अर्थ होतो. ज्ञानाने परिपूर्ण अशी कथा सादर करताना माझी मुद्रा रसाळ असावी. माझ्याकडून त्या कथेतील भाव समोरच्या व्यक्तीपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचावा अशी समर्थ रामाकडे याचना करत आहेत. या पुढे ते म्हणतात,
'दस्तक टाळी देत रे राम | नृत्य कला मज दे रे राम |'
झालं! माझ्यासारख्या अर्ध मराठी आणि अर्ध इंग्रजी बोलणाऱ्या मेंदूसाठी पुन्हा स्पीड ब्रेकर आला. आता 'दस्तक टाळी' म्हणजे काय याचा शोध सुरू मी घेऊ लागले. आणि शोधलं की सापडतच. दस्त म्हणजे 'हात' आणि दस्तक टाळी म्हणजे दोन्ही हातांनी वाजवलेली टाळी असा याचा साधा सोपा बोध होतो; पण जरा खोलात शिरलं तर समर्थांना नक्की काय म्हणायचे आहे ते ध्यानात येईल आपल्या. आपण कधीकधी म्हणतो बघा 'टाळी कधी एका हाताने वाजत नाही' अर्थात एकट्या व्यक्तीकडून अमुक एखादे काम झाले नाही. कोणी तरी त्याच्यासोबत होते. त्याच दृष्टीने बघितले, तर माझे ध्येय साध्य करण्यासाठी, समविचारी, समान ध्येय राखणाऱ्या व्यक्तींची साथ मला मिळू दे असा या ओळींचा अर्थ होऊ शकतो. समर्थांचे ध्येय म्हणजे रामाचे कार्य, राष्ट्राचे कार्य. या अर्थी 'माझ्या मनात माझ्या कार्याविषयी जी अनुकंपा आहे, जी तळमळ आहे ती इतरांच्या मनात निर्माण होऊन त्यांची साथ मला लाभू दे' असे समर्थ म्हणत असावे.
'नृत्यकला मज दे रे राम' हे वाचल्यावर मनात येत की, मागेच समर्थांनी संगीत कलेची मागणी केली होती, मग पुन्हा नृत्य का अधोरेखित करावेसे वाटले असेल त्यांना? तर, नृत्य सादर करत असताना त्यात आपले सर्वांग वापरले जाते.आपण सर्वांगाने त्यात रममाण असतो.याचप्रकारे सर्वांगाने माझ्याकडून तुझी भक्ती घडू दे असे त्यांनी रामरायाला सांगितले आहे.
पुढे ते म्हणतात, 'प्रबंध सरळी दे रे राम | शब्द मनोहर दे रे राम'. 'प्रबंध' हा शब्द आपण पदवीसंदर्भात अनेकवेळा ऐकतो, वापरतो. ढोबळमानाने याला आपण एखादी 'रचना' म्हणू या. मग माझ्या हातून क्लिष्ट रचना न घडता, ती सामान्य माणसांना समजावी इतकी सरळ असावी, आणि त्यातील शब्द वाचकांचे चित्त आकर्षित करणारे असावे असे समर्थ म्हणतात.
पुढचे मागणे आहे, 'सावधपण मज दे रे राम | बहुत पाठांतर दे राम |
समर्थ नेहमीच 'सावध' असण्यावर भर देतात. 'पहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण | तिसरे ते सावधपण | सर्व विषयी ||' असे ते दासबोधात म्हणतात.'अखंड सावधान असावे | दुश्चित कदापि नसावे |' असा उपदेश ते छ. संभाजीराजेंना करतात. असे अनेक संदर्भ सापडतील; पण हे सावधपण का आवश्यक आहे तर, 'म्लेंच्छ दुर्जन अखंड | बहुत दिसांचे माजले बंड | या कारणे अखंड | सावधान असावे ||' असे समर्थ एके ठिकाणी लिहितात. आजही समाजामध्ये राष्ट्रविघातक मनोवृत्तीची मंडळी पसरली आहेतच. त्यांच्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी अखंड सावधान असण्याची गरज आहे आणि फार अगदी राष्ट्राचा विचार जरी सोडला तरी हातात घेतलेले काम नीट पार पाडण्यासाठी सावध असणे आवश्यक आहे. मग या सावधपण अंगी आणण्यासाठी काय करावे लागेल ? तर, आधी भोवतालची संबंध माहिती मिळवावी लागेल.केवळ माहिती असून उपयोग नाही, तर ती पाठ असावी, जिव्हाग्री असावी लागेल म्हणजे अटीतटीच्या प्रसंगी त्या सावधानतेचा उपयोग होऊन पटकन आपल्या हातुन एखादी कृती घडावी. एवढा मोठा विचार समर्थ करतात.
आता या भागातील शेवटचे मागणे, समर्थ म्हणतात,
'दास म्हणे रे सद्गुणधाम | उत्तम गुण ते दे रे राम |'
आणि हे सद्गुणाचे धाम असणाऱ्या रामा, जे काही उत्तम गुण आहे ते मला दे. कुठले उत्तम गुण ? अहो, हे सांगण्यासाठी समर्थांनी दासबोधातील एक अख्खा समास खर्च केला आहे. त्याविषयी मी वेगळे काय लिहू. तो समास वाचकांनी अवश्य वाचावा.
समर्थांना कदाचित या ओळींमधून वेगळे काहीतरी सांगायचे असेल. आध्यात्मिक पातळीवर या ओळींचा अर्थ निश्चितच वेगळा असेल; पण माझ्या अल्पमतीला जे सुचलं, ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तो गोड मानून घ्या.
श्रीराम समर्थ !
- मृण्मयी गालफाडे.