कढी-चावल
कढीचा जन्म राजस्थानचा असला तरी कढी चावल या प्रकाराला जास्त जीव लावला तो पंजाब्यांनी! कित्येक वर्षे मला वाटायचे की, आपण मराठी लोक करतो तशीच तूप, जिरे, हिंग आणि कढीपत्ता यांची फोडणी दिलेले ताक म्हणजेच कढी. ही कढी टेस्टी असते पण सतत "कढी चावल खाना है यार" असं म्हणावं इतकं काय त्यात? एकदा दिल्लीच्या मैत्रिणीने कढी-चावल खाऊ घातले तेव्हा कळले की, हे कढी, भजी आणि भात याला म्हणतात. भजी किंवा पकोडा यात सायलेंट आहे. हे कॉम्बिनेशन मला आपल्या विदर्भातील वडा-भात सारखे वाटले आणि आवडलेही. राजमा-चावल आणि कढी-चावल आवडणारे असे दोन ग्रुप्स लोकांमध्ये आहेत म्हणे. राजमा-चावल मध्ये सांगण्यासारखं फार काही नाही. राजम्याची उसळ आणि भात इतकं सोपं आहे. आता मसाले घरानुरूप बदलतात, चव बदलते पण लोकांना आवडते. मला वाटतं आशियातील सर्व देशातील कंफर्ट फूड मध्ये भात आहेच. भारतातच पहा ना, खिचडी, वरण-भात, बिर्याणी पासून ते रसम-सादम पर्यंत सर्वांना भात आवडतो.
पंजाबी कढी चावलमध्ये तीन पदार्थ आहेत कढी, पकोडे आणि भात. यापैकी भाताची कृती येत नसेल तर ही सिरीज वाचणे निरर्थक आहे. तर आवडीचे किंवा घरी असलेले तांदूळ घेऊन त्याचा कुकर लावायचा आणि पकोडे बनवायला सुरवात करायची. कांदा, आलं किसायचे. त्यात तिखट, हळद, मसाले आणि बेसन टाकून ताकात पीठ भिजवायचे. याची लहान भजी तेलात क्रिस्पी तळायची. हे पकोडे दोनदा तळले तर छान कुरकुरीत होतात. आलं, लसूण, बेसन, कोथिंबीर, टमाटे वगैरे टाकून कढी करायची, थोडे जास्त बेसन घालून. आपण वरून फोडणी देतो तसं नाही तर पिठलं करतो तसं फोडणीत ताक-बेसनाचे मिश्रण टाकायचे. गरमागरम कढीत पिटुकले पकोडे इतके क्युट दिसतात ना!
पिठलं भात आपल्याला जसा आवडतो तसंच हे! हा पदार्थ ते लोकही संध्याकाळी जेवणात करत असतील असं मला उगीचंच वाटतं, कोणाला माहित असेल तर सांगावं. लहान मुलांपासून ते वडिलधाऱ्यांपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या पदार्थांच्या लिस्टमध्ये बसणारा हा पदार्थ. कढीचेही खूप प्रकार आहेत. राजस्थानी आणि पंजाबी थोडे सारखे आहेत. मराठी कढी तर पातळ, गोडसर आणि सूप गटात मोडणारी. सोलकढी तर व्हिगन प्रकार, व्हीगन संकल्पना माहित नसतांना लोकांनी शोधून काढलेला. गुलाबी रंग असलेली नारळाची सोलकढी व्हॅलेंटाईन डेच्या लंचच्या मेनूत बसू शकते इतकी सुंदर दिसते. सिंधी कढी अजूनच वेगळी! डाळीच्या पिठाला ग्रेव्हीला घट्टपणा येण्यासाठी वापरणे ही कल्पना पूर्णतः भारतीय आहे आणि मैदा, कॉर्नफ्लोअर पेक्षा नक्कीच पौष्टिक. (इथून प्रेरणा घेऊन चायनीज सूपमध्ये बेसन घालून पाहू शकता आणि पदार्थासोबत तोंडीलावणे म्हणून घरच्यांचे बोलणेही खाऊ शकता. )
एखाद्या सुट्टीच्या दिवशी पोळ्या लाटायचा, खायचा कंटाळा आला तर नक्की, नक्की करून पहावा असे हे कढीचावल आहेत. पकोडे वगैरे करतांना, "यापेक्षा पोळीभाजी पटकन झाली असती." असे विचार मनात आले तरी ते झटकून टाकायचे. सब्र का फल टेस्टी होता है! झोमॅटो, स्वीगी वरून ऑर्डर करण्याचा हा पदार्थ नव्हे. हल्दीरामसारख्या कंपन्यांनी इन्स्टंट कढी पकोडे वगैरे मार्केटमध्ये आणले आहे, दुसऱ्या देशात राहणाऱ्यांसाठी हे ठीक आहे पण भारतात सध्या तरी नाही. पावसाळी थंड वातावरणात, सगळ्या कुटुंबीयांनी गप्पा मारत, टीव्ही पाहत खाण्याचा हा पदार्थ. जेवणानंतर गाढ झोपेची हमी देणारा पदार्थ म्हणजे कढी-चावल!
- सावनी