शिवकाल - अभिमान ते अतिरेक
"माननीय महोदय, हा कलेचा विलास नव्हे, तशीच ही केवळ करमणूक नाही. त्या युगप्रवर्तक पुरुषोतमाची त्याच्या भक्ताने मांडलेली ही पुजा आहे." अनेक दशकांपूर्वी भालजी पेंढारकर दिग्दर्शित "छत्रपती शिवाजी" हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्याच्या श्रेयनामावलीपुर्वी झळकणारी ही पाटी !
आज जेव्हा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे तेव्हा ह्या पाटीची प्रकर्षाने आठवण येते. एखादी कलाकृती ही किती निरपेक्ष भावनेने आणि भक्तीभावाने करता येते ह्याचे हे सुंदर उदाहरण !
भालजी पेंढारकराना आपल्या गौरवशाली इतिहासाचा सार्थ अभिमान होता आणि त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून तो दिसून येत असे. बहिर्जी नाईक, थोरातांची कमळा, महाराणी येसूबाई, मोहित्यांची मंजुळा, पावनखिंड, शिलंगणाचे सोने, मराठा तितुका मेळवावा अशा अनेक सिनेमाच्या प्रत्येक फ्रेम मधून त्याचा प्रत्यय येई. इतका की आज कृष्ण धवल सिनेमांचा काळ सरून कित्येक वर्ष सरली, सिंगल स्क्रीन थिएटर जाऊन मल्टिप्लेक्स आले. तरीदेखील छत्रपती शिवाजी म्हणजे सूर्यकांत/ चंद्रकांत, राजमाता जिजाऊ म्हणजे सुलोचना, बाजीप्रभू म्हणजे वसंतराव पहिलवान ही रूढ झालेली समीकरणे पिढ्यानपिढ्या लोकप्रिय आहे. आज शिवाजी राजा झाला" पासून "मराठी पाऊल पडते पुढे", सारखी गाणी आजही लोकप्रिय आहे कारण त्यामागची भावना विशुद्ध होती तेवढीच त्या कलाकृतीला दर्जेदार करण्यामागची मेहनत होती.
गेल्या काही वर्षात पद्मावत, पृथ्वीराज, मनिकर्णीका, पानिपत, तानाजी अशा वेगवेगळ्या इतिहासपटानी बॉलीवूडमध्ये नविन ट्रेण्ड रूढ केला. त्याचे अनुकरण करत मराठीत सुद्धा इतिहासपटांची लाट आली आहे. खरंतर दिग्पाल लांजेकरने शिवराजअष्टकच्या माध्यमातून ८ चित्रपट करण्याचा संकल्प आधीच जाहीर केला होता ते पाहता इतरांनी ह्या विषयापासून अंतर राखणे योग्य ठरले असते तरी देखील अमोल कोल्हे (गरुडझेप) , सुबोध भावे (हर हर महादेव), प्रसाद ओक (हिरकणी), अशा अनेकांना छत्रपती शिवराय साकारण्याचा मोह टाळता आला नाही.
हे मोठ्या पडद्यावर मर्यादित राहीलं असतं तर ठीक होतं, पण छोट्या पडद्यावर देखिल स्वराज्यरक्षक संभाजी, जय भवानी जय शिवाजी, स्वराज्यजननी जिजामाता , स्वराज्यसौदामिनी ताराराणी सारख्या मालिकांमधून तोच इतिहास परत परत दाखवला जात आहे. भविष्यात देखील रवी जाधव, नागराज मंजुळे, महेश मांजरेकर ह्यांचे शिवरायांवर आधारित सिनेमे येत आहेत तर सोनाली कुलकर्णी अभिनित मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणीचा उल्लेख देखील ह्यात करावा लागेल.
यामागे इतिहासाची आवड किती आणि वाहत्या ट्रेंडमध्ये हात धुण्याचा प्रकार किती हा वादाचा मुद्दा होईल. पण शिवकालाचा अभिमान आता अतिरेकाकडे वाटचाल करतो आहे. देशाला सध्या हिंदूराष्ट्रवादाच्या संकल्पनेने भारलेले असताना त्या प्रवाहात अनेकजण आपलेही हात धुवून घेत आहेत. बाहुबलीच्या यशामुळे प्रेरित होऊन VFX/ कॉम्प्युटर ग्राफीक्सचा अनाठायी भडिमार करत केलेले इतिहासपट, एखादी व्यक्तिरेखा सूट होते की नाही ह्याचा विचार न करता केवळ बॉक्स ऑफिसचा विचार करत केलेले कास्टिग, वेशभूषा - रंगभूषा ह्यांच्यावर फार मेहनत घेता स्पार्टन - रोमन योध्यांच्या हॉलिवूडपटाची केलेली उचलेगिरी .. या ना त्या प्रत्येक कारणाने इतिहासपटांवर होत असलेल्या टीकेच्या भडिमाराने सध्या फिल्म इंडस्ट्रीत गढूळलेलं वातावरण आहे.
अर्थात हा काही नविन आरोप नाही. वर उल्लेखलेल्या भालजी पेंढारकर ह्यांना देखील अशाच प्रकारच्या टीकेच्या भडीमाराला सामोरे जावे लागले होते. भालजी पेंढारकर हे हिंदुत्ववादी आणि स्वातंत्र्यविर सावरकरांच्या अनुयायांपैकी एक मानले जात असत. त्यामुळे गांधीहत्येनंतर झालेल्या जाळपोळीत समाजकंटकानी त्यावेळी त्यांचा जयप्रभा स्टुडिओदेखील जाळला होता. पण इतकं होऊनही त्यांची इतिहासाप्रति असलेली निष्ठा ढळली नव्हती कारण 'पैसा कमावणे' हा त्यांचा हेतू नव्हता.
एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा त्यांच्या स्टुडिओला भेट देण्यास गेले होते तेव्हा तिथल्या डायरेक्टर, आर्ट डायरेक्टर, एडिटर, सारख्या इंग्रजी पाट्या बघून नाराजी व्यक्त करत म्हणाले होते की, "ह्या शब्दांना मराठीत प्रतिशब्द नाहीत का?" आणि त्यातूनच बसल्या जागी त्यांनी नवनवीन प्रतिशब्द सुचवले. दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, छायाचित्रण, संकलन, असे अनेक प्रतिशब्द मराठीला त्या दिवशी मिळाले.
स्वत:ची भाषा, इतिहास, संस्कृती ह्याबद्दल असलेली विशुद्ध अभिमानाची भावना हेच भालजींच्या यशाचे गमक होते.
आज भव्यदिव्य इतिहासपट काढण्याचा जो अतिरेक चालू आहे तो पाहता भालजींची प्रकर्षाने आठवण येत आहे. आणि खात्री आहे की आणखी काही वर्षांनी देखील जेव्हा शिवरायांचे चरित्र साकारणाऱ्या अभिनेत्यांची चर्चा होईल त्यात सुर्यकांत - चंद्रकांत ह्यांचे स्थान खूप वरचे असेल कारण VFX/ ग्राफिक्स भव्यदिव्यता देऊ शकेल पण ती भावना आणि समर्पण कुठून आणणार ?