मनलुभावन होलिकोत्सव
होळी हा शब्द उच्चारला की, माझं मन नकळत वीस-पंचवीस वर्षं मागे जातं. माझ्या माहेरी सोसायटीत दर वर्षी होळी लावण्यात येत असे, म्हणजे अजूनही लावली जाते. जवळपास तीस-पस्तीस लहान-मोठी मुलं, सर्व मोठे स्त्री-पुरुष या दिवशी सोसायटीच्या मध्यभागी असणाऱ्या ग्राऊंडवर जमा होतात. होळीची पूजा होते. नैवेद्य दाखवला जातो. गाऱ्हाणं घालतं जातं आणि मग होळी पेटवली जाते. थोड्या वेळाने त्यातले अग्नीला वाहिलेले नारळ बाहेर काढून त्याच्या खोबऱ्याचे तुकडे करून साखर-खोबऱ्याचा प्रसाद वाटला जातो. दुसऱ्या दिवशी असते धुळवड किंवा धुलिवंदन. म्हणजे मुंबईकरांसाठी रंगपंचमी! सकाळी सातपासून सगळे एकत्र येऊन रंग खेळतात, ते अगदी बारा-साडेबारापर्यंत. घरी आलो की, आईच्या हातच्या खमंग पुरणपोळ्या किंवा पावभाजी-वडापाव असा काहीतरी फर्मास बेत. होळीचा विषय निघाला की, हे सगळं माझ्या डोळ्यासमोरून तरळून जातं आणि मन उगीचच स्मरणव्याकुळ होतं.
या सगळ्यात मला आवर्जून जाणवतं ते सोसायटीतल्या लोकांचं एकत्र येणं. गणेशोत्सवाचे सात दिवस, होलिकोत्सव, धुळवड या दिवसांत सगळी सोसायटी प्रांत-भाषा-जात विसरून ग्राऊंडवर एकत्र जमते. भारतीय सणांची संकल्पनाच मुळी लोकांनी एकत्र येण्याशी, एकमेकांची चौकशी करण्याशी, मिष्टांन्नांचा एकत्र आस्वाद घेण्याची आहे. मूलतः अत्यंत सुसंपन्न अशा या भारतातील लोकही तसेच उत्सवप्रिय. अनादि कालापासून प्रत्येक ऋतूत कोणता ना कोणता सण वा उत्सव साजरा करण्याची आपली परंपरा आहे. अगदी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्यापासून ते फाल्गुनातील होलिकोत्सवापर्यंत. ही उत्सवप्रियता काश्मीर ते कन्याकुमारी आणि ईशान्य भारत ते गुजरात अशी विस्तारलेली आहे. जसे प्रदेश वेगळे तशी तेथील नैसर्गिक-भौगोलिक-सांपत्तिक स्थिती वेगळी असू शकेल; पण त्यातला परंपरांचा आणि उत्साहाचा धागा मात्र समान आहे. त्यात तो होलिकोत्सव असेल तर बघायलाच नको. हा उत्सव उल्हासाचं प्रतीक मानला जातो.
उत्तर भारतापासून खाली महाराष्ट्रात, मध्य भारतात होलिकोत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला होळी, होलिकोत्सव, हुताशनी पौर्णिमा, फागुन अशा वेगवेगळ्या नावांनी भारतभरात ओळखलं जातं. होळीच्या दुसऱ्याच दिवशी वसंत ऋतूचं आगमन होतं. त्यामुळे याला वसंतोत्सव असंही म्हटलं जातं. महाराष्ट्रात या सणाला होळी म्हटलं जात असलं तरी कोकणात मात्र हा शिमगाच असतो. कोकणी माणूस गणपती आणि शिमगा या दोन्ही उत्सवांना आवर्जून कोकणात जातोच जातो. खरं तर, शिमगा हा एका दिवसाचा सण नाही. पाच ते पंधरा दिवसांचा हा उत्सव असतो; पण त्यातही फाल्गुन पौर्णिमा हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस. शिमग्याच्या मागे-पुढेच अनेकदा ग्रामदेवतांचे उत्सवही असतात. वर्षभर देवळात असलेल्या ग्रामदेवता किंवा स्थानिक देव हे पालखीतून सर्व वाड्या-वस्त्यांमध्ये फिरतात. जातीपातींच्या पलीकडे जाऊन साजरा केला जाणारा हा शिमगोत्सव हे कोकणाचं वैशिष्ट्य असलं तरी, ते मला भारतीय समाजमनाचं प्रतिबिंब वाटतं. शिमग्याच्या वेळी होणारे जाखडी नृत्य, शंकासूर, नकटा, खेळे हे बघण्यासाठी शहरांतून लोक आवर्जून जातात. कोकणात सागर किनारपट्टीवर राहणारे कोळी बांधवही हा सण उत्साहात साजरा करतात.
ऊर्वरित महाराष्ट्रातही तितक्याच आनंदात होलिकोत्सव साजरा केला जातो. राज्यातील सर्व जिल्ह्यात होळी साजरी करण्याच्या परंपरांमध्ये थोडा फार फरक असला, तरी एक परंपरा मात्र, संपूर्ण महाराष्ट्राने एकमताने जपली आहे, ती म्हणजे पुरणपोळीची. चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्यांच्या घरी होळीच्या दिवशी हे पक्वान्न केलेच जाते. धुळवडीच्या दिवशी होळीची राख अंगाला लावण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. रंगपंचमी मात्र पंचमीच्याच दिवशी साजरी केली जाते. मुंबईत मात्र बहुभाषिक-बहुप्रांतीय प्रभावातून धुळवडीच्या दिवशीच रंग खेळला जातो.
उत्तर भारतात होळीला खरं महत्त्व रंगांचंच. राधाकृष्णाच्या काळातही, खरं तर, त्याच्याही पूर्वीपासून रंग खेळला जात असल्याचे अनेक संदर्भ ग्रंथातून सापडतात. वृंदावनातील होळी हा देशापरदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय असतो. केवळ एक दिवस नाही, तर कित्येक दिवस कृष्णजन्मस्थानावर रंग खेळला जातो. लोकगीते गायली जातात. फाल्गुन पौर्णिमेला होलिकादहन केले जाते. कृष्णराधेचे स्मरण करीत रासलीला खेळली जाते. समरस समाजाचं प्रतीक म्हणून सर्व लोक एका ठिकाणी एकत्र होऊन रंग खेळतात. आनंदात रममाण होतात. मिष्टान्नाचं, थंडाईचं सेवन करतात. बंगालमध्ये वैष्णव संप्रदायात 'गौरपौर्णिमा' या नावाने हा दिवस साजरा केला जातो. कृष्णभक्त चैतन्य महाप्रभू यांची जन्मतिथी म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमीप्रमाणेच भक्तिभावाने साजरा केला जातो. ईशान्य भारतात मणिपूरमध्ये विष्णुपुरी भागात होळीचा सण महिलावर्ग आनंदाने साजरा करतो. गोव्यात शिगमोत्सव होतो, तर पंजाबमध्ये शिखांचं शक्तिप्रदर्शन असतं. माळव्यात आदिम संस्कृती जपणारा आदिवासी समाजही आनंदाने भगोरिया या नावाने हा सण साजरा करतो. बिहारमध्ये फगवा असतो. गुजरात, राजस्थानातही होळीचा उत्साह असतो. भारतीय मूळ असणाऱ्या नेपाळमध्येही काही ठिकाणी होळी साजरी केली जाते. देशाविदेशात इस्कॉन समुदायाच्या वतीने धामधुमीत होळी साजरी केली जाते.
केवळ समाजातच नव्हे, तर आपल्या कलांमध्येही होळीचं प्रतिबिंब दिसून येतं. मग ते कथकसारखं शास्त्रीय नृत्य असो वा ठुमरी, चेती, दादरा, होरी असे उपशास्त्रीय गायनप्रकार. महाराष्ट्रात संतवाङमयासह पंडीत काव्यांत आणि शाहिरी कवनात होळीचे संदर्भ मिळतात. लावणी हा मुळातच शृंगारिक काव्यप्रकार असल्याने हा उल्लेख निश्चितच येतो. अगदी पारंपरिक लावण्यांपासून ते आधुनिक लावण्यांपर्यंत हा व्यापक विस्तार आहे. चित्रपटांनीही जनमानसाचा विचार करून होळीचा संदर्भ अनेक गाण्यांमध्ये आवर्जून वापरला.
मला भारतीय सण उत्सवांचं एक वैशिष्ट्य वाटतं. त्या त्या राज्यांचे, भूप्रदेशांचे आपापले असे वैशिष्ट्यपूर्ण सण उत्सव असतातच, जे त्यांचं प्रतिनिधित्व करतात. त्या राज्यांची सांस्कृतिक ओळख करून देतात. प. बंगालमध्ये दुर्गापूजा, महाराष्ट्रात गणेशोत्सव-नारळीपौर्णिमा, गुजरातमध्ये गरबा, दक्षिणेत ओणम, ईशान्य भारतात बिहू असे बरेच सण आहेत; पण तरीही आपल्या संस्कृतीत असेही काही सण उत्सव निर्माण झाले जे आसेतूहिमाचल साजरे केले जातात. भले त्यांची साजरं करण्याची पद्धती वेगळी असेल, पण त्याचा सांस्कृतिक धागा मात्र समान आहे. वैशिष्ट्य म्हणजे हा समान धागा येथील ऋतुचक्राशी, कृषिव्यवसायाशी, येथील इतिहासाशी जोडलेला. प्रत्येक भारतीयाच्या मनात भारतीयत्व जपणारा आहे. गुढीपाडवा, रामनवमी, दिवाळी, दसरा, संक्रांत, होळी हे ते उत्सव आहेत. त्यातही होळी मला अधिक मनाला भावते. याचं कारण मी पहिल्याच परिच्छेदात लिहिलंय. बालपणीच्या आठवणी जागवणारे सण आपल्याला अधिक जवळचे वाटतातच. त्यातलीच ही एक मनलुभावन होळी आहे.