शिवनामायच्या कथा..! भाग-तीन
मी होकारार्थी मान हलविली अन् काथीने आवळलेले दोन बांबू ओढीतओढीत झोल्याआईच्या झोपडी पहूर घेऊन आलो. ती पण तीन बांबू ओढीतओढीत माझ्यामागून आली. बांबू अंगणात टाकून मी उभा राहिलो होतो, तितक्यात तिनं मला तिच्या झोपडीतून आवाज दिला..!
ऊ छोटे सरकार या वजेस झोपडी मई..!
मी आपल्याला कोरा चहा करतीसू..!
झोपडीची चौकट माझ्या खांध्याइतकी उंच असल्यानं मी वाकून झोपडीत आलो. झोल्याआईनं चुल्हांग्नात राकील ओतून चुल्हीला जाळ लावला, एका पितळी पातील्यात तुटक्या कानाच्या तीन कपांचा अंदाज घेत चहा ठेवला.
मी झोपडी न्याहाळत होतो. झोल्याआईच्या एव्हढ्याश्या झोपडीत एक पिवळा बल्ब चालू होता, एका घडोंचीवर पाच-सहा गोधड्यांची वळकटी करून त्या गोधड्या व्यवस्थित रचून ठेवलेल्या होत्या. चार माठांची उथळण रचलेली होती. एका झोपडीला आधार म्हणून असलेल्या लाकडाला जर्मलची कॅटली टांगलेली होती, एक छोटासा देव्हारा होता अन् त्यात दोन-चार फुटू होते.
चहाला उकळी आली होती तिचा सुगंध माझ्या बसल्याजागी मला येत होता. झोल्याआई तिला सांडशीत ते पातेलं धरून त्याला जाळावर हलवीत होती, तसतस चहा उकळी घेत होता. अखेरला तो चहा गाळणीत धरून मला एका तुटक्या कानाच्या कपात चहा देऊन झोल्याआई थाटलीमध्ये चहा ओतून पित बसली. अधून मधून आमच्या गप्पा चालू होत्या.
एरवी सूर्य अस्ताला गेला होता. रोजंदारीवर लोकांच्या वावरात कामाला जाणाऱ्या बायका, गडी लोकं घराच्या वाटा धरून घराच्या दिशेने आपापल्या वाटा जवळ करत होते. राखूळीला म्हणून राखूळ्या पहाटेच घेऊन गेलेल्या बकऱ्या, शेरडं गावच्या वेशीतून आत आली. रानातल्या रानवाटेनं त्यांच्या खुरानं उधळलेली माती मावळतीच्या प्रकाशात आसमंतात विरून जाताना दिसू लागली होती. त्या मूत्रट मातीचा वास साऱ्या पायवाटेनं माझ्या पहूर येत होता.
मी आता झोल्याआईच्या अंगणात तिनं ठेवलेल्या, मोडकळीस आलेल्या बाजेवर बसून हे सगळं न्याहाळत होतो. झोल्याआईनं सांज सरायला देवाला दिवाबत्ती केली अन् एक दिवा बाहेर मोडक्या क्यानीत लावलेल्या तुळशीच्या समोर ठेऊन तिनं अस्ताला गेलेल्या सूर्याच्या दिशेनं डोक्यावर पदर घेऊन काहीतरी पुटपुटत सूर्याला नमस्कार केला.
काही वेळापूर्वी केलेल्या चहाची भांडी अन् तिचं कोड्यास ठेवायचं कडीचं डबड अन् दोन-चार भांडी ती अंगणात घासायला घेऊन आली. चुल्हीतून राखुंडा काढून तिनं एक बोकना तोंडात टाकला अन् तो तोंडात दाबून ती नारळाच्या काथीनं भांडी घासायला लागली. एरवी सर्वदूर काळोख दाटून आला होता.
झोल्याआईच्या अन् माझ्या गप्पा चालू होत्या. झोल्याआई मला गावात घडणाऱ्या कथा सांगत होती, तिच्या बालपणीच्या आठवणी सांगत होती. गाव-गावच्या पारावर बसून तिनं विकलेली टोपले, दूरडी अन् या तिच्या तीस सालच्या धंद्यात तिला आलेले अनुभव ती मला सांगत होती.
हे सांगत असताना तीला अनेकदा गहिवरून यायचं. आयुष्यभर तिनं उपसलेली कष्ट अन् अजूनही म्हातारपणाला तिला सुखाची चतकुर भाकर मिळत नव्हती. तिची उभी हयात कष्ट करण्यात निघून गेली अन् अजूनही अठरा विश्व दारिद्य्र तिच्या पाचवीला पुजलेले होते.
हे दुःख ऐकून घेणारं तिचं हक्काचं व्यक्ती तिला कुणी नसल्यानं ती हे सगळं माझ्यापाशी रितं करत होती. बोलून आसवं गाळून मोकळं होत होती, मी ही तिला समजेल अश्या सोप्यात भाषेत शहराच्या माझ्या कहाण्या सांगत होतो.
शहरात येणारे अनुभव, नोकरीचा असलेला दुष्काळ. कंत्राटी पद्धतीने काम करणारी कामगार, त्यांचं हे हलखीचं आयुष्य, रात्रंदिवस असलेली त्यांची ढोर मेहनत. माझं चालू असलेलं शिक्षण, नोकरीसाठी या ना त्या कंपनीच्या गेटवर मी करत असलेलो भटकंती अन् या प्रयत्नांना अजूनही कुठं न आलेलं यश.
माझं दुःख मी झोल्याआईपाशी रितं करत होतो अन् ती माझ्यापाशी. पण ; पर्याय नव्हता घंटाभर या आमच्या गप्पात कधी निघून गेला समजलं नाही.
आता निघायला हवं माय-बाप भाकरी खायला ताटकळतील म्हणून मी झोल्याआईला येतूया म्हणलं. तिनंही डोळ्यातली आसवं लुगड्याच्या पदराला टिपली. अन् मला ये जा छोटं सरकार गावची वाट जवळ केली की या म्हातारीच्या घरी. म्हणून एक बांबवाच्या कमटीपासून केलेली एक दूरडी माझ्या हातात दिली. माझ्या मायला माझ्याजवळ सांगावा धाडला की,ही दुरडी पहाटच्याला देऊळात फुलं घेऊन जायला राहून दे म्हणा आक्का..!
मी होकारार्थी मान हलवून घराची वाट धरली..!
भारत लक्ष्मण सोनवणे.