‘मार्केटिंग’चा गुलकंद
साधारणपणे फेब्रुवारी महिना उजाडला की, लाल रंगाचा गॉगल लावल्यागत सगळं जग लालच लाल दिसू लागतं. साड्या लाल, ड्रेस लाल, शर्ट-टीशर्ट लाल, भेटवस्तूंच्या दुकानातील भेटवस्तू लाल, त्यांची वेष्टनं लाल, फोटो फ्रेम लाल, लहान मुलांचे कपडे लाल, आभूषणं लाल, दुकानांत-मॉलमध्ये-हॉटेलांत सजावटीचे फुगे लाल, चॉकलेटची कव्हर लाल, आईस्क्रिमचे कप लाल, फेसबुकवरच्या फ्रेम लाल, इन्स्टाग्रामच्या पोस्ट लाल..... लाल रंगाची ही यादी काही संपता संपत नाही. हा लालिमा म्हणजे खरं तर दवंडी असते तो दिवस जवळ आल्याची. तो दिवस म्हणजे तरुणांना ज्याची भुरळ पडते, ते ज्याची आतुरतेनं वाट पाहतात तो 'व्हॅलेन्टाईन डे'!
फार पूर्वी म्हणजे इसवीसन तिसऱ्या शतकात व्हॅलेंटाईन नावाचा एक धर्मगुरू युरोपात होऊन गेला. सैन्यात कार्यरत असणाऱ्या तरुण प्रेमिकांना लग्न करण्यास मदत करत असे म्हणून रोममधील राजा केलेडियसने त्याचा शिरच्छेद केला तो १४ फेब्रुवारी या दिवशी, अशी दंतकथा सांगितली जाते. त्याच्या या कार्याच्या स्मृतीनिमित्त हा दिवस प्रेमिकांचा दिन, प्रेमदिन म्हणून साजरा केला जातो. साधारणतः १४व्या, १५व्या शतकात व्हॅलेंटाईन्स डे ला युरोपात विशेष महत्त्व प्राप्त झालं व पुढे ते जगभर पसरलं. भारतातही हे वारं जोमाने वाहू लागलं ते आधुनिक युगात.
गेल्या काही वर्षांपासून, विशेषतः मागील पंचवीसेक वर्षांपासून 'व्हॅलेन्टाईन डे'चं विशेष प्रस्थ तयार झालं आहे. म्हणजे कॉलेजचे डेज संपले की प्रेमात पडलेल्यांना, प्रेमात पडू इच्छिणाऱ्यांना, मनातली भावना व्यक्त करू 'व्हॅलेन्टाईन डे'चे वेध लागतात. कोणाला ती संधी वाटते तर कोणाला प्रेमदिन साजरा करण्याचं निमित्त. मग त्याला जोडून वर उल्लेख केलेल्या भेटवस्तू वगैरे येतातच. हळूहळू व्हॅलेंटाईन आठवडाही साजरा व्हायला लागला, त्यातही मार्केटिंगचा भाग मोठा होता. पुढे चॉकलेट डे, टेडी डे, रोज डे, प्रोपोझ डे अशी सात दिवसांची यादीच तयार झाली. मग त्यालाही जोडून वेगवेगळ्या वस्तूंचं मार्केटिंग सुरू झालं. या सगळ्याकडे आपण त्रयस्थपणेही पाहणं आवश्यक आहे. या दिवसाला प्राप्त झालेल्या महत्त्वाचा आणि त्याच्या आवश्यकतेचाही सारासार विचार करणं गरजेचं आहे.
प्रेम करण्यात आणि ते व्यक्त करण्यात काहीच गैर नाही; पण त्या निमित्ताने बाजारात येणारी निरनिराळी उत्पादने, त्याचं केलं जाणारं मार्केटिंग आणि त्याला बळी पडणारे आपण हे एक चमत्कारिक त्रैराशिक झालं आहे. कळत नकळत शुद्ध प्रेमाच्या भावनेत, भेटी देण्यामागील आतूरतेत या वस्तूंचा अंतर्भाव अधिक भाव खायला लागतो. मग महागड्या वस्तू विकत घेणं, त्यातही ती आगळीवेगळी असणं, त्यासाठी प्रसंगी खिशाला चिमटा काढून पैसा ओतणं हेही आलंच. महागडी चॉकलेट्स, ड्रेसेस, दागिने, वीकेंड टुर्स ते परदेशी ट्रिप्स, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स अशा अनेक गोष्टी बाजारात तुमची वाट पाहात असतात. आणि मग वेगवेगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजिजमुळे आनंदासाठी खरेदी करणारे आपण कधी नकळत सुऱ्याखाली मान देतो ते आपल्यालाही कळत नाही. इतकं की, प्रेमाची कबुली देण्यासाठी वा प्रेमदिन साजरा करण्यासाठी हे सगळं जणू अत्यावश्यकच आहे आणि याशिवाय त्या सुकोमल क्षणांचा आनंद घेता येणारच नाही इतके आपण यात वाहावत जातो. सध्या आपले हळवे क्षण सोशल मीडियावर टाकण्याचाही अट्टाहास असतो; पण अशा अनेक फोटोजमुळे सुरक्षितता धोक्यात येते हा भाग आहेच; पण सोशल मीडियाच्या वापरामुळे दुसऱ्याला पैसे कमवायला आपण मदतच करतोय हेही आपल्या लक्षात येत नाही. आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटवस्तू द्यावीशी वाटणं यात काहीच गैर नाही. पण मार्केटिंगच्या जगताने आपल्या भोवती विणलेल्या मोहाच्या जाळ्यात न गुंतण्याचं शहाणपण आपल्यात रुजवणं, जोपासणं गरजेचं आहे.
आपली प्रिय व्यक्ती आपल्याशी मनापासून स्नेहयुक्त भावनेने जोडलेली राहाणं, एकमेकांशी एकनिष्ठ राहणं, प्रतारणा न करणं, एकांतवासातले ते हळवे क्षण मनापासून एन्जॉय करणं, एकमेकांच्या मतांचा-मनाचा-विचारांचा आदर करीत आयुष्य व्यतीत करणं, जोडीदाराला विचारांची-शिक्षणाची-करिअरची-भावनांची पुरेशी मोकळीक देणं, आयुष्याच्या अखेरपर्यंत समजूतदारपणे सारं काही निभावून नेणं हेच तर शेवटी प्रेम आहे. नीट विचार केला तर यात खर्च केलेला पैसा, भेटवस्तू, प्रेमासाठी एक विशिष्ट दिवस असणं याला अजिबात स्थान नाही. तिथे ना केकची गरज, ना लाल गुलाबांची, ना भेटकार्डांची, ना भेटवस्तूंची. इथे गरज आहे ती शहाणिवेची. एकमेकांच्या नात्यातली ओल जपायला हळवेपणापलिकडे काय लागतं माणसाला. खरेदीच्या चढाओढीपेक्षा, दरवेळी नवं काही तरी हवं या अट्टाहासापेक्षा, भेटवस्तूंवरून नात्यांचा दर्जा ठरवण्यापेक्षा, नावडत्या वस्तूंमुळे खट्टू होण्यापेक्षा शहाणीव ही निश्चितच वरचढ ठरणार आहे.
चिरंतन भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार केला तर केवळ प्रियकर-प्रेयसीचं नातं म्हणजेच प्रेम ही भूमिकाही तितकीशी मनाला पटत नाही. इथे प्रेमात केवळ दोन व्यक्ती असणं पुरतं. मग ते नातं कोणतंही असो, त्यांचं वयही कोणतंही असो. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम व सीतेप्रमाणे पती पत्नीचं उदात्त नातं, श्रीराम आणि लक्ष्मणातलं भावाभावांचं नातं, राधाकृष्णातील हळवं अनामिक नातं, कृष्ण-सुदामा प्रेम, मीरेची करुणाभक्ती, गुरूशिष्यातलं प्रेम या साऱ्या प्रेमाच्याच निरनिराळ्या व्याख्या. त्यात जपलेली नात्याची, प्रेमाची वीणही तितकीच अमोल. मग त्याला एका विशिष्ट दिवसाच्या निमित्ताने एकाच नात्याच्या चौकटीत का अडकवावं? 'व्हॅलेन्टाईन डे'च्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीजच्या पलिकडे जाऊन नात्यांचा परीघ वाढवून, प्रेम सगळ्यांसोबतच वाटून घ्यायला काय हरकत आहे.
अकरावीत असताना आम्हाला मराठीच्या पुस्तकात आचार्य अत्र्यांच्या 'झेंडुची फुले' काव्यसंग्रहातील प्रेमाचा गुलकंद कविता होती. प्रेयसीसाठी जमवलेल्या लाल गुलाबांचा तिनेच पाकवून दिलेला गुलकंद खाण्याची वेळ आलेल्या प्रियकराची दयनीय स्थिती पाहून वर्गात खो-खो हसलो होतो. 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने प्रेमिक बिचारे प्रेमदिन साजरा करण्यासाठी भरघोस पैसे देऊन निरनिराळ्या वस्तूंची खरेदी करतात. दिवस संपला की, प्रेमदिनावर उधळलेल्या फुलांपासून तयार झालेला मार्केटिंगचा गुलकंदनंतर कित्येक दिवस खावा लागत असेल कोण जाणे. पण त्या गुलकंदाच्या गोडव्यात नात्यांचा गोडवा हरवला नाही ना, त्याची वीण उसवत नाही ना हेही पहायला हवं.