स्वरांनी बहरलेला 'वसंत'!

युवा विवेक    14-Mar-2022   
Total Views |

स्वरांनी बहरलेला 'वसंत'!

 
vasantrao deshpande

सूर्य अस्ताला गेला होता.आकाशाच्या धुरकट निळ्या पडद्यावर केशरी आणि गुलाबी रंग विखुरला होता. असं वातावरण असताना मी युट्यूबवर माझी नेहमीची प्ले-लिस्ट लावली आणि काही तरी कामात गुंतले. एक-दोन गाणी झाली असतील, तोच एक अनोळखी स्वर कानावर आला. स्वर अनोळखी असला, तरी एका झटक्यात वेड लावणारा होता. मी बहिणीला विचारले, 'कोण गात आहे?' ती म्हणाली, 'कोणी तरी वसंतराव देशपांडे म्हणून आहेत.' ही माझी वसंतरावांशी झालेली पहिली भेट. त्यानंतर वसंतराव देशपांडेया नावाशी एक वेगळंच सख्य जुळलं. धागा तुटल्यावर हारातून एका मागोमाग एक टपोरे मोती घरंगळत जावे, तसा प्रत्येक स्वर स्वच्छ, ऐकू येणाऱ्या ताना, घोड्यावर स्वार होऊन मुक्त विहार करावा अशी गायकी आणि पाण्यासारखा कुठल्याही गायन प्रकारात समरस होणारा आवाज!

 

एवढंच काय, ते मी माझ्या बुद्धीप्रमाणे वसंतरावांच्या गायकीचं विश्लेषण करू शकेन; पण त्यांचं गाणं बुद्धीच्या पलीकडचं आहे. त्या गाण्याला जसं घराण्यांचे बंधन नव्हतं, तसं गायन प्रकारचंदेखील नव्हतं. वसंतरावांचा मारवा जितका खुलायचा तितकंच ठुमरी, दादरा, नाट्यगीते आदी उपशास्त्रीय आणि ललित गीतप्रकार मैफल रंगवायचे.

 

वसंतरावांच्या जन्म अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर इथला; परंतु राहण्याचे ठिकाण मात्र नागपूर ! विदर्भातील बिनधास्तपणा त्यांच्या स्वभावात आणि गायकीत दोन्हीकडे अगदी पुरेपूर उतरला होता. शास्त्रामधे 'गायन वादन तथा नृत्यं त्रयम् संगीत मुच्यते', अशी संगीताची व्याख्या केली जाते. यातील 'नृत्याला' जर भावप्रकटीकरण मानलं, तर वसंतरावांनी 'संगीताला' खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य वाहिलं होतं असं त्यांचा जीवनपट पाहिल्यास आपल्या लक्षात येतं. गायकीचे प्रथम धडे त्यांनी 'शंकररावजी सप्रे' यांच्याकडे गिरवले. पुढे असद‌अली खॉं, सुरेशबाबू, अमान‌अली खॉं भेंडीबाजारवाले अशा गुरूंकडून विद्या संपादन केली आणि आपला गळा 'गायनासाठी' तयार केला. वादनाचं म्हणाल, तर सुरुवातीच्या काळात पुण्यात पु.ल.ना 'गाणारा देशपांडे' व वसंतरावांना 'तब्बलजी देशपांडे' म्हणत असत. हिराबाई बडोदेकर, पं. भीमसेन जोशी, पु.ल, कुमारजी अशा किती तरी मंडळींना वसंतराव तबल्याची साथ करायचे व रसिकांची वाहवा मिळवायचे. तबल्यासोबतच पेटी आणि सतारवादनातही त्यांचा हात अतिशय उत्तम होता असं पु.लंनी म्हटलं आहे. गाण्यातील भाव प्रकटीकरण म्हटलं, तर वसंतराव त्या गीतप्रकाराला साजेल असा आवाज लावायचे. 'दाटून कंठ येतो', 'बगळ्यांची माळ फुले', 'ही कुणी छेडिली तार' ही गाणी वसंतरावांनी गायली आहेत हे समजल्यावर मी अवाक् झाले होते.

 

वर उल्लेख केलेल्या गुरूंकडे जरी वसंतरावांनी संगीताचं शिक्षण घेतलं असलं, तरी त्यांनी एकलव्याप्रमाणे ज्यांची गायकी आत्मसात केली, ती व्यक्ती म्हणजे 'स्वरसम्राट मास्टर दीनानाथ मंगेशकर' ! सात-आठ वर्षांचा 'वसंता' 'रवी मीऽऽ' गाण्याचा प्रयत्न करायचा. इतका जबरदस्त प्रभाव दीनानाथांचा त्यांच्यावर होता. पुढे कोणी तरी वसंतरावांवर खोचक टीका केली होती की, ते 'दीनानाथांची नक्कल खूप छान करतात'; पण त्यावर खॉंसाहेबांनी त्या माणसाला 'ते त्यांची गायकी गातात. नक्कल नाही करत', असं सडेतोड उत्तर दिलं होतं. दुर्दैवाने वसंतरावांना त्यांच्या आयुष्यात अशा अनेक टीकांचा सामना करावा लागला. वसंतरावांचा आवडता राग 'मारवा'. मारव्याला 'अनाथ' राग म्हणतात, कारण पंचमाचा आधार नाही आणि षड्ज अत्यल्प प्रमाणात लागतो. अगदी या मारव्यासारखाच वसंतरावांना शास्त्रीय संगीतातील 'घराण्यांचा' आधार नसल्याने आकाशवाणीवर 'ग्रेड ए' चा कलाकार म्हणून संधी दिली गेली नाही आणि लोकांच्या अनेक खोचक प्रश्नांना सामोरं जावं लागलं; पण त्यांच्या मिश्किल आणि हजरजबाबी स्वभावामुळे ते अशा प्रश्नांना छान टोलवत. मारव्याविषयी एक विशेष आठवण सांगायची म्हणजे आसद‌अली खॉं साहेबांनी लाहोरला सहा महिने त्यांना फक्त मारवा शिकवला होता‌. तो राग ते मैफलीत असा गात की, एक जागा पुन्हा गळ्यातून निघाली तर शप्पथ ! म्हणून मारवा ऐकावा, तर तो वसंतरावांचाच असं मला मनापासून वाटतं.

 

एकीकडे तासनतास मैफलीत रमणारे आणि ती रंगवणारे वसंतराव दुसरीकडे 'मिलिट्री अकाऊंट्स' मधे कारकूनी करत होते. रात्रभर मैफल झाल्यावर सकाळी पायडलला टांग देऊन ते ऑफिसला हजर असायचे. त्यांच्या गायकीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या मित्रांना कधी एकदा याची नोकरी सुटते असं वाटायचं; पण वसंतराव मात्र स्थितप्रज्ञासारखे ती नोकरी करायचे. केवळ‌ कारकूनी करून ते थांबले नाहीत, तर आयुष्यात कुस्ती, सिनेमात, नाटकात नट म्हणून काम करण्यापासून, संगीत दिग्दर्शन आणि पु.लंच्या इंद्रायणी काठीला ऑर्गनची साथ करण्यापर्यंत अनेक गोष्टी या माणसाने केल्या आहेत. लहानपणी भालजी पेंढारकर यांच्या 'कालियामर्दन' मधे त्यांनी 'कृष्णा'ची भूमिका साकारली होती. पुढे त्यांनी अनेक नाटकांत काम केलं; पण त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली, ती 'कट्यार काळजात घुसली' या पुरुषोत्तम दार्व्हेकर यांच्या नाटकामूळे. त्यातील खॉंसाहेबांची भूमिका त्यांच्या अतिशय जवळची होती.

 

वसंतराव जेव्हा नाटकाविषयी बोलायला लागत, तेव्हा साक्षात किर्लोस्करांपासून देवलांपर्यंतचा काळ आपल्या नजरेसमोर उभा करतात. या संदर्भातील अनेक मुलाखती युट्यूबवर उपलब्ध आहेत. त्या सर्वांनी अवश्य पहाव्या. त्यांचं नाट्यपदांचं विश्लेषण आणि त्यामागील इतिहास ऐकताना मोठी मौज वाटते. एका क्षणात बोलता बोलता ते गायला लागतात आणि बालगंधर्वांपासून दीनानाथांच्या गायकीचं दर्शन श्रोत्यांना घडवतात.

 

पु.ल. आणि त्यांच्या मैत्रीविषयी काय लिहू. 'मैत्र जीवांचे' एवढेच शब्द त्यांची मैत्री वर्णन करण्यासाठी पुरेसे आहेत. दुधात साखर विरघळावी तसे या दोघांचे अस्तित्त्व एकमेकांच्या चरित्रात विरघळलेले आहे, लेखात वारंवार पु.लं.चा आलेला उल्लेख याचीच साक्ष देते. 'तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे' हे बोरकरांचे शब्द वसंतराव अक्षरशः जगले. कुठल्याही परिस्थितीत त्यांनी स्वरांना अंतर दिलं नाही. याचं उदाहरण म्हणजे पं. विजय कोपरकर यांनी एका मुलाखतीत सांगितलेला एक किस्स येथे नमूद करते. जेव्हा वसंतरावांना रुग्णालयात दाखल केलं होतं व विजयजी त्यांना भेटायला गेले होते तेव्हा तिथे त्यांनी त्यांना दोन-चार बंदिशी शिकवल्या ! याउपर दुसरे काय लिहिवे त्यांच्या संगीतप्रेमाविषयी ?

 

गुढीपाडव्याला प्रदर्शित होणाऱ्या 'मी वसंतराव' या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर वसंतरावांच्या आठवणींना उजाळा मिळाला. खरं तर वसंतराव ही ऐकण्याची गोष्ट आहे, पण त्यांच्याविषयी वाटणाऱ्या प्रेमामुळे आज हा लेख लिहावासा वाटला.

 

शेवटी एवढंच म्हणेन की, 'असा कलाकार पुन्हा होणे नाही !'

- मृण्मयी गालफाडे