नाकावरच्या रागाला औषध आहे
नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय? या गाण्यातल्यासारखं चिडणं, रुसणं, फुगणं आपण लहानपणापासून करत आलोय. पण एक वेळ अशी येते की, हा लटकासा, हलकाफुलका राग नियंत्रणात न येणाऱ्या क्रोधात रुपांतर होतं. सुरुवातीला गमतीशीर, सहज, स्वाभाविक वाटणारा असा राग नंतर व्यापक रूप धारण करतो. प्रसंगी आपलं कायमचं नुकसानही करतो. आपल्या आयुष्यावर अनेकदा नकारात्मक ठसा उमटवतो. नातेसंबंध बिघडवतो, सामाजिक प्रतिमा गढूळ करतो. पण या रागाचं करायचं तरी काय? या प्रश्नाचं उत्तर मात्र अनेकांना शोधता येत नाही.
आपल्या संस्कृतीत माणसाच्या उत्कर्षात अडथळा आणणारे षडरिपू सांगितले आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे ते षडरिपू. यातला राग अर्थात क्रोध हा सर्व वयोगटांनाच अत्यंत त्रासदायक ठरणारा शत्रू असतो. तरूण वयात तर आईवडलांवर चिडणं, शिक्षकांवर चिडणं, कार्यालयातील सहकाऱ्यांवर चिडणं, नातेवाईकांवर चिडणं, मित्रपरिचितांवर चिडणं, घटनांवर चिडणं, परिस्थितीवर चिडणं, अन्यायाविरोधात चिडणं, प्रसंगी स्वतःवर चिडणं असे किती तरी वेळा आपण चिडत असतो. यातलं चिडणं कधी गरजेचं असतं, कधी स्वाभाविक असतं, तर कधी उगीचच आपल्या इगोपायी केलेलं असतं. बघा बरं स्वतःशीच हे ताडून एकदा तरी. उगीचच मैत्रिणीशी भांडले मी, उगीचच मित्राला लागेल असं बोललो, आजीला उगीचच उलट उत्तर दिलं, बाबांशी सकाळी सकाळी वाद घालायला नको होता, बॉसला उगीचच मनातल्या मनात शिव्या घातल्या मीटिंगमध्ये; खरं म्हणजे त्याचा मुद्दा बरोबर होता, असं किती वेळा वाटलंय तुम्हाला?
स्वतःवर आणि आजूबाजूच्या समाजातील घटकावर अन्याय होत असेल आणि त्याची तुम्हाला चीड येत असेल तर ते योग्यच आहे. अन्यायाविरोधातली चीड किंवा राग हा आवश्यकच असतो मित्रांनो. त्याशिवाय क्रांती होत नाही. पण त्या रागाला कृतीशील सहयोगाचीही आवश्यकता असते. अशा घटनांमध्ये विधायक ठरू शकणारा हाच राग एरवी आपल्या प्रगतीतील अडथळा ठरत असेल तर काय करायचं? त्यासाठी आवश्यक आहे या रागावर नियंत्रण मिळवणं, त्याचं व्यवस्थापन करणं. रागाचं व्यवस्थापन म्हणजे रागावणं, चिडणं बंद करायचं असं अजिबात नाही. पण रागावण्यात वाया जाणारी एनर्जी, उगीचच येणारा ताण, उद्भवणारे प्रश्न, बिघडणारे नातेसंबंध, प्रगतीत येणारा अटकाव याचा विचार करून त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करायचं. राग येणं हे हटवादी आणि भांडखोर मानसिकतेचं द्योतक आहे हे स्वीकारलं पाहिजे हीच या व्यवस्थापनाची पहिली पायरी आहे. बदल एका रात्रीत होणार नाही, वेळ द्यावा लागेल हे स्वीकारणं ही असेल दुसरी पायरी.
आता येते तिसरी आणि महत्त्वाची पायरी ती म्हणजे एखाद्या प्रसंगी आपण कमी रागावू शकतो का याचा अंदाज घेणं आणि आपल्याला दिवसभरात कशाकशाचा राग येतो हे शोधून काढणं. म्हणजे कोणाला रस्त्यातल्या ट्रॅफिकचा राग येत असेल, कोणाला सकाळी सकाळी कामवाल्या मावशींनी उशीर केला म्हणून राग येत असेल, कोणाला ठरलेलं काम मनासारखं झालं नाही म्हणून राग येत असेल तर कोणाला न आवडणारी ठराविक व्यक्ती डोळ्यासमोर आली म्हणून राग येत असेल. ही कारणं अमर्याद असू शकतात. यातली चौथी पायरी म्हणजे अमुक एका गोष्टीवर रागवून मला फायदा होणार आहे का की माझं नुकसान होणार आहे असा प्रश्न त्या क्षणी स्वतःला विचारणं. या प्रश्नाच्या योग्य उत्तरात आपण ५० टक्के किल्ला सर केलेला असतो.
त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे राग येण्याच्या त्या क्षणाची आपली वॉर्निंग साईन काय आहे व तेव्हा आपल्याकडून काय क्रिया होते ते ओळखणं. म्हणजे राग येतो तेव्हा नेमकं काय होतं. डोकं चढतं, डोळे लाल होतात, डोळ्यातून खळकन पाणी येतं, हातातली वस्तू टाकून दिली जाते, तोडली जाते, स्वतःचा हात किंवा पाय आपटले जातात, दात आवळून गच्च धरले जातात, मारून किंवा ढकलून समोरच्याचं नुकसान केलं जातं यातलं त्या क्षणी आपण काय करतो नेमकं हे शोधणं. जरा आठवून बघा? काय करतो आपण यातलं? माझ्यापुरती गंमत सांगायची तर मला जेव्हा खूप राग येतो तेव्हा डोळ्यातून संतापाचे अश्रू खळकन बाहेर पडतात. ते दुःखाचं रडू नसतं तर राग बाहेर पडत असतो. हे समजलं की, यातली कोणतीही क्रिया घडण्यापूर्वीच किंवा घडत असताना आपण चौथी पायरी पुन्हा आठवू. आता माझ्या या कृतीने काय साध्य होईल किंवा काय साध्य झालं. या विचारातूनच रागामुळे आपण किती एनर्जी वाया घालवतो याची आपल्याला जाणीव होईल. या सगळ्याची एकदा सवय झाली की हळूहळू रागाचा तोल सांभाळणं हळूहळू जमू लागेल.
काही वेळा वाद वाढतोय, शब्दाशब्दी वाढतेय हे लक्षात आल्यावर शांत राहणं, दीर्घ श्वास घेणं, थोडा वेळ जाऊ देणं, त्या ठिकाणाहून ‘आपण थोड्या वेळाने बोलू’ असं सांगून थोड्या काळासाठी निघून जाणं किंवा शक्य तितक्या शांत आवाजात वेळ निभावून नेण्याने दोन गोष्टी होतात. एक, वाद थांबतो व राग नियंत्रणात येतो आणि दुसरं म्हणजे परिस्थिती निवळते किंवा नियंत्रणात येते. हवं तर त्याच मुद्द्यावर समोरच्याशी तुम्ही थोड्या वेळाने शांत मनाने चर्चा करा. तोपर्यंत त्याचाही पारा उतरलेला असेल व रागाच्या वेळी हरवलेली दोघांचीही विचारक्षमता पूर्ववत झालेली असेल.
तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणांसी।। ही अभंगातील ओळ आपल्याला सुपरिचित आहे. आपल्या भावभावनांचा परिचय स्वतःला करून देणंही अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वतःशीच बोलून आपली स्वभावातील बलस्थानं कोणती, कमतरता कोणत्या, कोणत्या क्षणी मला आनंद होतो, काय झालं की मला दुःख होतं हे स्वतःच्या मनाला सांगणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. रागाचं व्यवस्थापन करताना स्वतःशी साधलेला हा संवाद आपल्याला नक्की उपयोगी पडेल.
तुम्हाला मुन्नाभाई एमबीबीएसमधले राग आल्यावर लाफ्टर थेरपीचा वापर करणारे डॉ. अस्थाना आठवतात का? थिएटरमध्ये जरी आपल्याला विनोद म्हणून त्याचं हसू आलं असलं तरी ही ट्रीटमेंट किती उपयोगी ठरेल रागाच्या व्यवस्थापनासाठी. मला याबाबतीत दिग्दर्शकाच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटलं होतं. मित्रांनो, आपल्याच उत्कर्षासाठी रागाचं हे व्यवस्थापन करायला शिकूया. आपण ठरवलं तर नाकावरच्या रागाला औषध शोधणं तितकसं कठीण नाहीये.