अखेरचा पॉझ

युवा विवेक    28-Nov-2022
Total Views |

akheracha pause
 
 
 
 
 

अखेरचा पॉझ

जाकर कहदो उनसे के कमिशनर गायतोंडे मौतसे नही डरता

केवळ अमिताभच्याच नव्हे तर हिंदी सिनेमाच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय चित्रपट असलेल्या 'अग्निपथ'मधील कमिशनर गायतोंडेचा हा डायलॉग ! ती भुमिका साकारली होती दिग्गज अभिनेते विक्रम गोखले ह्यांनीआपल्या समोर अमिताभ बच्चन नावाचा बुलंद अभिनयाचा शहनशाह उभा असताना देखील, विक्रम गोखले ह्यांनी साकारलेला खमक्या स्वभावाचा निर्भीड कमिशनर गायतोंडे अनेकांच्या स्मरणात राहिलायोगायोग बघा कसा असतो .. विक्रम गोखले आपल्या मृत्युला देखील त्याच निर्भीडपणे सामोरे गेले. त्यांच्या मृत्यूविषयी उलटसुलट बातम्या प्रसृत होत असताना देखील ते मृत्यूशी झगडत राहिले आणि कोणे एकेकाळी आपणच उच्चारलेला तो डायलॉग त्यांनी सार्थ केला.

 

केवळ हाच प्रसंग नव्हे तर नटसम्राट मधील श्रीराम अभ्यंकर ही व्यक्तिरेखा साकारताना समोर नाना पाटेकर सारखा कसलेला अभिनेता असताना आणि तेही मुख्य भूमिकेत असताना देखील दमदार अभिनय म्हणजे काय ते त्यांनी सोदाहरण दाखवून दिलं. रुग्णालयात गलितगात्र होऊन मृत्युशैय्येवर पडलेल्या श्रीराम अभ्यंकर आणि त्यासमोर उभे असणाऱ्या गणपत बेलवलकरने (अर्थात नाना पाटेकरने) खऱ्या अर्थाने अभिनयाची जुगलबंदी दाखवली. 'कृष्ण आणि कर्ण ' ह्यांच्यातील संवाद बोलत असताना स्वतःच्या आयुष्याची सल उलगडून दाखवणारा हा प्रसंग म्हणजे मराठी सिनेमाच्या इतिहासातील एक अनमोल ठेवा आहेवि.वा.शिरवाडकर लिखित 'नटसम्राट ' नाटकाच्या मूळ संहितेत नसणारे हे पात्र चित्रपटात दाखवताना सुंदर रेशमी कापडाला ठिगळं लावल्यासारखे वाटले नाही. ह्याचे श्रेय जेवढं लेखकाला जातं तेवढंच विक्रम गोखलेंच्या अभिनयाला जातं. ह्या प्रसंगात देखील क्षणभर खरच मरण पावल्याचा आव आणून पुन्हा ",मी जिवंत आहे " हे बोलता दर्शविणारी त्यांची अदाकारी निव्वळ अफलातून अशी आहे.
 

सक्षम अभिनय आणि प्रवाहाविरुद्ध जाऊन उभे राहण्याची बंडखोर वृत्ती बहुधा त्यांच्या रक्तातच असावी. त्यांची आजी दुर्गाबाई कामत ह्या अशा काळात अभिनय क्षेत्रात उतरल्या होत्या जेव्हा घरंदाज कुटुंबातील महिला सिनेसृष्टीत कामाची कल्पना करणे पण हीन दर्जाचे मानत. पहिली भारतीय महिला अभिनेत्री हे बिरूद लाभलेल्या दुर्गाबाईंच्या कन्या म्हणजे विक्रमजींची आजी कमलाबाई ह्या सुद्धा भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या महिला बाल कलावंत ठरल्या.

 

पण हा प्रथमपणाचा मान फारसा सुखकर नव्हता. विक्रमजींच बालपण हे गरीबीचे चटके सोसत गेलंं होतंं. त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे स्वतः दिग्गज अभिनेते होते पण त्यांनीही आयुष्यात असा दुर्धर कालखंड पाहिला होता की, आर्थिक तंगीमुळे एकवेळ आत्महत्येच्या विचारापर्यंत येऊन मुलाबाळांच्या विचाराने त्यांनी माघार घेतली होती. वडिलांच्या निधनानंतर त्यांची आठवण सांगताना विक्रमजी एकदा म्हणाले होते की, एके दिवशी दिवाळीत शेजाऱ्या पाजार्यांच्या मुलांचे फुटलेले फटाके उचलून ते फोडण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्या वडिलांनी त्याना पाहिले आणि घरात गेल्यावर झोडपून काढले. पण आपण आपल्या मुलांना हा सणासुदीचा आनंद देखील देऊन शकत नाही, ह्या कल्पनेने त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी कुठून तरी पैसे उसणे आणून मुलांंना फटाके आणून दिले. पण नंतर विक्रम गोखले ह्यांनी आयुष्यभर कधीच फटाके वाजवले नाही.

 
लहानवयातच आलेली प्रगल्भता आणि आयुष्याची ही गडद बाजू पाहिल्याने, त्यांंचे प्रतिबिंब त्यांच्या आयुष्यात आणि अभिनयात पदोपदी दिसायचे. वडिल चंद्रकांत गोखले हे मेकअपरूममध्ये अनावश्यक असलेल्या बल्बना स्वतः उठून बंद करायचे तसेच विक्रमजी सुद्धा प्रेक्षकांना प्रयोग चालू असताना मोबाईल बंद ठेवून रंगभूमीचे पावित्र्य पाळण्याचे आवाहन करत असतत्यांचे देखणेपण आणि राजबिंडेपण त्यांच्या चेहऱ्यापुरता मर्यादित राहता भूमिकेत पण दिसत असे.
 

हम दिल दे चुके सनममधील शास्त्रीय गायक असो किंवा माहेरच्या साडीमधील हेकेखोर बाप दोन्ही पात्रातला फरक ते सहजतेने दाखवू शकतभुलभुलैय्या सारख्या विनोदाचा धुमाकूळ असलेल्या चित्रपटात अक्षयकुमार, राजपाल यादव, परेश रावल धुडगूस घालत असताना देखील मांत्रिकाचे पात्र त्या गदारोळात हास्यास्पद होता गंभीर आणि आश्वासक वाटेल हि किमया विक्रम गोखलेच करू शकत.

 

मराठी रंगभूमीवर बॅरिस्टर सारखी नाटके करत असतानाच त्यांचा टीव्हीवरचा त्यांचा वावरही सुखद असायचा. “या सुखांनो यामधील दादा अधिकारी आणि त्यांची पुस्तक वाचताना वर पाहण्याची लकब हा अवघा दोन सेकंदाचा प्रसंग देखील संस्मरणीय झाला कारण विक्रम गोखले ह्या नावामागचे वलयअनुमती सारख्या चित्रपटाने त्यांच्या अभिनयावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर लावून उशिराने का होईना त्यांच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब केले.
 

आयुष्यभर हिंदी - मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीला आपल्या अभिनयाच्या नजराण्याने संपन्न करणारा हा अभिनेता आपल्या दोन वाक्यातील पॉझसाठी ओळखला जाई. मृत्यूसमयी पण त्यांनी पॉझ घेत यमराजाला काही काळ हुलकावणी दिली. पण दुर्दैवाने हा शेवटचा पॉझ ठरला. एक बुलंद अभिनेता म्हणून समाज त्याना जेवढा स्मरणात ठेवेल तेवढाच माजी सैनिकाकारीता आणि निराधार मुलांकरीता त्यांनी केलेल्या समाजकार्यसाठी देखील स्मरणात ठेवेल.

 

अलविदा विक्रमजी !

 

सौरभ रत्नपारखी

मोबाईल ९८८१७८३४७४