मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे...

युवा विवेक    20-Sep-2021   
Total Views |
मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे... 
 
beyond friendship_1 
काही नाती आयुष्यात व्यक्त करता येत नाही. कारण ती आपल्यालाच नीट समजलेली नसतात तर आपण समोरच्याला आपल्याला काय वाटते ते नक्की कस सांगणार हा गोंधळ मनात सुरु असतो. आयुष्याच्या अनेक टप्प्यावर अनुभव घेतल्यावर एक परिपक्व नात असावं वाटते आणि ते हि आपल्या विरुद्ध लिंगी व्यक्तीशी. दोन वैचारिक पातळीतील फरक खरे तर एका परिपूर्ण नात्याला आकार देतो त्याला स्थैर्य देते. पण हि तारेवरची कसरत खूप कमी जण निभावून नेऊ शकतात.
मैत्री एक सुंदर नात. त्या पुढल पाउल प्रेमाच असल तरी त्या दोन पाउलात खूप मोठा पल्ला गाठावा लागतो. ह्या मध्ये सुद्धा नात बनवता आणि टिकवता यायला हव. किंबहुना वयाच्या उत्तरार्धात जेव्हा शारीरिक, भावनिक, कौटुंबिक अश्या सगळ्या पातळ्यांवर प्रेम, मैत्री हे अनुभवलेलं असते. त्यावेळेस निखळ, निरपेक्ष मैत्री पेक्षा हि मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे असणाऱ्या नात्याची गरज प्रकर्षाने जाणवते. पण अस कोणीतरी आपल्या आयुष्यात येण आणि ती व्यक्ती टिकवून ठेवणे हे सगळयांना जमते अस नाही.
मैत्री आणि प्रेम ह्यामध्ये हि नात असू शकते हि मानसिकता आपण निर्माण केलीच नाही. मैत्री आणि प्रेमाच्या भावना ह्या आपल्याला ओळखता येतात. त्यांना आपण त्यांच्या साच्यात हि बसवतो पण ह्या दोन्ही पाउलांच्या मध्ये असलेल्या नात्याला आपल्याला साच्यात बसवता न आल्याने त्याचा श्वास नेहमीच गुदमरतो. कधी कोणी आधल्या पाऊलावर विसावतो तर कोणी पुढल्या पाऊलावर मग दोन्ही नात्यातून निर्माण होणाऱ्या अपेक्षा आणि त्यातून मिळणारी प्राप्ती ह्यातल अंतर वाढत जाते. मग सुरु होतो तो गैरसमजाचा प्रवास आणि त्याची परिणीती एक चांगल बंध तुटण्यात होते. कारण एकदा ठेच लागली कि त्यातली सहजता संपून जाते.
सगळ हाताशी असून सुद्धा आपल्याला विश्वासाने सांगता येईल अस कोणीतरी प्रत्येकाला हव असते. जोडीदार आणि मित्र- मैत्रिणी ह्या दोन स्टेशन मधला थांबा आपण शोधत असतो. जिकडे मैत्री चा निखळ विश्वास असेल, जिकडे त्या छान वाटणाऱ्या भावना हि असतील. जिकडे आधार देणारा खांदा असेल आणि जिकडे आपल्या भावना हक्काने सांगण्याच व्यासपीठ हव. पण त्याचे वेळी भावनिक गुंतवणूक हि मर्यादेत हवी. शारीरिक गुंतवणूक नको पण अस असून सुद्धा निरपेक्ष भावनेने आपल्याला आपल मानणार आणि त्याच वेळी आपल्याला आपल वाटणार कोणी तरी हव ह्याच शोधात आपण असतो नाही का?
दोन पाउलांच्या मध्ये अस थांबण ह्यासाठी विचारांची पक्की बैठक तर लागतेच पण त्याशिवाय दोन्ही टोकावर न जाण्याचा संयम पण खूप गरजेचा असतो. ह्या गोष्टी दोन्ही व्यक्तींकडून तितक्याच प्रगल्भतेने स्वीकारल्या जातील तेव्हाच हे अविस्मरणीय नात जन्माला येत आणि बहरते. आयुष्याच्या उत्तरार्धात हे नात शोधताना अनेकदा गल्लत होतेच. कारण दाणे टाकत फिरणारे, सहानभूतीचा खांदा देऊन जवळ येणारे, डोळ्यांचे अश्रू पुसून मीच तो असा आभास निर्माण करणारे त्या सोबत मज्जा म्हणून टाईमपास करणारे असे अनेक पुरुष तर ढळत्या सौंदर्याला पुन्हा कोणीतरी सुंदर म्हणावे म्हणून शोधणाऱ्या त्या, मजेसाठी आपल्यावर पैसे उडवणारे पुरुष शोधणाऱ्या तसेच काही नाही तर आपल्या पाठीमागे अनेक पुरुष ह्या विचारांनी माज मिरवण्यासाठी अनेक स्त्रिया असतात. अश्या प्रत्येक विचारांची स्त्री – पुरुष आपल्या आजूबाजूला असताना विश्वास तरी नक्की कोणावर ठेवायचा ह्या विवंचनेत सगळेच असतात.
मैत्री आणि प्रेम ह्य दोन्ही जितक आयुष्यात गरजेच आहे त्याहीपेक्षा जास्त गरजेच आहे ते ह्या दोघांच्या मध्ये कोणीतरी असण. अर्थात ते आपल्याला जाणवते तोवर एकतर बरच पाणी पुलाखालून वाहून गेलेलं असत. आलेल्या अनुभवांनी मन इतक तुटलेलं असते कि आता पुन्हा हे नकोच आणि जरी असा कोणी कधी मिळाला तर त्याची कालांतराने टोकावर जाण्याची ओढ पुन्हा एकदा आपल्याला आगीतून निघून फुफाट्यात घेऊन जाते. पण अस मैत्रीच्या पलीकडल आणि प्रेमाच्या अलीकडल कोणी असेल तर एक अतिशय सुंदर नात जन्माला येते ह्यात शंका नाही.
कोणत्याही अपेक्षेशिवाय, आपल्या आयुष्यातील कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पूर्ण करून समोरच्याला हि तितक्याच विश्वासाने तोलून ठेवणाऱ्या ह्या नात्यासाठी खूप काही द्यावच लागते. वेळेपासून ते समजून घेण्यापर्यंत. संयम ठेवावा लागतो. आपल्याला ऐकून घेणार, आपल्याशी संवाद साधणार, आपल्याला काही सांगणार अस आपल माणूस असण हीच तर प्रत्येकाची इच्छा असते. त्यातही मैत्रीच्या पलीकडल आणि प्रेमाच्या अलीकडल कोणी असेल तर ह्या दोन्ही टोकांवर असणाऱ्या नात्यांमधील ते दुवा असते हे मात्र नक्की. ह्याचा शोध ज्याचा त्याने घ्यायचा कारण प्रेम आणि मैत्रीच्या व्याख्या जितक्या सापेक्ष तितकच ह्या दोन पावलांमधील अंतर. पण एकदा अस कोणी मिळाल तर ते नात जपण हि पण आपलीच कला. कारण मशागत सगळ्याचीच करावी लागते. मग ती शेती असो वा नात.
बघा मग आपल्या आयुष्यात कोणी अस आहे का? कि आपण कोणाच्या आयुष्यात मैत्रीच्या पलीकडे पण प्रेमाच्या अलिकडले आहोत?..........
 
विनीत वर्तक ©
फोटो स्त्रोत :- गुगल