सिड्डू
एखाद्या पहिलवानांचे नाव वाटते ना? पण हा पदार्थ आहेत हिमाचल प्रदेशचा. सिड्डू हे ऐकतांना लड्डूसारखं वाटतं पण लाडू नाही तर करंजीसारखा दिसतो. करंजी गोड असते पण सिड्डू नमकीन. सिड्डू म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा ब्रेडही म्हणू शकतो.
अगदी जुन्या पारंपारिक पद्धतीने करायचे झाले तर या पदार्थाचा कणिक भिजवायलाच चार पाच तास लागतात. याहून जास्तही लागू शकतात खरंतर. ते वातावरणावर अवलंबून आहे कारण यात गव्हाचे पीठ आणि यीस्ट असते. पीठ आंबायला वेळ लागतोच. या पिठात वेगवेगळे सारण भरून हा पदार्थ तयार करतात. सुरवातीला कणिक, तूप आणि यीस्ट एकत्र भिजवतात आणि काही तासांनी परत पीठ मळतात. गरज वाटल्यास परत पीठ झाकून ठेवले जाते. या पीठाचे गोळे लाटून त्यात सारण भरून वाफवले की, सिड्डू तयार. सारणात वेगवेगळे प्रकार असतात. अकरोड, खसखसचे सारण. काही भाज्या भरूनही करतात पण प्रसिद्ध प्रकार म्हणजे उडदाच्या डाळीचे सारण.
भिजवलेली उडदाची डाळ जाडसर वाटून त्यात आलं, लसुण पेस्ट, कोथिंबीर आणि मसाले घालून सारण करतात. वाफेवर ही डाळ शिजते. पाककृती वाचल्यावर वाटले, किती पदार्थांचे रिमिक्स आहे यात.. कचोरीत मुगाच्या डाळीचे सारण असते, हिमाचली बबरूसारखंच आंबवून पीठ भिजवले जाते, मोमोसारखे वाफवले जाते आणि करंजीसारखा आकार आहे. मला वाटतं, बबरूचा हेल्दी प्रकार हा सिड्डू असावा. तरीच पहिलवानी नाव आहे. कणिक असल्याने मोमोपेक्षा चांगला. डाळीमुळे प्रोटिनही मिळते!
कुलू मनालीत अतिशय प्रसिद्ध असलेला हा करंजीसम सिड्डू नक्कीच पौष्टिक आहे. गरमागरम वाफाळलेले सिड्डू तुपाच्या धारेसोबत खाल्ले जातात. इथे उकडीच्या मोदकाचा टच!
आपल्याकडे व्हेज, पनीर, कॅार्न असे तीनच मोमो मिळतात. फारतर सॅास वेवगेगळे पण हा त्याहून कितीतरी पटींनी पौष्टिक प्रकार मिळत नाही. हिमाचलमध्ये स्ट्रीट फूड, नाश्त्यात मिळणारा पदार्थ मी पहिल्यांदा ऐकला. परदेशातील अनहेल्दी पदार्थ आपल्याला माहित आहेत पण देशी पौष्टिक, पारंपारीक पदार्थ माहित नाहीत.
फ्रोझन मोमो, कबाब मिळतात पण सिड्डू नाही. हा पदार्थही मिळायला हवा ना. आशा करू की काही वर्षांनी आपण सगळे हा पदार्थ पुण्यात एखाद्या कॅफेत खात असू!
- सावनी