भवितव्य मराठी सिनेमाचे
काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपट वाहिन्यांवर TRP वाढवण्यासाठीचे प्रयत्न म्हणून एक फंडा वापरण्यात आला होता. ओशन ११, ग्लेडियेटर सारखे गाजलेले हॉलिवूडपट मराठीत डब करून दाखवण्याची टूम निघाली होती. पण लवकरच तो प्रकार बंद पडला. कारण अशा हॉलिवूडपटांची चटक मराठी प्रेक्षकांना लागली आणि त्यांचा ओढा हॉलीवूडपट पाहण्याकडे वाढला तर मराठी सिनेमांना सुद्धा स्वत:ची निर्मितीमुल्ये त्या दर्जाची करावी लागली असती किंवा प्रेक्षक विभक्त होण्याची शक्यता वाढली असती.
कोणत्याही परिस्थितीत हे मराठी चित्रपटसृष्टीच्या मुळावर उठण्यासारखं होतं. ही भीती अनाठायी नव्हती हे कोरोनाच्या संसर्गकाळात दिसून आले. मधल्या काळात डेटापॅक फ्री झाल्याने आणि OTT चे मार्केट वाढल्याने भारतीय प्रेक्षक जगभरातील विविध भाषांतील चित्रपट आणि वेबसिरीकडे ओढला गेला. त्याच त्या साचेबद्ध हिंदी सिनेमाला पाहून बहुतांश प्रेक्षक दाक्षिणात्य सिनेमाकडे ओढले गेले. या सर्वात गाफील राहिलेल्या हिंदी सिनेमाला ताज्या दमाच्या दाक्षिणात्य अभिनेत्यांनी इतके जेरीस आणले की, "बॉयकॉट बॉलिवूड" सारखी चळवळ मुळ धरू लागली.
इतिहासपट आणि तमाशापट ह्यावर शेकडो मराठी सिनेमे तयार होत असताना आज एकविसाव्या शतकात सुद्धा मराठी चित्रपटनिर्माते नटरंग, चंद्रा सारखे तमाशापट किंवा शिवकालीन कथानकाकडे धाव घेत आहेत. मराठी कलावंतांनी आपलं प्रभावक्षेत्र देखील कमी करून ठेवले आहे. आपल्या पूर्वजांनी अटकेपार झेंडे लावले हे ऐकायलाच चांगलं वाटतं कारण ग्वाल्हेर, इंदोर, बडोदा, तंजावर ... इथला मराठी समुदाय डोळ्यासमोर ठेवून किती वेळा चित्रपटनिर्मिती झाली. तेही फार लांबच पण वर्धा, उस्मानाबाद, गडचिरोली, परभणी, गोंदिया... ह्यांच्या पार्श्वभूमिवर कथा असलेल्या किती कलाकृती तयार झाल्या?सलमान/आमिर वैगेरे स्टार लोकांनी स्वतःच स्टारडम रुजवताना अनेक वेशभूषा, केशभूषा लोकप्रिय केल्या. असं किती मराठी अभिनेत्यांना फॉलो केलं गेलं आहे? किती मराठी चित्रपट आपल्या तडाखेबंद संवादामुळे ओळखले गेले? महाराष्ट्रात वर्षाला शेकडो इंजिनियर - डॉक्टर तयार होतात. हा वर्ग इंटरस्टेलर, इन्सेप्शन, सारखे चित्रपटपण पाहतो. आपला प्रेक्षकपण "सुबुद्ध" आहे ही भावना कधी रुजणार? चित्रपट पाहणारा मुख्य वयोगट कॉलेजवयीन असतो त्याला आजवर किती ध्यानात घेतल गेलं? तेच ते कलावंत नाटक, वेबसिरिज, डेली सोप, चित्रपटमधून सामोरे येत असेल तर त्यांची फेसव्हॅल्यू किती राहील ? मराठीतले आघाडीचे कलावंत सुद्धा डेलीसोपमध्ये दिसतात मग तेच पुन्हा इतरत्र का पहावे? डॉ. अमोल कोल्हेंंना छोट्या पडद्यावर शिवराय म्हणून बघितल्यावर ३०० - ४०० रुपये खर्चून तेच शिवकालाच माहिती असलेलं कथानक बघायला मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांनी का म्हणून जावे?
गेल्या अनेक वर्षात खान मंडळी आणि पंजाबी हिरोंचे प्राबल्य सिनेसृष्टीवर राहील आहे. तमिळ - तेलगूमधला अभिनेता हिंदीत गेला तरी तो मुख्य भुमिका करतो. मराठीत हे किती जणांना जमल आहे ? हिंदी सिनेमात दुय्यम भुमिका करू लागल्याने किंवा हिंदी रिऍलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून उभं राहिल्याने त्यांच्या स्टारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणारच.
महेश बाबू, प्रभास, रामचरण... अशा अनेकांपैकी किती जणांनी स्वत;चं अवमूल्यन केलेलं आजवर दिसल आहे? (मान्य आहे. ....हे क्षेत्र स्पर्धेचे आणि पैशाच आहे..!! पण वारंवार दुय्यम विनोदी किंवा नोकरांच्या भुमिका टाळणे शक्य नाही का?) असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर तोडगा निघत नाही तोवर दुर्दैवाने मराठी सिनेमाचे भवितव्य अधांतरीच असेल.