तंदूरी चिकन
पंजाबमध्ये जन्म झालेल्या या पदार्थाची महती माझ्यासारख्या शाकाहारी मुलीने सांगणे यातच सगळे कौतुक आले. तरीही समस्त मांसाहारी आणि चिकनप्रेमी लोकांना हा लेख समर्पित आहे. प्रसिद्ध इतिहाससंशोधक वसंत शिंदे यांच्या मते तंदुरी चिकनसारखे पदार्थ हडप्पा संस्कृतीमधे सापडले आहेत. पंजाबमध्ये असतात तसे तंदूर शिंदे आणि त्यांच्या संशोधक टीमला हडप्पन संस्कृतीच्या अवशेषांमध्ये सापडले आहेत. सुश्रुत संहितेतही मांसाला मसाल्यांमध्ये मॅरीनेट करून भाजलेल्या पदार्थांचा उल्लेख आहे. हडप्पन घरांमध्ये तंदूरसारखेच लहान ओव्हन असायचे, ज्यात ब्रेड, रोटी आणि मांस भाजले जायचे. आज जे तंदुरी चिकन खाल्ले जाते त्याचा शोध पंजाबात लागला. या शोधाचे श्रेय जाते कुंदन लाल गुजराल यांना. असं म्हणतात गुजराल यांनी पहिल्यांदा पेशावरमध्ये तंदुरी चिकन विकायला सुरवात केली. मोखा सिंग यांचे 'मोती महल' नावाचे हॉटेल होते. तेथे कुंदन लाल गुजराल, कुंदन जग्गी आणि ठाकूर दास हे तिघे काम करायचे. त्यांनी त्यांच्या खानावळीत गोरा बाजार, पेशावर येथे तंदूर खोदले. त्यांची तंदुरी चिकनची डिश लवकरच प्रसिद्ध झाली. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर ते भारतात आले आणि दिल्लीत त्यांचा सुरवातीचा काळ हलाखीचा होता. तेव्हाच त्यांनी तंदुरी चिकन परत विकायचे ठरवले आणि 'मोती महल' या जगप्रसिद्ध हॉटेलचा जन्म झाला. पाकिस्थानमधील मोतीमहल अजूनही आहे.
काही लोकांच्या मते मुघल काळातही तंदुरी चिकन मिळायचे पण गुजराल यांनी ती रेसिपी अचूक बनवली. तंदूरमध्ये ४८० डिग्रीच्या तापमानावर चिकन भाजणे आणि तरीही मऊ टेक्श्चर टिकवणे सोपे नाही. तंदुरी चिकन करतांना दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, मसाल्यांचे मिश्रण आणि वेळ. चिकन मॅरीनेट करण्याचा वेळ आणि भाजण्याचा वेळ खूप महत्वाचा. दही, लिंबाचा रस आणि मसाले यात साधारण दोन तास चिकन मॅरीनेट केले जाते. त्यापेक्षा जास्त वेळ ठेवले तर मसाले आत झिरपतात. त्यानंतर तंदूरमध्ये भाजले जाते. दही आणि लिंबाचा रस चिकन मऊ ठेवायला मदत करत असले तरी जास्त वेळ भाजल्यास चिकन कोरडे होते. कमी भाजले तर कच्चे राहते. तंदूर कोणत्याही रेस्टारंटमध्ये बांधणे सोपे नाही कारण इतके जास्त तापमान असल्याने जागा जास्त लागते. तंदूर ऐवजी ओव्हनही वापरता येते पण ती चव येत नाही. मधला मार्ग म्हणून बरेच रेस्टॉरंट पिझ्झासाठी वापरले जाणारे पिझ्झा स्टोन वापरतात.
दिल्ली आणि पंजाबमध्ये ही डिश अतिशय प्रसिद्ध आहे, विशेषतः अमृतसरमध्ये. इंग्लंडमध्ये कमी मसालेदार तंदुरी चिकन लोकांना प्रचंड आवडते. या पदार्थात प्रोटीन मिळते आणि शिजवायला तेल लागत नाही. फ्राईड चिकनपेक्षा कितीतरी कमी कॅलरीज आहेत आणि जास्त नुट्रीएंट्स! भारतीय माणसाने केलेला हा पदार्थ आपल्या जवळच्या देशात पाकिस्तान, अफगाणिस्थान, बांगलादेशामध्ये तर मिळतोच पण भारतीय मांसाहारी पदार्थांचे नाव निघाले तंदुरी चिकन पहिल्या पाच आवडत्या पदार्थात येईल. दिल्लीतील मोतीमहल मध्ये मिळणारे तंदुरी चिकन आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना इतके आवडले की, त्यांनी कुंदन लाल गुजराल, कुंदन जग्गी आणि ठाकूर दास यांना बिझनेस वाढवायला जागाही मिळवून दिली. रशियाच्या निकिता कृश्चव्ह भारतभेटीत आल्या तेव्हा त्यांनी या पदार्थाची स्तुती केली होती. १९६२ मध्ये अमेरिकेच्या जॅकलिन केनेडी यांनी रोम ते मुंबई प्रवासात चिकन तंदुरी खाल्ले ही बातमी पसरली आणि अमेरिकेत या पदार्थाचा प्रवास सुरु झाला. याच पदार्थाचे अनेक वेगळे प्रकारही लोक आवडीने खातात. त्यातील एक म्हणजे चिकन टिक्का. चिकन टिक्का, चिकन टिक्का मसाला जगभर मिळतो. आजकाल बार्बेक्यू फूड लोक आवडीने खातात, पण त्याआधी आपली ही डिश लोकांनी आपलीशी केली आहे. फाळणीनंतर टिकून राहिलेला हा आणखी एक पदार्थ, कधी दिल्लीला गेलात तर मोती महालामधल्या भाज्यांच्या सॅलडच्या गादीवर पहुडलेल्या तंदुरी चिकनचा आस्वाद घ्यायला विसरू नका!
- सावनी