धोंडाईचा गाव..!

युवा विवेक    12-Oct-2022
Total Views |

dhondaaicha gaon
 
 
धोंडाईचा गाव..!
भाग २
 
चेहऱ्यावर खोटे भाव आणून जगणं मला कधी रुचणार नव्हतं. त्यामुळं माझी झालेली अवस्था खूप वाईट होती, पण कुणाला काय सांगणार. गावचा लेक शहराला राहतूया म्हंटल्यावर गावच्या वडील लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा असणारच ना. 
 
पण सध्याचा चालू असलेला काळ अन् माझ्या मनाची होणारी कोलाहाल मी तरी कुणाला सांगणार होतो. म्हणून येऊन बसलो होतो या शिवना मायच्या तीरावर. तीच एक सोबती अन् तीच सध्या माझी मैत्रीण होती जी मला समजुन घेईल.
 
धोंड्याई भाकरी करायला लागली होती. भाकरी थापण्याचा आवाज माझ्या कानावर आला तसा मी धोंड्याईच्या घर वजा झोपडीकडे निघालो. दाराच्या उंबरठ्यावर उभे राहून आईला आवाज दिला.
'अय आजे काय करायली..? झाली का भाकरी, कोड्यास..?'
तितक्यात धोंड्याई दचकून डोक्यावर असलेला पदर सावरत मला म्हणाली, 'कुण बा..? माझ्या नातवा सारखा तू, पण मी काय वळखीलं नाय बा तुला.'
मी म्हंटले, 'अगं आजे, मी झुंबर्या माळणीचा नातू हायसा सूनि आक्‍काचा धाकटा लेवूक'
 
तितक्यात धोंड्याई बोलली, 'अरे माझ्या कर्मा, माझी नजर अशी हाय बाबा दळभदरी गावच्या लोकासणी ओळखिना. मग कसा हायसा बाळा तू? अन् पराच्या दिसाला तुझी माय भेटली होतीसा मला बाजारात. ती बी बोली की, धाकटा लेक आला हायसा शहरावरून.'
मी बोलता झालो, 'हाव गं माय. आईनं सांगले मला की,धोंड्याई भेटली हूती म्हणून. तुझी तब्येत चांगली नस्तिया आता. म्हणून भेटून यायला सांगितलं मायना. मग आलूया तुला भेटाया'
 
'बरं झालं लका आलासा..! आला हायसां तर पिठलं भाकर खावून जा. तुझ्या गरीब आजीच्या घरचा'
'नगं नगं. आजी मायनं घरला माझी भाकर केली असलं उगाच शिळी होईल. तुझी विचारपूस झाली यातच माझं पोट भरलं.
धोंड्याई भाकर खात माझ्या संगत गप्पा मारत बसली होती. माझ्या रुपात तिला तिचा नातू गवसला होता.
तिला तिच्या नाताची आठवण आली अन् तिच्या डोळा पाणी आले. मी बघून न बघितल्या सारखं केलं अन् आईला म्हंटल, 'आई काळजी घे स्वतःची. येतुया आता. खूप वख्त झाला हायसा. पुन्हा झुंबऱ्या माळीन माझ्या नावानं बोंबाटा करल साऱ्या गावात.'
 
धोंड्याई बोलती झाली, 'बाळा माझा नातू पण तुझ्या इतकाच असतारं, पण लहानपणी खंडेरायाच्या गावच्या जत्रंला हारला. तसा गवसला नाय खूप धुंडला पण नाय गाव्हला. बिच्चारा कुठं असल अन् काय खात असल खंडेरायालाच माहीत?' अन् आजीने पदराने डोळे पुसत एका ताटलीत पिठलं दिलं अन् बोलती झाली, 'झुंबऱ्या माळनीला माझ्या हाताच पिठलं लई आवडतं. तू बी खा अन् तुझ्या आजीला पण दी अन् सावकाश जारं बाळा.'
 
मी पण तिला येतूया काळजी घे म्हंटले अन् पुढच्या वख्ताला शहरावरून आलो की, भेटायला येईल म्हणून निघालो...
मी किती दूरवर जास्तोवर धोंड्याई मला बघत राहिली,दाराच्या उंबठ्यावर बसून अन् डोक्यावरचा पदर सावरत डोळ्यातील नातवाच्या येणाऱ्या आठवणीतले आसवे सावरत,पदरानं पुसत..!
 
धोंड्याईनं दिलेली पिठल्याची ताटली घेऊन मी घराच्या वाटेनं निघालो होतो,तिच्या डोळ्यातुन येणाऱ्या आसवांना सावरत तिनं घरात पडलेला भांड्यांचा गराडा बाहेर अंगणात आणला.रांजणातून जगाने पाणी घेऊन,चुलीतल्या राखेनं भांडे घासुन,ती हिसळत राहीली.
तिच्या डोक्यात काय विचार चालू होता कळायला सीमा नव्हत्या,मनाशीच मनचे काहीतरी पुटपुटत तिचे भांडी घासणे चालू होते...
भांडे घासण्याचा आवाज ऐकुन शेजारची धुरपता काकु धोंड्याईच्या अंगणात येऊन बसली,अंगणात मोकळं असल्या कारणाने लिंबाच्या झाडांच्या फांद्यांचा अंगणात वाऱ्याच्या सोसाट्याने आवाज येत होता,जो अंगाला बोचनारा अन् काटे आणणारा होता...
धुरपता काकु नवार पातळ सावरत अंगणात बसली अन् धोंड्याईशी गप्पा झोडू लागली,धोंड्याईचां लेवुक गावाला जावून आठ दिवस सरले होते अन् आता तिला लेकाची आठवण येऊ लागली,हे तिच्या बोलण्यातून जाणवू लागलं होतं.
सांच्याला माझ्याशी नातवाच्या विषयी बोलणं झाल्यापासून धोंड्याईच्या काळजात ध्धस्स झालं होतं...
कधी एकदा तिचा लेवक घरी येतो असं तिला वाटत होतं,तिचं धुरपता काकुच्या बोलण्याकडे कम अन् गावच्या पल्याड असलेल्या स्मशानवाटेकडं चित्त लागलं,कारण गावला यायची ही एकच वाट हुती...
तितक्यात धुरपता काकुने उद्याच्याला संतु सोनाराच्या वावरात सरकी जमा करायले जायचं म्हणुन धोंड्याईला तिच्या अंगाला हात लावून खुणावलं अन् धोंड्याई एकदमच डचकत डोळ्यांतील आसवांना मोकळी वाट करून देत बोलू लागली...
धुरपे अय माझ्या लेकी धूरपे..!
आठ दिस झाले माझा नामा काय येईना झाला हाईसा..!
शहराले काम धुंडाया गेला अन् आजुन पहुर काय सांगावा नाय का,तो बी काही यायना झालाय..!
धुरपा काकू बोलती झाली:
अगं ए मायव येईल व तुझा लेवूक येईल,उद्या सांच्या पहुतर येईल नग अशी येड्या खुळ्यागत भरल्या घरात रडू नगं व माय..!
धोंड्याई बोलती झाली:
धुरपे तुझं सबुत खरं हाय गं..!
माझा पोटचा गोळा हाय ग त्यो,इतक्या दिस कधी शहराला राहिला नाय अन् तिथं आपल्या सारख्या आठरा विश्व दारिद्र्य असलेल्या लोकासनी कोण घटकाभरचा निवारा ध्यु रायला,की आसराला एखादं छप्पर...
 
तितक्यात धुरपा काकुची सुनबाई मीरा आवाज देते:
व आत्याबाई..!
चाला की आता घरला कव्हा पथुर बसुन राहता,पार अंधारून आलया की आता आवरा आवरा माय लेकीच्या गप्पा,चला ओ आत्याबाई..!
धुरपा काकु बोलती झाली:
आली आली गं मिरे मामांजिस्नी ताट वाढाया घे तुवर..!
मायव चल येतु गं मी तुझा मोठा लेवूक आला हायसा ढोसून त्याच्या सेवेत हजर व्हावं लागल नायतर त्यो कल्ला करतुया..!
धोंड्याई:
बरं बरं लेकी उद्याच्याला जावूया संतू सोनाराच्या वावरात,मला आरोळी देई हा जाता वख्त...
 
भारत लक्ष्मण सोनवणे.