द महेश कोठारे युनिव्हर्स

युवा विवेक    03-Oct-2022
Total Views |

The  Mahesh kothare Univers
 
 
 

महेश कोठारे युनिव्हर्स

कल्पना करा की, एखादा आडदांड - धिप्पाड शरीराचा दरोडेखोर तुमच्या समोर अकस्मात उभा राहिला, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? नक्कीच त्याला घाबराल! पण तोच जर तुमच्याकडे बघून विचित्र आवाजात "आईय्यायायाया" असं म्हणू लागला तर तुम्ही त्याला घाबराल की हसालकिंवा तुम्ही एखाद्या भुताने झपाटलेल्या जुनाट घरात राहत आहात आणि आत्महत्या केलेल्या एका तरुणाचे भूत तुमच्या समोर आले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? ह्यावेळेस देखील घाबराल पण तेच भूत जर "बाबा लगीन ढीकच्याक ढीच्यांक" म्हणत नाचू लागले तर घाबराल की, पोट धरून हसालअसे प्रश्न बुद्धिजीवी किंवा विचारी चित्रपट रसिकांना पडत असतील पण महेश कोठारे आणि त्यांच्या चाहत्यांना हे प्रश्न कधीच पडले नाही. किंबहुना असे प्रश्न पडू देणे हिच त्या चित्रपटांचा आनंद घेण्याची पहिली अट होती.

 

आपल्या सिनेमाच्या प्रेक्षकांचं सरासरी वय १३ ते १४ आहे आणि हे गृहीत धरूनच त्यांचं निखळ मनोरंजन करायचं आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महेश कोठारे आणि टीमने ८० आणि ९० च्या दशकात विनोदाचा धुमाकूळ घालत मरगळलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला दीर्घकाळ ऊर्जितावस्थेत ठेवलेएक 'बाल कलाकार किंवा नायक' म्हणून महेश कोठारे ह्यांच्या कारकीर्दीचा आढावा घ्यायचा तर तो स्वतंत्र लेखाचा विषय होईल, पण केवळ दिग्दर्शक म्हणूनच आढावा घ्यायचा झाला तर मराठी चित्रपटसृष्टीत डीसी - मार्व्हल प्रमाणे त्यांचं स्वतंत्र युनिव्हर्स तयार होईल इतकी अफाट कामगिरी त्यांनी केली आहे.

 

उद्योगरत्न यदुनाथ जवळकर, धनाजी वाकडे, रेडे हवालदार, इन्स्पेक्टर महेश जाधव, तात्या विंचू, कुबड्या खविस, टोनी टापरे, अण्णा चिंबोरी, बाबा चमत्कार, कवट्या महाकाल, गिधाड, टकलू हैवान, मारुती कांबळे, झगडया रामोशी, बाब्या, दुर्गा मावशी, इनामदार भुसनळेआणि अर्थात लक्ष्या. अशी अनेक पात्रे महेश कोठारेच्या सिनेविश्वाचाच नव्हे तर मराठी जनांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग्य आहेकेवळ कथेतील पात्रच नव्हे तर त्यांचे अजब गजब डायलॉग सुद्धा आजही अनेकांना तोंडपाठ आहे. "व्हाहा व्हिही व्हीहू", ओम फट स्वाहा, सुड दुर्गे सुड, डोळे बघ डोळे.." असे अनेक संवाद दैनंदिन बोलीभाषेत सुद्धा विनोद निर्मितीसाठी रूढ झाले आहेत.

 

महेश कोठारेंचे सिनेमे हे काहीतरी नविन किंवा वेगळं कथानक दाखवेल अशातला भाग कधीच नव्हतात्यांच्या प्रत्येक चित्रपटावर कोणत्या ना कोणत्या हिंदी अथवा इंग्रजी सिनेमाचा प्रभाव असायचाधडाकेबाज मधील "ही दोस्ती तुटायची नाय" हे गाणं थेट शोलेच्या "यह दोस्ती हम नही तोंडेंगे" च्या धर्तीवर वर होतचित्रपटाच्या सुरुवातीचं निवेदन सुद्धा तत्कालीन त्रिदेव मधील नसीरुद्दीन शाहच्या शैलीतील.!! बाटलीतला इच्छा पूर्ण करणारा गंगाराम ही अल्लाउद्दीन आणि जादूच्या दिव्याचीच आधुनिक कथा !! धूमधडाका हा तर थेट "प्यार किये जा" चा अधिकृत रिमेक !! पण मेहमूद आणि ओमप्रकाश ह्यांनी जेवढी भुतपट रंगवून सांगण्याच्या प्रसंगात जेवढी धमाल आणली त्याहून किंचित जास्त का होईना लक्ष्या आणि शरद तळवलकर जोडीने आणली ह्यात शंका नाही.

 

महेश कोठारेचे इतर सिनेमे देखील कोणत्या ना कोणत्या सिनेमावर आधारित होते. धांगडधिंगा हे जिम कॅरीच्या लायर लायरच मराठी रूपांतरण! "झपाटलेला" चाईल्ड्स प्ले वरून उचललेला! तर " दे दणादण" मधील लाल रंग पाहून शक्तिहीन होणारा नायक मिस्टर इंडिया प्रमाणेAdaptation, Remake, Inspired अशी कितीही नावे दिली तरी महेश कोठरेंच्या सिनेमात स्वत:चा असा एक  फॅक्टर नेहमी असायचा. एखाद्या कुशल कलाकाराने कोलाज करत कलाकृती बनवावी तसे महेश कोठारेचे सिनेमे असत. लक्ष्याच विनोदाच टायमिंग, अजब नावाचे आणि ढंगाचे खलनायक, डोक बाजूला ठेवून निखळपणे हसून आनंद घ्यावा अस कथानक. असे अनेक आनंदाचे क्षण महेश कोठारेनी दिले आहेत.

 

दुर्दैवाने मराठी सिनेमापासून प्रभावित होऊन खेळण्या, व्हिडिओ गेम्स, कॉमिक्स होण्याची प्रथा आपल्याकडे रुजली नाही अन्यथा Adventures of Mahesh and Lakshya च्या धमाल सिरीज झाल्या असत्यामराठी सिनेमाच्या संघर्षाच्या काळात महेश - अशोक - लक्ष्मीकांत - सचिन ह्या चार खांबानी ही इंडस्ट्री तोलून धरली होतीनिदान त्यामुळे का होईना आज मराठी मनोरंजन विश्वाच व्यापक रूप दिसून येत आहे.

 

नुकताच त्यांनी आपला ६८ वा वाढदिवस साजरा केला त्यानिमित्ताने मराठी सिनेमाच्या ह्या खऱ्याखुऱ्या शोमनला ह्या लेखातून मानाचा मुजरा !!
 
- सौरभ रत्नपारखी