शिवनमायच्या कथा..! भाग-दोन

युवा विवेक    30-Nov-2022
Total Views |

shivanamayachya kathaa - bhaag 1
 
 
 
 
शिवनमायच्या कथा..! भाग-दोन
मी महादेवाच्या देऊळातून नदीचं संथपणे वाहणं, बायकांच्या गप्पा, रघुनाना कोळी यांचं टूपात बसून नधडीत मासं पकडणं न्याहाळत बसलो होतो. सोन्या बाबाला आज एकादस असल्यानं तो मंदिराच्या एकांगाला असलेल्या त्याच्या खोलीत शाबूदाना करायचा म्हणून चुल्हंगन पेटीत बसला होता. नदिच्या थडीला एकांगाला बांबूच्या बेटाचं दाट वन होतं. नदीला मोप पाणी असल्यानं बांबूचे बेटं मोप पोसले होते. दोन्ही हाताच्या तळव्यात बसणार नाही, अशी काही बांबू त्यात झाली होती. या बांबूच्या वनाची अन् गावच्या एकुलत्या एक टोपले करणाऱ्या झूल्या आईची एक कथा होती. मी बाकावर बसल्याजागी तिचा विचार करत होतो. तितक्यात रानवाटेनं केकटीची झाडं हुडकीत-हुडकित ती या बांबूच्या वनाकडे येताना मला दिसली. मी बसल्याजागी झूल्या आईला आवाज दिला.
 
"ऐ झूल्या आय, एकादसचतं तुझं हे खाटकावानी बांबू तोडायचं काम बंद ठीव, इतकं काम करुन क्का मरतीया क्का काय..!''
मी बऱ्याच दिवसांच्या अंतराने गावाला आलो असल्यानं,आणि चेहऱ्यावर पडत्या सावलीनं दुरून ओझरते दिसत असल्यानं तिने मला ओळखलं नव्हतं. मग ती माझ्या बसल्याजागी माझ्याकडे येऊ लागली.
कपाळावर मोठ्ठाच बुक्का लावलेली, मोकळं-ढाकळं लुगडं नेसलेली, अंगात जरिच्या खणाची चोळी घातलेली, तिनं लुगड्याचा शेला पार गुडघ्यापहूर वर ओढून कंबरात खोसून घेतला होता. पिकलेल्या केसांचा बुचडा बांधून त्याला केकटीच्या सालीनं तिनं बांधून घेतलं होतं. पायात दोन्ही वाहना घातलेल्या होत्या, ओळख पटावी म्हणून तिनं त्या दोन्ही वाहनांना चींदुक बांधून घेतलेलं होतं.
हातात तिच्या कामाची कत्ती, विळा घेऊन ती माझ्या दिशेनं आली.
तिनं मला प्रश्न केला, "कोणरं लका..? कुणाचा हायसा तू..? आवाज ओळखीचा लागून राहिला."
मी मला सावरत बसलो अन् तिला म्हंटले, "ये ग आज्जे बस घडीभर."
 
झूल्या आई बाकावर येऊन बसली. सोन्या बापूने एरवी चुल्हंगन पेटवून उपासाची जिन्नस शिजायला टाकून दिली होती. तो ही माझ्या मोहरे उक्खड बसून बिड्या ओढीत होता. मग माझी ओळख सांगायला त्यानच सुरुवात केली.
"अगं झूल्या बाय, त्यो वरल्या बेटातल्या कौश्याबाय हाईत का,जगन नानाची मधली सूनबाय तिचा धाकला लेवूक हाय. तुझी जोडीदारीन नाय का झुंब्र्याआई तिचा नातू हायसा. शहराला शिकायला हाय दोन-चार महिन्याला येतूया गावाला, गावची त्याला मोप ओढ हाय, आला की, साऱ्या गावच्या लोकांना भेटून जातूया पोर."
 
तितक्यात झूल्या आई ओळख पोहचल्यासारखी माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागली अन् तिच्या डोक्याजवळ लावून बोटं मोडू लागली. "अरे देवा, माझ्या कर्मा तू झुंब्र्या आईचा नातू हायसा का..! कित्ती मोठ्ठा झालासा पोरा, लहान होता तेव्हा झुंब्र्या आईच्या कड्यावर बसून यायचा माझ्या घरला. तुझी आज्जी लई चांगली म्हातारी होती पोरा. साऱ्या गावच्या मंदिराला येढा घालायची पहाटे, देवाचं भलतं येड तिला. चार साल झाले तेव्हा बरसदीच्या दिवसात इथं देऊळात आली पहाटेच सहाच्याला. काय झालं, महादेवाच्या पिंडीवर पाणी घालायला म्हणून नदीत पाणी घ्यायला आली का काय माहित, शेवाळल्या दगडावरुन तिचा पाय सरकला अन् शिवनामायच्या पाण्यात गेली वाहून. पुढं सावळ्या नानाच्या वावराच्या मोहरे असलेल्या केटित आडकली, तूवर खूप उशीर झाला हुता ती देवाचं करतच देवाची झाली माय..!"
असं बोलत बोलत झूल्या आई डोळ्याला पदर लावून डोळे पुशीत होती, मलाही माझ्या आज्जीची आठवण झाली अन् मी ही शून्यात बघत बसलो.
 
त्या दिवशी असच काहीसं माझ्या आज्जी संगत झालं होतं. सोन्या बाबा तिच्या मोप आठवणी सांगत होता मी ऐकत होतो, शिवनामायच्या पात्रात शून्यात नजर लावून बघत होतो. 
 
 
पहाटेची उन्हं आता मी बसल्याठीकाणी माझ्या डोळ्यावर येऊ लागली होती. शिवनामायच्या वाहत्या पाण्यात ती सूर्यकिरणं पडत अन् तीही आरश्याप्रमाणे डोळ्यावर चमकू लागली होती. सोन्याबाबा माझ्याजवळ बसल्याजागी फराळाचं करून, खरगटे झालेले भांडे चुल्हीतल्या राखूंड्यानं नारळाच्या काथीनं खसाखस घासत होता. झोल्याआई दूरवर असलेल्या बांबूच्या वनात पोसलेल्या बांबूना खाटकासारखं तिच्या हातात असलेल्या धारदार कत्तीनं बांबूचे खांडं करत होती.
 
एकनाथ बाबा टूपातून नदीच्या थडीला येऊन आपलं जाळं ओढीत अन् त्यात आलेल्या मासोळ्या, मांगुर मासे, खेकडे डालग्यात टाकत होता. मध्येच जाळ्यात एखादा छोटा साप जाळ्यात अडकून येऊन जायचा मग एकनाथ बाबा त्याची शेपटी धरून जोरात जमीनीवर दोन-तीन वेळा आपटत दुसऱ्या क्षणाला साप मरुन गेलेला असायचा.
 
मी बसल्या जागेवरून त्यांचं हे चालू असलेलं काम न्याहाळत होतो. अधूनमधून वाऱ्याची झुळूक माझ्या दिशेनं येऊन जायची अन् क्षणिक सुखाचा गारवा मला देऊन जायची. सोमवार असल्यानं गावातल्या बायका, पुरुष मंडळी महादेवाच्या पिंडीवर पाणी घालायला येत होते. मनोभावे पाणी घालून, बेल पान वाहून धूप दीप प्रज्वलित करून दहा-पाच मिनिटं मंदिराच्या मोहरं असलेल्या बैठकीच्या जागेवर बसून रहायची.
 
हे सगळं न्याहाळत असतांना झोल्याआईनं मला आवाज दिला.
ओ छोटे सरकार इकडं या की, ही बांबू मला तोलानं झाली हायसा..!
इकं माझ्या झोपडी पहूर घेऊ लागतूसा का..!
क्रमशः
- भारत लक्ष्मण सोनवणे.