दोन वर्षे : सहनशीलतेची, समजूतदारपणाची
परवा २४ मार्च २०२२. डिसेंबरच्या अखेरीस हळूहळू जगभरातून कोव्हिडच्या केसेस पुढे येऊ लागल्या. भारताचं दार कोव्हिड महामारीने ठोठावलं आणि ठीक दोन वर्षांपूर्वी ‘न भूतो’ अशा देशव्यापी लॉकडाऊनला आपल्याला सामोरं जावं लागलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चच्या संध्याकाळी पंतप्रधानांनी लाइव्ह येऊन देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आणि आपलं धाबं दणाणलं. मागे वळून पाहताना दोन वर्षांचा आलेख मांडताना किती तरी गोष्टी डोळ्यासमोर तरळून जातात, कित्येक खपल्या निघतात, कित्येक सुखद-दुःखद क्षणांनी आपलं गाठोडं भरून गेल्याची जाणीव होते.
याआधी अशा लॉकडाऊनच्या अनुभवाला आपण, म्हणजे विशेषतः आजची तरूण पिढी कधीच सामोरी गेली नव्हती. मुंबईवर २६/११चे दहशतवादी हल्ले झाले. त्या वेळी दोन दिवस सगळं शहर बंद होतं; पण, त्याचं कारण आणि परिस्थिती वेगळी होती. इथे शत्रू अदृश्य होता, अधिक भयंकर व विश्वव्यापी होता आणि मुख्य म्हणजे अनेकांच्या घरापर्यंत येऊन पोहोचला होता. आरोग्यविषयक संकटामुळे लागलेल्या लॉकडाऊनची नेमकी परिभाषा काय, त्यात कोणते नियम असतात, आताच्या महामारीच्या अनुषंगाने हे सगळं कसं फॉलो करायचं हे काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे पंतप्रधानांनी घोषणा केली एवढीच, पण लोकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला. जीवनावश्यक वस्तू आणि सुविधा उपलब्ध राहणार आहेत असं त्यांनी पुरेसं स्पष्ट करूनही बाजारात गोंधळ उडाला. तुम्ही आम्ही सगळेच विविध रांगांत उभे राहून सामानाची उपलब्धता पडताळत होतो. दुसरीकडे जवळपास सर्वच कार्यालयं 'वर्क फ्रॉम होम' झाल्याने आणि शाळा-महाविद्यालयं बंद झाल्याने घरातली सगळी माणसं अनिश्चित कालखंडासाठी (कारण पुढचं चित्र धुसरच होतं) चोवीस तास एकत्र असणार होती.
कोव्हिडच्या या काळात अनेकांनी आपले आप्त गमावले. कोणी घरातला कर्ता माणूस गमावला. कोणी मुलं गमावली, तर कोणी आपलं रोजगाराचं साधन. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले. मुंबई-दिल्लीसारख्या शहरात चणेफुटाणे विकून, बूटपॉलिश करून, टिकल्या-बांगड्या विकून उदरनिर्वाह करणारे अक्षरशः देशोधडीला लागले. बांधकाम क्षेत्रातील मजुरांचे लोंढे आपापल्या गावी परतू लागले. अनाथांना, वंचितांना आश्रयदाते राहिले नाहीत. आरोग्य व्यवस्थांवर, सुरक्षा व्यवस्थांवर ताण आला. सेवाभावी आस्थापनांनाही संकटाला सामोरं जावं लागलं. ऑक्सिजनचा पुरवठा, इंजेक्शनचे साठे, रुग्णालयातील खाटांची अनुपलब्धता अशी आरोग्यविषयक वस्तू-सेवांची अभूतपूर्व टंचाई उत्पन्न झाली. कधी नव्हे ते मुंबईची जीवनवाहिनी असणारी मुंबई लोकल बराच मोठा काळ बंद राहिली. आज हा लेख लिहित असतानाही त्या आठवणींनी मन कातर झालं, टाईप करताना बोटं थरथरू लागली; पण जे भान, जो समजूतदारपणा आपल्याला आपल्या शाळांतून, महाविद्यालयांतूनही नाही मिळाला, तो समजूतदारपणा अनुभव नावाच्या या शिक्षकाने पुरेपूर दिला. घरोघरी लोकांनी आपले खर्च कमी केले; पण त्याच वेळी घरकामाला येऊ न शकणाऱ्या मावश्यांचे पगार मात्र थकवले नाहीत. आपल्या घरांतून अनेक प्रकारची मदत विविध समाजघटकांना केली. सामाजिक स्तरावरही कोव्हिड निर्मूलनासाठी, बाधितांच्या मदतीसाठी, प्रवासी मजुरांसाठी, दुर्लक्षित घटकांसाठी, आरोग्य-सुरक्षा-स्वच्छता-अत्यावश्यक सेवा यांच्या कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले गेले. अनेक तरुण स्वतःला कोव्हिड होण्याचा धोका असतानाही, विलगीकरणात राहण्याची अट असतानाही स्वतःहून या अभियानात उतरले, आपला सहयोग दिला. दुर्दैवाने काहींनी त्यात आपले प्राणही गमावले. त्यांच्या घरच्यांची जबाबदारी काही लोकांनी, विशेषतः तरुणांनी स्वतःहून उचलली.
या काळात सगळ्याच कार्यपद्धतींमध्ये आमूलाग्र बदल झाले. (कदाचित हे बदल एकंदरच कार्यपद्धतीत दूरगामी आणि कायमस्वरुपी बदल ठरतील.) ऑनलाईन कामांमुळे जबाबदारी वाढली, त्याच वेळी घरच्यांना वेळ देणंही किती आवश्यक आहे याची जाणीव आपल्याला झाली. लोक घरातल्याघरात बैठे खेळ खेळू लागले, गप्पागोष्टींचा आनंद घेऊ लागले, एकत्र टेलिव्हिजनवर जुन्या मालिका-चित्रपट पाहू लागले. अर्थात सगळीच माणसं घरात असल्यावर भांड्याला भांडं लागणार हे निश्चित होतं; पण कोव्हिडने बाहेर जायचे दरवाजेच बंद ठेवल्याने एकमेकांना समजून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. उलट त्याचं महत्त्व पटत चाललं होतं. हे सगळे अनुभव मानसशास्त्राच्या पलीकडले आणि संस्कारांनी भारलेले होते. विशषतः ज्यांच्या घरात लहान मुलं, वयोवृद्ध व्यक्ती, आजारी माणसं आहेत त्यांना हे अनुभव अधिक मोलाचे ठरले. पैशांच्या आणि चंगळवादाच्या पलीकडे जाऊन माणसं गरजांपुरता विचार करायला शिकली. काहींनी, तर चक्क नोकरी सोडून तान्ह्या बाळाचं बालपण अनुभवणं, वयोवृद्धाचं आजारपण निभावणं यांना प्राधान्य दिलं. माणसं आर्थिक नियोजन म्हणजे ज्याला आपण सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट करायला शिकली. उरतील ते पैसे बाजूला टाकू लागली.
मागच्या दोन वर्षांत कोरोनाच्या लाटेमागून लाटा येतच गेल्या. जरा मोकळा श्वास घ्यावा, तर त्याचं पुढचं व्हेरिएंट आपली परीक्षा बघायला तयारच होतं. पहिल्या दोन लाटांनी भारताला पोखरलं असलं, तरी तिसऱ्या लाटेचा मात्र तितकासा प्रभाव आपल्यावर पडला नाही. तोवर माणसंही मानसिकदृष्ट्या सेटल झाली. काही काही क्षेत्र पुन्हा नव्याने उघडली. काहींनी नोकरीच्या नव्या वाटा शोधल्या, तर काहींनी व्यवसायात हातपाय मारायला सुरुवात केली. हे सगळं चित्र कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर चितारलं गेलं असल्याने त्याला निराशेची झालर होती; पण जे घडत होतं ते असं होतं. ते चांगलं किंवा वाईट हे ज्याच्या त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असू शकतं. विशेष म्हणजे, केवळ व्यक्तिगतच वा राष्ट्रीय स्तरावर नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताने केलेली कामगिरी ही विशेष उल्लेखनीय होती. अनेक देशांना आपण आरोग्यविषयक सेवा पुरवू शकलो. संपूर्णपणे स्वदेशी लसींची पुरवठा अनेक अन्य देशांना करू शकलो. याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली.
कोव्हिडच्या या दोन वर्षांनी खूप काही हिरावून घेतलं आहे हे निश्चित. काहींचे नातलग, काहींचा पैसे तर काहींचं मनःस्वास्थ्य; पण याच काळाने माणसाला माणसाशी माणसासारखं वागायला शिकवलं. समजुतदारपणाचा, सामोपचाराचा वस्तुपाठ या दोन वर्षांनी घालून दिला. या अनुभवातले किती काटे, फुलं, कण आणि क्षण आपण ओंजळीत भरून घेतो आणि नियतीने शिकवलेला धडा म्हणून त्याचं भान राखतो ते महत्त्वाचं.
- मृदुला राजवाडे