कलाकार - ६
१. Lead Actor - चित्रपटाचा मुख्य नायक अथवा नायिका! यांच्या भरवश्यावर चित्रपटाचं ८० टक्के भवितव्य अवलंबून असतं. काही वर्षाआधी पडद्यावर सर्वाधिक दिसणारा कलाकार हेच असत. अमिताभ, राजेश खन्ना, रेखा, परवीन बाबी, शत्रुघन सिन्हा, विनोद खन्ना, सनी देवल, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, गोविंदा अशी हिंदी चित्रपट कलाकारांची यादी संपता संपत नाही. या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना तिकीट खिडकीपर्यंत खेचून आणण्यात यशस्वी होत! ज्या काळी चित्रपटाच्या यशाचे मोजमाप आठवड्यात व्हायचे, त्या काळी या कलाकारांचे चित्रपट वीस-वीस आठवडे थिएटरमधून उतरत नसत. तिकीट खिडकीवर सर्रास यश मिळवणारी ही मंडळी कालांतराने मागे जरी पडली असली, तरीही त्यांनी उपभोगलेलं यश आजही अधोरेखित मानलं जातं.
मराठी चित्रपटातील काही आघाडीचे नायक-नायिका बघू या. दादा कोंडके, डॉ. काशीनाथ घाणेकर, निळू फुले, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, चंद्रकांत, सूर्यकांत, बाळ धुरी, अरुण सरनाईक, राजा गोसावी, रवींद्र महाजनी, रंजना, वर्षा उसगावकर, जयश्री गडकर, प्रशांत दामले, निशिगंधा वाड आणि अलका कुबल...! मराठी चित्रपटाला लाभलेली ही नावं म्हणजे मूर्तिमंत दिव्यस्वप्नंच म्हणता येईल.
आता एक विशेष गोष्ट -
चित्रपटात मुख्य नायिकेचं काय स्थान असतं हे ठणकावून सांगणारा एक मराठी चित्रपट म्हणजे 'माहेरची साडी'. विजय कोंडके निर्मित-दिग्दर्शित या मराठी Cult Classic चित्रपटाने १९९१ साली थिएटरची पायरी गाठली आणि पुण्याच्या प्रभात टॉकीजला तब्बल दोन वर्ष हाऊसफुल चालला. पहाटे सहा वाजतादेखील त्याचे शो हाऊसफुल होते, जो मराठीच नाही, तर भारतीय चित्रपट सृष्टीत एक रेकॉर्ड आहे. एक नायिकाप्रधान चित्रपटाने यशाचे इतके उत्तुंग शिखर गाठण्याची इतिहासातील ही पहिली आणि एकमेव नोंद असावी. अलका कुबल, विक्रम गोखले, आशालताबाई, अजिंक्य देव, रमेश भाटकर, उषा नाडकर्णी अशी त्या काळची दमदार कलाकारांची फौज असलेल्या या चित्रपटाचं बजेट सुमारे १ कोटी होतं. १९९१ साली आलेल्या हिंदी चित्रपट 'साजन' आणि 'सौदागर' आणि दस्तुरखुद्द बच्चन साहेबांच्या 'हम' या चित्रपटांना मागे टाकत 'माहेरच्या साडी' ने १२ कोटींचा घसघशीत गल्ला जमवला. चित्रपटातील त्या कलाकारांचा प्रभाव आजही कमी झालेला दिसत नाहीये.
Lead Actor घेताना अभिनयासोबत बाकीच्या काही बाबी लक्षात ठेवणं गरजेचं असतं.
१. कलाकारांचा बॉक्स ऑफिस आणि लोकप्रियतेचा इतिहास.
२. त्यांचं मानधन
एखाद्या कलाकाराला पाहून लोक तिकीट खिडकीवर तिकीट काढून चित्रपट बघायला येतील ही खात्री नसल्यास दुसरा पर्याय तपासून बघण्याचा अधिकार निर्मिती संस्थेला असतोच. अर्थात चित्रपट चालण्याची जबाबदारी एकट्या त्याच कलाकाराची कधीच नसते, हे ही तितकंच खरंय...!
अनुराग