दिग्दर्शक - ३ - लघुपट.

युवा विवेक    24-Sep-2021   
Total Views |

दिग्दर्शक - ३ - लघुपट.


director_1  H x 

चित्रपट आणि लघुपट या दोन्ही प्रकारांचं दिग्दर्शन खूप वेगळं असतं. चित्रपटात तुम्हाला तुमचे आर्टिस्ट वाढवता येतात. बजेट वाढीव असतं. त्या उलट लघुपटाला या दोन्ही गोष्टी मर्यादित असतात. साधारण वीस-तीस मिनिटांत तुम्हाला खूप काही साध्य करायचं असतं. आज लघुपटांच्या दिग्दर्शनाबद्दल बोलू या...!

मी पाहिलेल्या काही लघुपटांत ‘भैरू’ आजही अढळस्थानी आहे. दिग्दर्शिका मानसी देवधर यांच्या कल्पकतेचा आरसा असावा ‘भैरू’! स्वतः कॅमेरा हातळल्यावर काय जादू होऊ शकते, हे "भैरू" पाहिल्यावर नक्की लक्षात येईल. आपल्या समोर असलेल्या लोकेशन्सचा पुरेपूर वापर करून, त्यांची पहिल्या क्षणापासून फुलत जाणारी कथा. अगदी शेवटपर्यंत प्रेक्षकांना आनंद देते. एका लहान मुलाच्या अपंगत्वावर आधारित असलेला हा लघुपट त्याच्या आणि त्याच्या आईबाबांच्या भावविश्वावर खूप बोधक आणि बोलकं भाष्य करतो. डोळ्याचं पारणं फेडणारा निसर्ग मानसीच्या कॅमेरातून बघताना मिळणारं समाधान खूप आहे. मानसीचाच अजून एक लघुपट ‘चाफा’ हा देखील निसर्ग-मानव भावबंधाच्या केमेस्ट्रीमुळे भावतो.

खरा दिग्दर्शक एखाद्या शैलीत कधीही अडकत नाही. प्रत्येक फ्रेममध्ये काहीतरी नवीन प्रयोग केल्यास ते छान ठरू शकतात. सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक यांच्या नजरा अगदी सारख्या नसल्या, तरी बऱ्याचशा जुळल्या पाहिजेत. तांत्रिक अथवा आर्थिक पहिलवानीच्या नादात अधिकांश नवखे लघुपट दिग्दर्शक मूळ कथेला आणि कलाकारांच्या खऱ्या क्षमतेला बगल देताना दिसून येतात. लघुपटाला मिळणारा कमी वेळ आणि आर्थिक मर्यादा लक्षात घेता, काही बाबी खूप काटेकोरपणे पाळल्या तर, नवल होऊ शकतं.

१. कलाकारांची नीट तयारी करून घ्यावी. लघुपट असला, तरी जेवढं काम, फ्रेम मिळतायत, त्यात जीव ओतून काम करावं.

२. आहेत त्या लोकेशन्सचा वापर करायचा असेल तर, लोकेशनचा पूर्ण अभ्यास हवा. कॅमेरामन, दिग्दर्शक आणि कलाकारांचाही!

३. लघुपटाची कथा-पटकथा नीट समजून घेणं गरजेचं आहे. त्यातून दिग्दर्शकाला नेमकं काय मांडायचं आहे, हे पूर्ण कळलं की, काम करणं सोपं जातं.

४. वेळेची मर्यादा असल्याने प्रत्येक फ्रेम आणि प्रत्येक संवाद महत्वाचा आहे. ‘अ’च्या संवादाच्या वेळी ‘ब’च्या चेहऱ्यावरचे भाव, दोघांची बॉडी लॅंगवेज, सेटवर असलेल्या इतर गोष्टींचा पुरेपूर वापर, प्रकाशयोजनेचा पूर्ण वापर, हे सगळं आधीच प्लॅन करून ठेवायचं. लघुपटात सेटवर जाऊन इनस्टंट प्लॅनिंग करण्यात वेळ खर्ची जातो आणि हाती काहीही लागत नाही. बऱ्याच नवख्या मंडळींच यात नुकसान होतं.

५. लघुपटाची स्क्रिप्टिंग करताना प्रत्येक सीनसाठी किती वेळ द्यायचा, कॅमेरा वर्क आणि मुव्हमेंट कशा पाहिजे हे सगळं आधी प्लॅन करून ठेवावं. एखादा अनवॉन्टेड किंवा अननेसेसरी संवाद असेल तर, तो ताबडतोड काढावा.

६. लघुपटात पात्रांची गर्दी होता कामा नये. साधारण वीस-तीस मिनिटात आपल्याला काय आणि किती दाखवायचं आहे, याची पूर्ण जाणीव आपल्याला ठेवावी लागणार आहे. प्रत्येक पात्राला दिला जाणारा स्क्रीन शेअर आणि स्क्रीन टाईमसुद्धा महत्वाचा आहे.

८. एडिटिंग करताना आपण अनावश्यक मटेरिअल निश्चित काढणार आहोत, पण शूट करताना गरज असेल, चांगलं दिसेल, व्यवस्थित बसेल असंच शूट केलं तर, वेळ आणि कष्ट वाचतात.

९. लघुपट करताना आपण तो नेमका कुणासाठी करतो आहोत, हे जरी दुय्यम स्थानावर असलं, तरी त्यातून आपण काय सांगतो आहोत, हे खूप महत्त्वाचं आहे. आपली कथा, लोकेशन्स, पात्र त्यावर अवलंबून आहेत का आणि आपण प्रत्येक फ्रेम डिझाईन करताना याची काळजी घेतली आहे का ते बघावं.

१०. पार्श्वसंगीत असल्याने लघुपटाची फ्रेम आणि सीन बोलकं होतं. फोली साऊंड असले तर, त्याला एक वेगळी ग्लेझ येते. त्याचा वापर करून घ्यावा.

लघुपट प्रभावी माध्यम म्हणून काही वर्षांत खूप पुढे आलं आहे. खूप कमी गुंतवणूक, नवीन कलाकारांची मांदियाळी. हजर तंत्रज्ञानाचा वापर यामुळे लघुपट बनवणं ही सोपं आहे आणि युट्युबवर टाकून ते जगभरातील प्रेक्षकांपर्यँत सहजपणे पोहोचतंसुद्धा. त्यातून उत्पन्न अल्प किंवा नाहीच्या बरोबर असलं तरी, पुढे मुख्य प्रवाहाच्या सिनेमात जर ठरावीक कारकीर्द करायची असेल, तर लघुपट निर्मिती करून पहायला काहीही हरकत नाही. आजकालच्या काळात तर मोबाइलवरसुद्धा लघुपट बनवणं, संकलन करणं, डबिंग करणं जमतं. एक छान कथानक. पटकथेत त्याची मुद्देसूद मांडणी, कलाकारांची तयारी आणि तांत्रिक पूर्तता झाली की, आपण लघुपट बनवू शकतो.

लॉकडाऊनच्या काळात बऱ्याचजणांनी आपली ही महत्त्वकांक्षा पूर्ण करून घेतली होती. जिथे मेन स्ट्रीम सिनेमा, शूटिंग, थिएटर, नाट्यगृह बंद होते, तिथे लोकांनी घरच्या घरी लघुपट बनवले. पुढील काळात अजूनही असे प्रयोग आपण पाहू. कलेच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञ लोकांची ही नवी फळी आहे. तिचे आपण स्वागत केले पाहिजे.

लघुपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, खूप जास्त ताणता न येणारे विषय इथे हाताळले जाऊ शकतात. लिंग-भेद, शिक्षण, शालेय-कॉलेज जीवनातील छोटे, पण महत्त्वाचे प्रसंग, एखादा किस्सा, सार्वजनिक जागांवर घडणारी एखादी घटना असे अनेक सामाजिक, राजकीय, अराजकीय, पारिवारिक विषय, जे थोडक्यात संपू शकतात ते आपण इथे मांडू शकतो. चित्रपटाच्या लेन्थला जे खूप पाल्हाळ लावल्यासारखे वाटते, ते लघुपटात व्यवस्थित बसू शकतं. आमचे मित्र नारायण अंधारे यांनी साध्या पद्धतीने एक भयपट केला होता – ‘अनोळखी वाट’. त्यात शाळेत नव्याने रूजू झालेल्या शिक्षकाला त्या गावाबद्दल आणि शाळेबद्दल जो अनुभव येतो, तो त्यांनी अत्यंत चपखलपणे मांडला आहे. साधारण २०-२२ मिनिटांचा हा लघुपट त्या वेळच्या मर्यादेतसुद्धा बघणाऱ्याला घाबरवून सोडतो. संदेश कुडतरकर यांचा ‘फ्रॉम निल, विथ लव्ह’ हा समलिंगी भावबंधावर असलेला लघुपटसुद्धा एक साधा विषय, पण त्यात 'नील'च्या स्वभावापासून त्याच्या मनःस्थितीपर्यंत खूप गोष्टी अत्यंत प्रभावीपणे मांडल्या आहेत.

मुळात, लघुपटांचा दिग्दर्शक हा अत्यंत संवेदनशील म्हणावा लागेल! मर्यादित आर्थिक तरतूद, मर्यादित लोकेशन्स, नवखे कलाकार आणि तंत्रज्ञ, आर्थिक परताव्याची नसलेली खात्री, इतके ड्रॉप बॅक्स असूनदेखील आपल्या कामात ते कुठलीही कॉम्प्रोमाइज करताना दिसत नाहीत. युट्युब आणि OTT प्लॅटफॉर्मवर ढिगाने असलेले हे लघुपट एक छोटं करमणुकीचं साधन आहे खरं, पण नवीन तंत्रज्ञाची एक मोठी फळी तयार होताना दिसते आहे. त्याच्याने वाढणारा आत्मविश्वास खूप मोठा आहे. ज्यांना मोठा चित्रपट करण्याची इच्छा आहे, पण ते लक्ष खूप लांब आणि नजीकच्या काळात असाध्य वाटतं, त्यांच्यासाठी लघुपट हे नक्कीच प्रगती आणि प्रयोगाचं एक सोपं साधन आहे.

अनुराग

९५११८४१६३१