मेरे पास ' शशी ' है !!!

युवा विवेक    05-Dec-2022
Total Views |

mere paas shashee hain!
 
 
 

मेरे पास ' शशी ' है !

सत्तरच्या दशकातील गोष्ट! बॉलीवूडमध्ये ' अमिताभ आणि रेखा' प्रेमप्रकरणावरून गॉसिप होत असताना एका पत्रकाराने जया बच्चनला मुद्दामून प्रश्न विचारला की, "पडद्यावर अमिताभची जोडी कोणासोबत जास्त जमते अस तुम्हाला वाटतं?" त्या प्रश्नामागचा खोचकपणा ओळखून जयाने हजरजबाबीपणे उत्तर दिले,"शशी कपूर सोबत !"\ अर्थात हे उत्तर वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर अतिशय समर्पक होतं. अमिताभची कारकीर्द ऐन भरात असताना दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकर एन्ड जर कोणी समर्थपणे सांभाळली असेल तर ती शशी कपूरनेरोटी, कपडा और मकान, शान, दिवार, ईमान धरम, त्रिशूल, सुहाग, काला पत्थर, सिलसिला, दो और दो पांच, अकेला, नमकहलाल ही यादीच बोलकी आहे.

 

अमिताभची जोडी धर्मेंद्र, विनोद खन्ना, ऋषी कपूर पासून अगदी अलिकडच्या काळात अक्षयकुमार, अजय देवगणसारख्या सह नायकांसोबत चांगलीच जमली, पण शशी कपूर सोबतचे त्याचे चित्रपट सिनेसृष्टीत वेगळा दर्जा राखून आहेतह्या डिसेंबरमध्ये शशी कपूरला जाऊन वर्ष होतील. तसा तो मोठ्या पडद्यापासून कधीचाच दूर झाला होता. कपूर खानदानाचा आनुवंशिक स्थूलपणा, उतारवयात जडलेल्या व्याधी, आपली प्रिय पत्नी जेनिफरला फार पूर्वीच गमावल्याने आलेले एकाकीपणा ह्या सर्वांशी झुंज देत तो बराच काळ तग धरून होता. जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना व्हील चेअरवर बसून आलेला आणि तोंडातून शब्द फुटणेही अवघड झालेला शशी बघताना अवघी सिनेसृष्टीत हळहळली होती.

 

शशी कपूर रूढार्थाने मेगा सुपरस्टार कधीच नव्हतादिलीप - राज - देव त्रिकुटासारख त्याच नाव कधी पहिल्या फळीतील नव्हतं. विलक्षण देखणेपणा असूनही राजेश खन्नाप्रमाणे हिट सिनेमांची रांग लावणे त्याला जमलं नाहीविनोद खन्ना, धर्मेंद्र, अमिताभ प्रमाणे तो अँग्री यंग मॅन होऊन दहा वीस गुंडांना झोडपून काढताना पण कधी फारसा शोभून दिसला नाही.! तरी पण तो स्वत:चं स्थान टिकवून होताLost and found चा जनक म्हणवला जावा चित्रपट म्हणजे ' वक्त,' शोलेच्या अपूर्व यशानंतर सिप्पीने काढलेला बहुखर्चिक 'शान,' सत्तरच्या दशकातीलच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासातला महत्वाचा "दिवारराजा हिंदुस्थानी सारखा विक्रमी उत्पन्न कमावणारा सिनेमा ज्याचा रिमेक होता तो ' जब जब फुल खीलेअसे अनेक चित्रपट त्याच्या खात्यावर जमा आहेत!
 

 

पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून त्याने रंगभूमीची सेवा देखील केली. पण बॉलीवूडच्या मसालाछाप सिनेमापेक्षा चाकोरी बाहेरच काहीतरी करावं म्हणून त्या उर्मितून त्याने जूनून, उत्सव, कलयूग, ३६ चौरंगी लेन, सारखे कलात्मक सिनेमे देखील केले. रशियाच्या सहकार्याने अजूबासारखा फॅनटसी चित्रपट केला. पण निर्माता म्हणून त्याची ही खेळी अपयशी ठरली. हाऊस होल्डर, डीसिवरस, सिद्धार्थ सारखे काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सिनेमे सुध्दा शशी कपूरने केलें.

 

आपल्या पत्नीच्या अकाली निधनाने आलेल्या नैराश्यातून तो बाहेर येऊ शकला नाही. शशी कपूरची मुले देखील बॉलिवूडमध्ये स्थिरावू शकली नाहीह्या दुःखद बाबी वगळल्या तरी पुरस्कारांच्या बाबतीत मात्र शशी कपूर सुदैवी ठरला. दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, चार राष्ट्रीय पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर पुरस्कार ही मिळकत त्याच्या योगदानावर शिक्कामोर्तब करण्यास पुरेशी आहेआज शशी कपूर जाऊन बराच काळ लोटला आहे.! 
 

आपले दोन्ही हाथ बाजूला सारून झटकत मागे पुढे सरकत नाचण्याची त्याची शैली अनेक मिमिक्री आर्टिस्ट आजही कॉपी करून दाखवतात तेव्हा असच वाटतं की, स्वत:चा मोठा फॅनबेस नसूनही त्याने स्वत:ची छाप ह्या सिनेसृष्टीवर नक्कीच सोडली आहे..! जेव्हा जेव्हा कपूर खानदानातल्या सिनेमांची चर्चा होईल. तेव्हा सुपरहिट मसालापटांच्या राशी रचणाऱ्या ह्या कुटुंबात दर्जेदार कलाकृती देणाऱ्या शशी कपूरसाठी "मेरे पास शशी (भी) है…!" म्हणण्याइतकं त्याच अढळ स्थान हिंदी सिनेमात नक्कीच राहील.

       

- सौरभ रत्नपारखी